
राष्ट्रवादीची बूथ समित्यांची नुकतीच बैठक झाली. त्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगली लोकसभा व विधानसभेच्या जागांवर दावा केला आहे.
Sangli : राजकारण तापलं! लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 'हे' दोन बडे नेते एकत्र; भेटीत कोणती झाली चर्चा?
सांगली : खासदार संजय पाटील (Sanjay Patil) आणि वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील (Vishal Patil) यांच्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नुकतीच काही काळ एकत्रित बैठक झाली. त्याची जिल्हा बँकेत जोरदार चर्चा सुरू होती.
लोकसभा निवडणूक (Loksabha Election) जवळ आल्यामुळे संभाव्य उमेदवारांची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडूनही हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेस पक्षामधून विशाल पाटील यांचे नाव लोकसभेसाठी पुढे आले आहे.

मुंबईमध्ये काँग्रेसची नुकतीच बैठक झाली. त्या बैठकीतही विशाल पाटील यांना निवडणुकीसाठी तयारीला लागा , असे सांगितले आहे. त्याच वेळी भाजपकडून खासदार पाटील यांनी पुन्हा एकदा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीसंदर्भात खासदार पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता, ‘मी जत्रेतला पैलवान नाही; कुस्तीच्या फडातला पैलवान आहे,’ असे वक्तव्य केले होते.
राष्ट्रवादीची बूथ समित्यांची नुकतीच बैठक झाली. त्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगली लोकसभा व विधानसभेच्या जागांवर दावा केला आहे. आज दोन्ही नेते जिल्हा बँकेत काही काळ एकत्रित आले होते. त्यांच्यात झालेल्या बैठकीची चर्चा सुरू होती. याबाबत दोघांना विचारले असता कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, दिवसभर या दोघांचीच चर्चा बँकेच्या आवारात सुरू होती.