Loksabha 2019 : तरुणाईला चौकीदार नाही; मालक बनवायचंय - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

देशात सध्या सूडाचे राजकारण सुरू आहे. मोदींना विरोध करणाऱ्या सर्वांवर सूडबुद्धीने कारवाई सुरू आहे. यात तमिळनाडूच्या खासदार कानिमोळी यांच्या घरावर धाड टाकली. मात्र, त्यातून त्यांना काही मिळाले नाही. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू जे काही काळापूर्वी मोदींच्या सत्तेत सहभागी होते, त्यांच्याच सहकारी अधिकाऱ्यांवर धाडी टाकल्या. कर्नाटकातील ज्येष्ठ नेते, माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातेवाईक व काही अधिकाऱ्यांवरही धाडी टाकल्या. कशासाठी असे करत आहात?

कोल्हापूर - देशातील तरुणाईला बेरोजगारीच्या खाईत घालविण्याचे धोरण केंद्र सरकारकडून अवलंबले जात आहे. देशातील शेतकरी, कष्टकरी, तरुण, कामगार हा देशोधडीला लागला आहे. पंतप्रधान मोदी स्वत:ला देशाचे चौकीदार असल्याचे व अनेकांना चौकीदार होण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, आम्हाला चौकीदाराची नव्हे, तर मालकाची गरज आहे. देशातील तरुणाई, शेतकरी, कष्टकऱ्याला आम्हाला मालक बनवायचे आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. गांधी मैदानात झालेल्या विराट सभेत ते बोलत होते. 

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक व हातकणंगले मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ गांधी मैदान येथे सभेचे आयोजन केले होते. विराट सभेत पवार यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली.

खासदार पवार म्हणाले, ‘‘देशात सध्या सूडाचे राजकारण सुरू आहे. मोदींना विरोध करणाऱ्या सर्वांवर सूडबुद्धीने कारवाई सुरू आहे. यात तमिळनाडूच्या खासदार कानिमोळी यांच्या घरावर धाड टाकली. मात्र, त्यातून त्यांना काही मिळाले नाही. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू जे काही काळापूर्वी मोदींच्या सत्तेत सहभागी होते, त्यांच्याच सहकारी अधिकाऱ्यांवर धाडी टाकल्या. कर्नाटकातील ज्येष्ठ नेते, माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातेवाईक व काही अधिकाऱ्यांवरही धाडी टाकल्या.

कशासाठी असे करत आहात? तुम्हाला ही सत्ता विरोधकांवर धाडी टाकण्यासाठी दिली आहे का, असा प्रश्‍न करत या सर्व विरोधकांना मोदींचा पराभव करण्यासाठी जनता साथ देईल, असा विश्‍वास पवार यांनी यावेळी व्यक्‍त केला. पवार म्हणाले, ज्या कुटुंबाने देशासाठी बलिदान दिले, अशा कुटुंबासमोर नतमस्तक होण्यात काहीही गैर नाही. मात्र, देशासाठी खस्ता झेललेल्या कुटुंबाची तुम्ही किती प्रतिष्ठा राखली? अशा शब्दात पवार यांनी मोदींवर निशाणा साधला. 

तसेच एकाच कुटुंबातील आई आणि मुलाची हत्या झाली. तरीही सामाजिक कार्यात राहण्याचे शौर्य त्यांची पुढची पिढी दाखवत आहे, असे सांगत गांधी कुटुंबीयांचे श्री. पवार यांनी कौतुक केले. देशातील निवडणुकीकडे जगाचे लक्ष आहे. त्याचे कारणही येथील लोकशाहीला असलेला धोका हे आहे. शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या लोकशाही राष्ट्रात लोकशाहीला आव्हान देण्याचा प्रयत्न झाला. तेथील परिस्थिती आपण जाणतो. देशातही आजपर्यंत अनेक पंतप्रधान झाले. मात्र, मोदी नावाचे पंतप्रधान देशाला वेगळ्या वळणावर घेऊन जात असल्याची टीका पवार यांनी केली.

पंतप्रधान मोदी हे बुधवारी अकलूजमध्ये आले होते. त्यांच्या व्यासपीठावर आमच्यातून नाराज होऊन गेलेले विजयसिंह मोहिते पाटील होते. त्यांचे दोन साखर कारखाने आहेत. शेजारील माढा मतदारसंघातील उमेदवार निंबाळकर होते. त्यांचाही एक साखर कारखाना आहे. बारामतीच्या उमेदवार असलेल्या कुल यांचाही एक साखर कारखाना आहे. ते देखील मोदींच्या व्यासपीठावर होते. ज्या सोलापुरात ही सभा झाली, तिथे साखर कारखान्यांचे जाळे आहे. असे असताना मोदी माझ्यावर साखर कारखानदारांची बाजू घेत असल्याबद्दल टीका करतात. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बाजू घेणं चुकीचे आहे का? असा प्रश्‍नही पवार यांनी केला.
 
५६ इंचाची छाती मोजली नाही
मोदी दरवेळी ५६ इंचाची छाती असल्याचे सांगतात. आम्ही ती कधी मोजली नाही. ते सांगतात, म्हणजे असेलही कदाचित. मात्र, तीन वर्षे महाराष्ट्राचा कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या तुरुंगात आहे. तुमची ५६ इंचाची छाती असेल तर त्याला देशात का नाही आणले, असा प्रश्‍नही पवार यांनी केला. 

शेट्टींची बॅट तळपणार
हातकणंगले मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार राजू शेट्टी हे संसदेत शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा आवाज आहेत. शेतकरी हितासाठी झटणारा हा देशातील एकमेव खासदार आहे. त्यांचे चिन्ह बॅट आहे. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा, देशातील क्रिकेटचा अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानातील बॅट लोकसभेच्या रिंगणातही तळपल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

खासदार महाडिक हे खणखणीत नाणं
खासदार महाडिक यांना सलग तीन वर्षे संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. ते धडाडीचे युवा नेते आहेत. हे नाणं बंदा रुपया आहे. देशाच्या संसदेत उत्कृष्ट काम करणारा युवा नेता आहे. कमी कालावधीत मोठा निधी आणण्याचे काम त्यांनी केलं आहे. त्यांच काम पाहिलं, की ऊर भरून येतो. अशा या तरुण खासदाराला पुन्हा एकदा संसदेत पाठवा, असे आवाहन पवार यांनी केले. 

तक्रारीतून कर्जमाफी गेली
देशातील शेतकऱ्यांवर असलेलं संकट दूर करण्यासाठी ७१ हजार कोटींची कर्जमाफी केली. कोल्हापूरच्याही शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली. मात्र, काही लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे ११२ कोटी रुपये परत गेले. अशा तक्रारी करून तुम्ही काय मिळवलं, असा प्रश्‍नही पवार यांनी केला. 

विरोधक संध्याकाळी असतात कुठं?
महाडिक यांच्या विरोधात असलेले उमेदवार करतात काय? त्यांचा संध्याकाळी कार्यक्रम काय असतो? त्यांचा दृष्टिकोन काय, याचीही मतदारांनी माहिती घ्यावी. मोदींना पंतप्रधान करा म्हणून हे लोक मतदान मागतात. मुलगी द्यायची झाली तर ती मुलाकडे बघून देतात. वडिलांकडे पाहून मुलगी पसंत करत नाहीत, असा टोलाही श्री. पवार यांनी लावला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Sharad Pawar comment in Kolhapur