Loksabha 2019 : संजयकाकांची रणनीती विशाल भेदणार? 

अजित झळके
सोमवार, 8 एप्रिल 2019

‘माझी पाच वर्षांतील भूमिका पक्षातील काही लोकांना खटकली असेल; मात्र ती माझी रणनीती होती. निवडणुकीच्या निकालात ती फायद्याची ठरल्याचे स्पष्ट होईल,’ असे खासदार संजय पाटील भाजप कार्यकर्त्यांच्या सांगलीतील मेळाव्यात म्हणाले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांत त्यांनी पाच वर्षे साखरपेरणी केली. तीच आता मतरूपात उगवेल, असा खासदारांना विश्‍वास आहे. स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांच्यासमोर ही रणनीती खिळखिळी करण्याचे आव्हान असेल. 

‘माझी पाच वर्षांतील भूमिका पक्षातील काही लोकांना खटकली असेल; मात्र ती माझी रणनीती होती. निवडणुकीच्या निकालात ती फायद्याची ठरल्याचे स्पष्ट होईल,’ असे खासदार संजय पाटील भाजप कार्यकर्त्यांच्या सांगलीतील मेळाव्यात म्हणाले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांत त्यांनी पाच वर्षे साखरपेरणी केली. तीच आता मतरूपात उगवेल, असा खासदारांना विश्‍वास आहे. स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांच्यासमोर ही रणनीती खिळखिळी करण्याचे आव्हान असेल. 

‘आघाडी धर्म... युती धर्माचे पालन करा’, असे वरिष्ठ नेते ओरडून सांगत असले तरी हे धर्म कधीच बासनात गुंडाळून ठेवण्यात आले आहेत. देश आणि राज्य पातळीवर असो किंवा जिल्हा पातळीवर; सगळीकडे सोयीच्या राजकारणाचा नवा पॅटर्न चांगलाच रुजला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात सध्या कोण भारी ठरेल, याचा वजनकाटा घेऊन हिशेब मांडायला बसले तर खासदार संजय पाटील यांच्याकडील नेत्यांचे बाहुबल आणि कार्यकर्त्यांचे प्रचंड पीक पाहता काटा दुसऱ्या टोकाला जाऊन थांबेल. पण, राजकारणात कधीच दोन अधिक दोन चार नसते.

या राजकीय हिशेबाने बेरीज किती होईल, याचे उत्तर निकालातून स्पष्ट होईल. खासदार पाटील यांच्यासाठी भाजपअंतर्गत नाराजी जितकी डोकेदुखीची ठरली तितकीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीत त्यांनी करून ठेवलेली गुंतवणूक सध्या सुखावणारी असेल, असे आडाखे बांधले जात आहेत. खासदार पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांसमोर जो ‘स्ट्रॅटजी’चा विषय  मांडला तो हाच होता आणि विशाल पाटील यांच्यासमोर तेच खरे आव्हान आहे. 

खासदार पाटील यांनी खानापूरपासून सांगलीपर्यंत आणि जतपासून कडेगावपर्यंत वेगवेगळ्या पातळीवर बेरजेची गणिते मांडून ठेवली आहेत. ते भाजपचे खासदार असले तरी कधीही त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अंतर दिले नाही. उलटपक्षी काही ठिकाणी त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अधिक जवळ केले. त्यातूनच काही ठिकाणी भाजपचे आमदार नाराज झाले. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यामागचे कारण तेच होते.

अर्थात, खासदार पाटील यांनी त्याला नकार दिला नाही. तीच माझी स्ट्रॅटजी असल्याचे ते उघड सांगत राहिले. आजघडीला जिल्ह्याच्या निकालाची गणिते मांडताना  खासदार पाटील यांच्या पारड्यात विरोधी पक्षातून किती वजन पडेल, याचा हिशेबच लागत नसल्याचे स्पष्ट होतेय. ही छुपी मदत, रसद हा निकालातील महत्वाचा घटक राहील काय, यावर राजकीय तज्ज्ञांचे खल सुरू आहेत. 

विशाल पाटील यांनी या ‘स्ट्रॅटजी’ला भिडण्यासाठी ताकद लावली आहे. काही ठिकाणी स्वतः तर काही ठिकाणी वरिष्ठ पातळीवरून ते प्रयत्न करत आहेत. विशेषतः खानापूर-आटपाडीचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचा गट खासदारांकडे झुकलेला होता, मात्र आमदार अनिल बाबर यांच्या भूमिकेनंतर तो ‘ओपन’ होण्याची शक्‍यता पडताळून पाहिली जात आहे. सदाशिवभाऊ स्वतःच विशाल यांच्या प्रचार प्रारंभी म्हणाले होते, की व्यासपीठावरील साऱ्यांनी एकजुटीने, प्रामाणिक काम केले तरी विशाल यांचे जमेल... त्यांच्या या वाक्‍यात संजयकाकांच्या ‘स्ट्रॅटजी’ची झलक नक्कीच होती. पण, विधानसभेची गणिते मांडताना त्यांचा डाव आता वेगळा असू शकतो.

बाबर यांचेच कट्टर समर्थक तानाजी पाटील हे आटपाडीतून विशाल की गोपीचंद अशा संभ्रमात आहेत. सांगली आणि मिरज मतदारसंघात दिवंगत मदन पाटील समर्थकांना विश्‍वास देण्याचे आव्हान विशाल यांच्यासमोर असेल. मिरज पूर्व भागातील काँग्रेसचा विस्कळीत झालेला आणि त्यातूनच खासदारांशी जवळीक साधणारा गट सोबत घेण्यासाठी ताकद लावावी लागेल. इथे जयश्रीताईंचा शब्दच ‘स्ट्रॅटजी’चा अँटीडोस ठरू शकतो.

पलूस-कडेगाव आणि जत या दोन मतदारसंघातील काँग्रेस ही दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या प्रभावाची आहे. दोन्ही ठिकाणी खासदारांनी साखरपेरणी केली होती. आता काँग्रेसशी घट्ट नाते, या आधारावर विश्‍वजीत कदम आणि विक्रम सावंत यांच्याशी जुळवून घेत त्याचे मतात रुपांतर करताना विशाल यांना ‘जुने जाऊ द्या...’चेच धोरण अवलंबाबे लागेल आणि त्यांनी त्याची सुरवात केली आहे. या साऱ्यात खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा पासंग किती उपयोगी ठरतोय, याकडेही लक्ष असेल. 

Web Title: Loksabha 2019 Sangli Lok Sabha Constituency speical