कोल्हापूरः लोकसभा निकालाचे पडसाद महापौर निवडीत उमटणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मे 2019

एक नजर

  • लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही काँग्रेसला महापौर निवडीचे वेध.
  • लोकसभा निकालाचे पडसाद महापौर निवडीत उमटण्याची चिन्हे. 
  • विद्यमान महापौर सरिता मोरे यांची सहा महिन्यांची मुदत संपणार येत्या दहा जूनला. 
  • ॲड. सूरमंजिरी लाटकर आणि मोरे यांच्यात सहा महिन्यांपूर्वी मोठी चुरस निर्माण झाली होती. अखेर आमदार हसन मुश्रीफ यांनी काढला सहा महिन्यांचा तोडगा. 

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही काँग्रेसला महापौर निवडीचे वेध लागतील. लोकसभा निकालाचे पडसाद महापौर निवडीत उमटण्याची चिन्हे असून याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

विद्यमान महापौर सरिता मोरे यांची सहा महिन्यांची मुदत येत्या दहा जूनला संपते. ॲड. सूरमंजिरी लाटकर आणि मोरे यांच्यात सहा महिन्यांपूर्वी मोठी चुरस निर्माण झाली होती. अखेर आमदार हसन मुश्रीफ यांनी सहा महिन्यांचा तोडगा काढला. काँग्रेस तसेच राष्ट्रवादीकडून लाटकर यांचे नाव पुढे आल्यास त्यास विरोधी भाजप-ताराराणी आघाडीचा विरोध होता. 

मोरे यांचे नाव पुढे आल्यास उमेदवारी अर्ज भरणार नाही, असेही संकेत होते; मात्र विरोधी आघाडीतर्फे जयश्री जाधव यांचा अर्ज भरला गेला. त्यामुळे महापौरांचे पती नंदकुमार मोरे नाराज झाले. लोकसभा निवडणुकीने महापालिकेच्या राजकारणाचे संदर्भ बदलून गेले.

राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचार सभेला महापौर उपस्थित राहिल्या. राष्ट्रवादीचे काही नगरसेवक प्रचाराकडे फिरकले नाहीत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही त्यासंबंधी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे नगरसेवक तर ‘आपलं ठरलंय’ असे सांगत उघडपणे महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारात उतरले. महापौर पदासाठीच्या इच्छुक ॲड. सूरमंजिरी लाटकर यांचे पती राजेश लाटकर राष्ट्रवादीचे सक्रिय असूनही त्यांनी ‘आपलं ठरलंय’चा नारा देत महाडिक यांचा प्रचार करण्यास नकार दिला.

आता त्यांच्या पत्नी तर महापौर पदासाठी इच्छुक आहेत. आमदार सतेज पाटील यांचा गट ठामपणे लाटकर यांच्या मागे राहणार, हे निश्‍चित आहे. आमदार मुश्रीफ यांनाही लाटकर यांच्याबाबत दुमत नाही. सहा महिन्यांचा शब्द पाळण्याच्या अटीवर महापौरपद दिले गेले आहे. लाटकर यांनी विरोधी काम केल्याचा मुद्दा चर्चेत येऊ शकतो; मात्र बडी मंडळी पक्ष विरोधी काम करत असतील त्यांना पुन्हा सांभाळून घेत असाल तर लाटकर यांनाही हाच नियम लावावा, असाही मुद्दा पुढे येऊ शकतो.

राष्ट्रवादीचे खासदार महाडिक या निवडणुकीत विजयी झाले तर ते विद्यमान महापौरांना पाठिंबा देतील. लाटकर यांनी विरोधात काम केल्यामुळे ते त्यांच्या पाठीशी असणार नाहीत; मात्र प्रा. मंडलिक विजयी झाल्यास लाटकर यांचा मार्ग सुकर होईल. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागतो, यावर बरीच गणिते अवलंबून आहेत. पद्माराजे गार्डन आणि सिद्दार्थनगर प्रभागाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यास महापौर निवड पुढे जाऊ शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha2019 result will affects on Mayor election