Loksabha 2019 : राज्यात आघाडीची स्थिती बरी असल्यानेच पंतप्रधानांच्या चकरा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

कोल्हापूर - राज्यातील निवडणुकीचे वातावरण हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला अनुकूल आहे. यामुळेच  पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले असून ते दर दोन-तीन दिवसांनी महाराष्ट्रात येत आहेत. याचाच अर्थ आघाडीची परिस्थिती बरी आहे, असे ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री व खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कोल्हापूर - राज्यातील निवडणुकीचे वातावरण हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला अनुकूल आहे. यामुळेच  पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले असून ते दर दोन-तीन दिवसांनी महाराष्ट्रात येत आहेत. याचाच अर्थ आघाडीची परिस्थिती बरी आहे, असे ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री व खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पवार दोन दिवसांपासून कोल्हापुरात आहेत. आज ते रत्नागिरीला रवाना झाले, तत्पूर्वी हॉटेल पंचशीलमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

‘‘आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या, मात्र देशाच्या पंतप्रधानांनी इतका वेळ एका राज्यात कधी घालवला नाही. मोदी मात्र सातत्याने राज्यात येत आहेत.  येथे आल्यानंतर प्रत्येक सभेत ते माझ्यावर व्यक्‍तिगत हल्ले करीत आहेत. कुटुंबावर हल्ले करीत आहेत. प्रत्येक सभेत शरद पवार हा त्यांचा ‘कॉमन’ विषय त्यांच्यासमोर दिसतो. याचा अर्थ ‘आमचं बरं चाललंय’ असा होतो. त्यांनी केलेल्या वक्‍तव्याचा ‘फिडबॅक’ कोणीतरी त्यांना दिल्यानंतर त्यांनी आपला ‘टोन’ सुधारला आहे. आता ते जरा बरं बोलत आहेत,’’ असा टोलाही पवार यांनी लावला. 

पवार म्हणाले, ‘‘काश्‍मीरमध्ये आता वेगळे चित्र दिसते आहे. तेथील तरुण पिढी संतप्त आहे. हे संवेदनशील राज्य आहे, देशाच्या सीमेवर आहे. संयमाने आणि लोकांच्या भल्यासाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजाणी करून लोकांचा विश्‍वास संपादन करणे आवश्‍यक होते, पण तसे झालेले नाही. त्यामुळे तिथे काही लोक एकत्र आहेत, हे देशाच्यादृष्टीने घातक आहे.’’ 

सैन्याच्या शौर्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांकडून केला जातो. या दोन गोष्टींची खंत लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली. देशाच्या संसदीय लोकशाहीला व पंतप्रधानपदाला ही प्रवृत्ती घातक आहे, असे पवार म्हणाले.

म्हणूनच पर्रीकरही स्वगृही
राफेल खरेदीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार झाली. विमानाच्या किमती तीन वेळा बदलल्या. हा सर्व व्यवहार तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना पटला नाही. त्यांनी या पदाचा राजीनामा देऊन गोव्याचे मुख्यमंत्री होणे पसंत केले, अशी चर्चा दिल्लीच्या वर्तुळात असल्याचेही पवार यांनी सांगितले. 

मागच्या निवडणुकीत लोकांनी मोदींना एक संधी दिली होती. पण, त्या संधीचे त्यांना सोने करता आले नाही. हे त्यांच्याही लक्षात आले आहे. त्यामुळे मुख्य मुद्द्यांवरून लक्ष विचलित करून वैयक्‍तिक हल्ले करण्यास मोदींनी सुरवात केली आहे. 
- शरद पवार
, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Sharad Pawar comment