Loksabha 2019 : सांगली, हातकणंगलेत माकपचा काँग्रेस-स्वाभिमानीला पाठींबा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

एक नजर

  • मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कॉंग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी पक्षास पाठिंबा
  • धर्मनिरपेक्ष शक्तींना बळ देण्यासाठी आणि भाजपला पराभूत करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा निर्णय 
  • शेतकरी विरोधी धोरण, वाढती बेरोजगारी, कर्जमाफी, दुष्काळी उपाययोजनातील अपयश, महामार्गासाठीच्या भूमीसंपादनातील फसगत या सरकारच्या जनविरोधी धोरणांना विरोधासाठीच निर्णय.

सांगली - मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने सांगली व हातकणंगले लोकसभा मतदार संघात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्वाभिमानी पक्षास पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस उमेश देशमुख यांनी दिली. देशाच्या इतिहासात ही निवडणूक भारतीय संविधानासमोर आव्हान उभी करणारी असून अशा काळात धर्मनिरपेक्ष शक्तींना बळ देण्यासाठी आणि भाजपला पराभूत करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने हा निर्णय घेतल्याचे श्री. देशमुख म्हणाले.  

श्री. देशमुख म्हणाले, "धर्मनिरपेक्षता - लोकशाही या दोन्ही मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार पाशवी आघात करीत आहेत. द्वेष, हिंसेच्या भावनांनी समाजाला उद्दिपित केले जात आहे. सर्व धर्मांना सामावून घेणारा देशाचा वारसाच नष्ट करण्याचे कारस्थान रचले जात आहे. जनतेची मुस्कटदाबी केली जात आहे. सत्ताधारी विरोधकांना देशद्रोही ठरवत आहेत. केंद्रात सत्तेवर येताना दिलेल्या सर्वच आश्‍वासनांचा त्यांना विसर पडला आहे. शेतकरी विरोधी धोरण, वाढती बेरोजगारी, कर्जमाफी, दुष्काळी उपाययोजनातील अपयश, महामार्गासाठीच्या भूमीसंपादनातील फसगत या सरकारच्या जनविरोधी धोरणांना विरोध म्हणून आम्ही धर्मनिरपेक्ष उमेदवारांच्या पाठी आहोत.''

यावेळी दिगंबर कांबळे, रेहाना शेख, रियाज जमादार, नंदा जगताप आदी उपस्थित होते. 
 

Web Title: Loksabha 2019 Sangli, Hatkanagale Lok Sabha Constituency