Loksabha 2019 : प्रश्‍न सोडवून घेणारा खासदार ही ओळख बनविणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

प्रश्‍न विचारणारा खासदार, अशी माझी ओळख होऊ न देता प्रश्‍न सोडवून घेणारा खासदार हीच माझी ओळख बनवणार असल्याचे भाजप - शिवसेना युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. भूलभुलय्या आणि वास्तव यातला फरक ओळखण्याइतकी कोल्हापूरची जनता शहाणी असल्याने या निवडणुकीत आपला विजय निश्‍चित असल्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, ‘‘गेल्या निवडणुकीत प्रचाराला अवघे पंधरा दिवस मिळाले. तरीही मतांचा मोठा टप्पा गाठला. त्या निवडणुकीत माझा पराभव झाला; पण पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून माझा जनसंपर्क कायम ठेवला. ‘नॉट रिचेबल’ अशी माझ्यावर टीका करत खासदार धनंजय महाडिक यांनी चार वर्षे काढली. मी नॉट रिचेबल आहे की नाही हे आता जनताच ठरविणार आहे; पण पाच वर्षांत धनंजय महाडिक ‘नॉन रिलायबल’ अशी 
स्वतःची ओळख करून बसले आहेत. ज्या राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर ते खासदार झाले, त्या पक्षालाही त्यांनी पाच वर्षे दाद दिली नाही.’’ 

ते म्हणाले, ‘‘गेल्या पाच वर्षांत जो काही विकास केला असे महाडिक सांगतात, तो विकास केंद्र सरकारच्या धोरणांचा आहे. कोल्हापूरच्या विमानतळाचा विकास हा केंद्र सरकारच्या देशभरातील सर्व विमानतळांच्या विकास योजनेतून झाला आहे. देशाच्या दुर्गम भागातही विमानतळे विकसित झाली आहेत. त्यामुळे त्याचे श्रेय केंद्र सरकारलाच आहे. कोल्हापूर परिसराच्या विकासाचे मुद्दे वेगळेच आहेत. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील शेतकरी, कष्टकरी, महिला, बचत गटाच्या महिलांची उत्पादने, काजू, फणस, आंबे, करवंदे या रानमेव्यावर प्रक्रिया, पर्यटनाचा विकास, कोल्हापुरी चप्पल, गूळ, चटणी यांचे पेटंट अशा छोट्या छोट्या मुद्द्यांत विकास दडला आहे; पण त्यावर पाच वर्षांत चर्चा नाही.’’

ते म्हणाले, ‘‘मी राजकारणात नवा नाही आणि केवळ सदाशिवराव मंडलिक यांच्या पुण्याईचा फायदा घेत नाही. मी या निवडणुकीसाठी माझा जो जाहीरनामा केला आहे तो लोकांच्या अडचणी, त्यांच्या अपेक्षा व विकासाचे त्यांच्या नजरेतून मुद्दे यावर अवलंबून आहे. पंचतारांकित घोषणा मी केलेल्या नाहीत आणि करणारही नाही. मी गेली २० वर्षे राज्यशास्त्राचा प्राध्यापक आहे. प्रभारी प्राचार्यपद भूषवले आहे. जिल्हा सहकारी बोर्डाचा अध्यक्ष आहे. जय शिवराय शिक्षण संस्थेचा सचिव आहे. हमिदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याचा अध्यक्ष आहे. जिल्हा परिषदेत अडीच वर्षे अध्यक्षपद भूषविले आहे. सरकारी योजना, प्रशासकीय कामाचा अनुभव आहे आणि म्हणूनच खासदारकीवर माझा हक्‍क सांगितला आहे. लोकांच्या पाठबळावर मी निवडणूक लढवत आहे. शिवसेनेसारख्या पक्षाने मला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे जय-पराजय या चिंतेच्या पलीकडे मी 
गेलो आहे.’’

ते म्हणाले, ‘‘पक्ष म्हणून शिवसेनेचा जरूर जाहीरनामा असेल; पण माझा जाहीरनामा राजर्षी शाहू महाराजांनी घालून दिलेल्या पायवाटेवरचा आहे. त्यामुळे त्यांनी जे विविध क्षेत्रांत कार्य केले, प्रशासकीय कामकाज पारदर्शी केले, तेच काम मी नव्या विकासाची जोड देऊन पुढे नेणार आहे. कोल्हापूर शहरात काही भव्य-दिव्य उभे केले म्हणजे विकास झाला असे 
मुळीच नाही. कोल्हापूर शहरही जगाच्या नकाशावर आले पाहिजे आणि चंदगडचे पर्यटनही जगाच्या नकाशावर आले पाहिजे. जिल्ह्याचा समान विकास या पद्धतीनेच होऊ शकणार आहे आणि अशा कामावरच माझा भर राहणार आहे.’’ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Sanjay Mandlik interview