Loksabha 2019 : तेल लावलेला मल्ल धनुष्यबाण मोडेल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

‘‘खासदार धनंजय महाडिक म्हणजे तेल लावलेले मल्ल आहेत, त्यांच्याशी लढत देताना धनुष्यबाण मोडून पडणार आहे.’’ अशा शब्दात राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी शिवसेना-भाजप युतीवर हल्लाबोल करीत खासदार महाडिक यांना विजयी करून राष्ट्रवादी काँग्रेसवर विजयाचा गुलाल उधळा, असे आवाहन येथे झालेल्या मेळाव्यात केले. 

कोल्हापूर - ‘‘खासदार धनंजय महाडिक म्हणजे तेल लावलेले मल्ल आहेत, त्यांच्याशी लढत देताना धनुष्यबाण मोडून पडणार आहे.’’ अशा शब्दात राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी शिवसेना-भाजप युतीवर हल्लाबोल करीत खासदार महाडिक यांना विजयी करून राष्ट्रवादी काँग्रेसवर विजयाचा गुलाल उधळा, असे आवाहन येथे झालेल्या मेळाव्यात केले. 

धनंजय महाडिक युवा शक्तीचा मेळावा येथील मुस्कॉन लॉनवर झाला. या वेळी त्या बोलत होत्या. अभिनेता अंकुश चौधरी यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात जिल्हाभरातून आलेल्या युवा कार्यकर्त्यांनी सर्व लॉन तुडुंब भरून गेले. या वेळी सक्षणा सलगर यांनी भाजप-सेना युतीवर जोरादार हल्लाबोल केला. 

त्या म्हणाल्या, ‘‘खासदार महाडिक म्हणजे संसदेच्या प्रश्‍नांचे षटकार मारणारे खासदार आहेत. राष्ट्रवादीचे बळ त्यांच्या पाठीशी आहे व अशा उमेदवारांशी टक्कर देणाऱ्या भाजपला स्वतः उमेदवार मिळत नाही. दुसऱ्या पक्षातील उमेदवार खेचत आहेत, हा प्रकार म्हणजे स्वतःच्या घरात मुलं होत नाही म्हणून दुसऱ्याच्या घरातील मुले मांडीवर घेण्याचा आहे.’’

अभिनेते अंकुश चौधरी म्हणाले, ‘‘खासदार महाडिक यांनी जिल्हाभरात केलेले सामाजिक काम मोठे आहे. जिल्ह्याच्या विकासाला त्यांनी बळ दिले. संसदरत्न पुरस्कार मिळविला, आपलेपणा जपणारा माणूस आहे. माझा त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नेतृत्वाला निवडून देणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे मतदान करताना चूक करू नका.’’ 

सागर कोंडेकर यांनीही युतीच्या उमेदवारांनी आपले कर्तृत्व पहिल्यांदा सिद्ध करावे आणि मगच खासदार महाडिक यांच्यावर टीका करावी, असे सांगितले. 

खासदार महाडिक म्हणाले, ‘‘मी विरोधी पक्षातील खासदार असूनही आठ हजार कोटींचा निधी येथे आणला. यापुढील काळातही विकासकामे करायची आहेत. आपल्या मतांच्या पाठिंब्यावर शक्‍य आहे.’’ भागीरथी संस्थेच्या अरुंधती महाडिक, पृथ्वीराज महाडिक, रोिहत पाटील, अभिजित राऊत, उत्तम कोराणे, अमोल माने, जयराज देसाई, प्रसाद उगवे आदींनी मनोगत व्यक्त केले.

खासदार होणे अनुकंपावरील जागा नव्हे
श्री. महाडिक म्हणाले, ‘‘शिवसेनेच्या इथल्या उमेदवाराच्या घरात २५ वर्षे सत्ता होती, तरी काही केलेले नाही. आता वडिलांनंतर मुलाला जागा द्या म्हणतात. त्यांनी अनुकंपा तत्त्वावरील नोकरी नाही, हे विचारात घ्यावे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी अडीच वर्षांत ४६ दिवस हजेरी लावली. मी संसदेत ७३ टक्के हजर आहे.’’

Web Title: Loksabha 2019 Sakshna Salgar comment in Kolhapur