दिलासा.... लांब पल्ल्याच्या गाड्या ट्रॅकवर: रेल्वे धावणार कधीपासून ते वाचा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

भारतीय रेल्वेकडून संपूर्ण देशात 1 जूनपासून सुरू केल्या जाणाऱ्या दोनशे प्रमुख गाड्यांमध्ये गोवा ते निजामुद्दीन आणि यशवंतपूर ते निजामुद्दीन या दोन गाड्या बेळगाव, मिरज, कराड, सातारा, पुणे स्थानकावरून जाणार आहेत.

मिरज (जि. सांगली) : भारतीय रेल्वेकडून संपूर्ण देशात 1 जूनपासून सुरू केल्या जाणाऱ्या दोनशे प्रमुख गाड्यांमध्ये गोवा ते निजामुद्दीन आणि यशवंतपूर ते निजामुद्दीन या दोन गाड्या बेळगाव, मिरज, कराड, सातारा, पुणे स्थानकावरून जाणार आहेत. त्यासाठीची तिकीट विक्री शुक्रवारी (ता. 21) सुरू झाली. मात्र, शुक्रवार आणि काल (शनिवार) या दोन्ही दिवसांत या दोन्ही गाड्यांसाठीचे एकही तिकीट मिरज रेल्वे स्थानकावरून विकले गेले नाही. दरम्यान, रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थ, औषधे, पाणी आणि अन्य विक्री सेवाही एक जूनपासून काही अटी आणि नियमास अनुसरून सुरू होणार आहे. 

केंद्रीय रेल्वे बोर्डाने एक जूनपासून देशात 200 लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये यशवंतपूर ते निजामुद्दीन आणि गोवा ते निजामुद्दीन या दोन गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांचे आरक्षण देण्यासाठी मिरज स्थानकावर शुक्रवारपासून एक खिडकी खुली करण्यात आली आहे; परंतु गेल्या दोन दिवसांत या खिडकीकडे कोणीही प्रवासी फिरकला नाही. या दोन्ही गाड्यांमध्येही केवळ राज्याबाहेर जाण्यासाठीची तिकिटे रेल्वेकडून दिली जाणार आहेत. मिरज ते सातारा अथवा मिरज ते पुणे या प्रवासाची तिकिटे दिली जाणार नसल्याचेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या दोन्ही गाड्या नियोजित पूर्वीच्या वेळापत्रकानुसार धावणार आहेत आणि सर्व नियोजित स्थानकांवर थांबणार आहेत; परंतु प्रवाशांना आरक्षण केलेल्या स्थानकाशिवाय अन्य कोणत्याही स्थानकावर रेल्वेतून खाली उतरता येणार नाही. या दोन्ही गाड्यांमध्ये प्रवाशांना सुरक्षित अंतर आणि अन्य सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे. वातानुकूलित बोगीमध्ये प्रवाशांना बेडशीट, पांघरुण, उशी (बेडरोल) हे साहित्य मिळणार नसल्याचेही रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. 

रोखीने व्यवहार नाही 
रेल्वेच्या आरक्षणापासून ते रेल्वे स्थानकात कोणतीही वस्तू विकत घेण्यासाठी प्रवाशांना यापुढे रोख रक्कम देता येणार नाही. त्यासाठी डेबिट अथवा एटीएम कार्ड किंवा फोन पे पद्धतीनेच सर्व व्यवहार काही काळासाठी करावे लागणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Long-distance trains on the track: Read when the train will run