Loksabha 2019 : घटनेशी द्रोह करणाऱ्या मोदींना खाली खेचा

Loksabha 2019 : घटनेशी द्रोह करणाऱ्या मोदींना खाली खेचा

कोल्हापूर - देशाच्या राज्यघटनेशी व पंतप्रधानपदाच्या शपथेशी द्रोह करणाऱ्या मोदी सरकारला खाली खेचा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले. तसेच मोदींची सत्ता खाली खेचण्याची मशाल कोल्हापुरातून पेटवावी; ही मशाल निश्‍चितच राज्यावर उजेड पाडेल, असा विश्‍वास श्री. पवार यांनी या वेळी व्यक्‍त केला.

काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्र पक्षांकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ मार्केट यार्ड येथील रामकृष्ण हॉल येथे बोलाविलेल्या संयुक्‍त मेळाव्यात ते बोलत होते.

धनंजय महाडिक सर्वाधिक प्रश्‍न विचारणारे खासदार
देशाच्या संसदेत सर्वाधिक प्रश्‍न विचारणारा खासदार म्हणून धनंजय महाडिक यांची नोंद आहे. महाडिक यांचा आपणाला अभिमान आहे. त्यांनी चांगले काम केले आहे. संधीचं सोनं करण्याचे काम महाडिक यांनी केले असून, त्यांना पुन्हा निवडून देण्याचे आवाहन पवार यांनी केले.

खासदार पवार म्हणाले, ‘‘राज्यात आणि देशात शेती, उद्योग, बेरोजगारी, स्त्रिया, तरुण, गरीब, आदिवासी, भटक्‍यांचे प्रश्‍न आहेत.  निवडणुकीतून अशा प्रश्‍नांची मांडणी करणे आवश्‍यक होते. अशा प्रकारची मांडणी करण्याची जबाबदारी संबंधित नेतृत्वाची असते. निवडणुकीनिमित्त पंतप्रधानांचे भाषण ऐकण्याची वारंवार संधी मिळते; मात्र ते प्रमुख मुद्‌द्‌यांवर न बोलता संस्थांवर हल्लाबोल करत आहेत. देशाचे प्रधानमंत्रिपद ही एक संस्था आहे.

राजकारणात कितीही मतभेद असले तरी संस्थेचे महत्त्व अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांची असते. आजपर्यंत मी जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्रींपासून इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची भाषणे ऐकली. तर नरसिंह राव, मनमोहनसिंह यांच्यासोबत काम केले. मात्र, या सर्वांनी संस्थांचा आदर केला. जरी विरोधातील राज्य असले तरी तेथील मुख्यमंत्र्यांचा त्यांनी सन्मानच केला. त्यांनी पदाचा सन्मान ठेवला; मात्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत, जे असा सन्मान ठेवत नाहीत. आंध्र प्रदेश, हरियाना, केरळ, पश्‍चिम बंगालमध्ये जायचे आणि तेथील मुख्यमंत्र्यांवर टीका करायची, असा त्यांचा प्रकार सुरू आहे. संस्थांचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी त्यांची आहे; मात्र मोदी हे लोकशाहीतील या संस्थांचा सन्मान ठेवत नाहीत. म्हणूनच लोकशाहीतील संस्थांचा सन्मान न ठेवणारे सरकार खाली खेचा.’’ 

ते म्हणाले, ‘‘देशात आज राफेल घोटाळ्याची चर्चा आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना बोफोर्सबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी आता सत्तेत असणारे सर्व जण विरोधात होते. त्यांनी चौकशी करण्याची मागणी केली. जॉईंट पार्लमेंटरी कमिटी करून चौकशी करण्याचे निर्देश पंतप्रधान राजीव गांधी यांनी दिले; मात्र या चौकशीतून काही निष्पन्न झाले नाही. आज केंद्रात राफेल घोटाळा झाला आहे. घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी वारंवार करण्यात येत आहे.’’ खासदार शेट्टी, खासदार महाडिक यांनीही याबाबत प्रश्‍न उपस्थित केले; मात्र केंद्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे सांगत, दाल में कुछ काला है, असा आरोप पवार यांनी या वेळी केला.  

वर्धा येथे पंतप्रधान मोदी यांनी भाषण केले. ते राज्यातील दुष्काळ, चारा छावण्या, शेतकऱ्याचे कर्ज यावर काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती; पण त्यांनी पवार कुटुंबावर टीका केली. मात्र, त्यांनी आमच्या कुटुंबाची काळजी करू नये, असा टोला पवार यांनी लगावला. या वेळी पवार यांनी नोटबंदी, रिझर्व्ह बॅंक, काळा पैसा, बेरोजगारी आदी विषयांवर चौफेर फटकेबाजी केली. 

दानवेंची उतरली नाही का?
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाषणात पाकिस्तानने देशातील ४० दहशतवादी मारल्याचा उल्लेख केला. आपण काय बोलतो, याचेही त्यांना भान नाही. मध्यंतरी तर हे शेतकऱ्यांना ‘साले’ म्हणाले होते. सत्तेची धुंदी त्यांना चढली आहे. त्यांची अजून रात्रीची उतरली नसल्याचा टोला पवार यांनी लगावताच, सभास्थळी हशा पिकला. अशाच पद्धतीने त्या अवधूत वाघ याने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांबाबत टिप्पणी केली आहे. यातून त्यांची शेतकऱ्यांबाबतची मानसिकता कळते, असे पवार म्हणाले.

कोल्हापुरातील नवरत्न
राज्यात मोठ्या संख्येने मराठा मोर्चे निघाले. शासनाने त्यांना विविध आश्‍वासने दिली आहेत. या आश्‍वासनपूर्तीसाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीचे प्रमुख कोल्हापूरचे रत्न असल्याचा टोला पवार यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला. तसेच दिलेल्या आश्‍वासनातील एकही आश्‍वासन पूर्ण झाले नसून, मराठा समाजाची फसवणूक झाल्याचा आरोप पवार यांनी केला.

शेट्टी इमान राखणारे
खासदार शेट्टी यांनी मोदी सरकारला पाठिंबा दिला होता; मात्र हे सरकार शेतकरीविरोधी असल्याने त्यांनी सत्तेला लाथ मारली. देशभर शेतकऱ्यांना जागृत करून त्यांनी संघटन बांधले. ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्याशी व काळ्या आईशी इमान असणारे नेते असल्याचे गौरवोद्‌गार पवार यांनी या वेळी काढले.

गांधी कुटुंबावरील टीका अयोग्य
पंतप्रधान मोदी हे सातत्याने गांधी कुटुंबीयांना टार्गेट करत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी नेहरू तेरा वर्षे तुरुंगात गेले होते. इंदिरा गांधीही स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगात गेल्या होत्या. पंतप्रधान झाल्यानंतर इंदिरा गांधींनी देशाच्या सुरक्षेसाठी कधी तडजोड केली नाही. अशा कुटुंबावर टीका करणे योग्य नाही, असे पवार यांनी सांगितले. 

अंबानींची कंपनी बनली एजंट
‘‘राफेल निर्मितीसाठी अंबानी यांनी कंपनी स्थापन केली. ज्यांना कागदी विमान उडवायचा अनुभव नाही, त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. खरे तर संरक्षण साहित्य एजंटामार्फत खरेदी न करण्याचे संरक्षण खात्याचे नियम आहेत; मात्र हे नियम बाजूला ठेवून एजंटमार्फतच ही खरेदी सुरू आहे. सुमारे ३५० कोटींचे विमान १६०० कोटी रुपयांना खरेदी केले जात आहे. मग मधला गाळा गेला कुठे? ‘न खाने दूँगा’ म्हणणारे, या विषयावर का बोलत नाहीत?’’ असा सवाल पवार यांनी केला. 

मोदींनी काळजी करू नये
मोदींनी वर्धा येथील भाषणात, पवार यांच्या घरात वाद असल्याचे तसेच त्यांच्या घरातील लोकांवर त्यांचा अधिकार राहिला नसल्याचे वक्‍तव्य केले. मात्र, मोदींनी आमच्या कुटुंबाची काळजी करू नये. आमची आई कोल्हापूरची. या संस्कारांचा हात कोणी धरू शकत नाही, असे पवार यांनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

मेळाव्याला महापौर सरिता मोरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील,  काँग्रेस शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, माजी खासदार जयवंतराव आवळे, माजी आमदार के. पी. पाटील, संजीवनी गायकवाड, उद्योजक व्ही. बी. पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे, संचालक अरुण डोंगळे, बाळासाहेब खाडे, प्रा. जयंत पाटील, दगडू भास्कर, काँग्रेसच्या सरलाताई पाटील, विश्‍वास देशमुख, ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, सावकार मादनाईक,  प्रा. जालंधर पाटील, डॉ. नंदिनी बाभूळकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा संगीता खाडे, शहराध्यक्षा जहिदा मुजावर, राजेंद्र गड्ड्यानवर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नाना गाठ, यशवंत हप्पे, अरुंधती महाडिक, मानसिंगराव गायकवाड, जिल्हा बॅंकेचे संचालक बाबासाहेब पाटील - आसुर्लेकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com