रणधुमाळीत पाण्याचा खेळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

बेजबाबदारपणाचा फटका...
शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहायला लागू नये, याची जबाबदारी पालिकेने नेहमीच पार पाडणे आवश्‍यक आहे. निवडणुकीच्या वातावरणात तर ते अत्यंत महत्त्वाचे. अन्यथा, त्याचा फटका नेत्याला बसू शकतो, याची जाणीव पदाधिकाऱ्यांना असणे आवश्‍यक आहे.

सातारा - लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना सातारकरांना मात्र पाण्यासाठी रस्त्यावर येण्याची वेळ आज आली. त्यामुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. ढिसाळ कारभाराचा फटका खासदार उदयनराजेंना बसू नये, याची दक्षता पालिकेने घेणे गरजेचे असल्याचे या वेळी संतप्त नागरिकांनी बोलून दाखवले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. खासदार उदयनराजे भोसले व भाजपचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या जिल्ह्यातील विविध भागात होणाऱ्या प्रचार दौऱ्यांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने उदयनराजेंच्या कार्यपद्धतीवर तसेच विकासात कमी पडल्याचा आरोप होत आहे. उदयनराजेंची ही खासदारकीची तिसरी निवडणूक आहे. त्यामुळे अँटी इनकंबन्सीचा त्यांना मतदारसंघातील विविध भागात फटका बसेल, असे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत साताऱ्यात उदयनराजेंना मोठे 
मताधिक्‍य मिळण्यासाठी शहरातील वातावरण योग्य राहणे आवश्‍यक आहे. परंतु, शहरामध्ये पालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांना याबाबत गांभीर्य नसल्याचे आज सकाळी समोर आले.

समर्थ मंदिर ते राजवाडा रस्त्याच्या परिसरातील नागरिकांना विशेषत: तुळजाभवानी कॉम्प्लेक्‍स, साई हेरिटेज, साई प्रेस्टीज, गोल मारुती परिसर, बोकील बोळ, कोल्हटकर आळी, सुपनेकर पिछाडी या परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पाणी मिळण्यात अडचणी होत आहेत. अगदी वर्षाच्या प्रारंभाच्या गुढीपाडव्याच्या सणावेळीही पाण्याची टंचाई होती. गेल्या चार दिवसांपासून तर पाणी येणेच बंद झाले. याबाबत संबंधित नागरिकांनी तसेच प्रभागातील नगरसेवक धनंजय जांभळे यांनी पाणीपुरवठा विभागाकडे लेखी व तोंडी तक्रारी केल्या होत्या. परंतु, त्यांची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. त्याचा परिणाम नागरिकांच्या उद्रेकात झाला.

आज सकाळी परिसरातील नागरिकांनी तुळजाभवानी कॉम्प्लेक्‍सजवळ रास्ता रोको केला. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नगरसेवक जांभळेही त्या ठिकाणी आले. अनेकदा सांगूनही काम होत नसल्यामुळे त्यांनीही नागरिकांच्या आंदोलनाला साथ दिली. ही गोष्ट समजल्यावर पालिका प्रशासनाला जाग आली. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले. काम करण्याचे आश्‍वासन दिले. परंतु, प्रत्यक्ष कामाला सुरवात झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला. त्यामुळे तातडीने काम सुरू करावे लागले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election Water Shortage Agitation Municipal Satara