जिल्हाधिकारी साहेब एकदा जेवायला याच हाे..!

जिल्हाधिकारी साहेब एकदा जेवायला याच हाे..!

सातारा : सडलेली द्राक्षे, किडकी सफरचंदे, कच्च्या चपात्या आणि वळवळणाऱ्या अळ्या असलेले पाणी... जिल्हाधिकारी साहेब एकदा अचानक आवर्जून या हो आमच्या वसतिगृहात जेवायला, अशी आर्त साद साताऱ्यातील मागावसर्गीय वसतिगृहातील मुले घालत आहेत. वसतिगृह अधीक्षकांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत अनेकदा अर्ज करूनही त्यांचे जिणे सुखर झालेले नाही. जिल्हाधिकारी भेट द्यायला येणार म्हटले तरी, वसतिगृहातील परिस्थिती काही दिवसांपूर्वी एक दिवस सुधारली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीच त्यांच्या प्रश्‍नात सातत्यपूर्ण लक्ष घालावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. 

मागासवर्गीय मुलांना शिक्षणाच्या सोयीसाठी राहण्याची व जेवणाची चांगली व्यवस्था व्हावी, यासाठी शासनाने विविध जिल्ह्यांत मागासवर्गीय मुलांसाठी वसतिगृहाची उभारणी केली आहे. मुलांना वसतिगृहात काय-काय सुविधा असाव्यात, त्यांना कोणत्या प्रकारचे किती अन्न मिळावे, या सर्वांची यादी शासनाच्या अध्यादेशात आहेत. त्यावरून या मुलांची शासन किती काळजी घेते असे एखाद्याला वाटेल. प्रत्यक्षात मात्र, येथील वसतिगृहामध्ये खाण्याची प्रचंड आबाळ होत असल्याच्या मुलांच्या तक्रारी आहेत. आज सकाळी कार्यालयात वसतिगृहातील समस्यांचा या मुलांनी पाढाच वाचला. 

जनावरांना टाकावयाच्या वस्तू 

शेतकरी जनावरांना टाकतो, त्या पद्धतीचा भाजीपाला वापरून जेवण बनविले जात आहे. फळांची मागणी केली तर सडलेली, किडकी फळे पुढे ठेवली जातात. चपात्या झाडूनच डब्यात भराव्या लागतात. अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण आम्हाला दिले जाते. त्यामुळे शाळा व महाविद्यालयातील अन्य मुले आमचा डबा खायला तयार नसतात. परिणामी मुलांबरोबर एकत्रित जेवता येत नसल्याचे मुलांचे म्हणणे आहे. शासकीय नियमानुसार मांसाहार तसेच तूपही दिले जात नसल्याची मुलांची तक्रार आहे. 

शिवभोजन थाळीचा आधार 

जेवणाचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा दर्जा बघून जेवणच नको असे वाटते. परंतु, बाहेर खायची आमची ऐपत नाही. त्यामुळे निमूटपणे समोर येईल ते खावेच लागायचे. शासनाने आता शिवभोजन थाळी सुरू केली आहे. त्याचा आधार काही मुलांना झाला आहे. त्यामुळे 15 ते 20 मुले शिवभोजन थाळी खात असल्याचेही मुलांनी सांगितले. काही मुले सुटीच्या काळात येथे होती. त्या वेळी मेस बंद असल्याने मुलांना दिवसाला दीडशे रुपये देण्याचा शासनाचा नियम आहे. परंतु, काही मुलांना ते पैसेही मिळालेले नाहीत, अशी मुलांची तक्रार आहे. 


वाचा : 15 वर्षीय दिराला तिने सेक्स करण्यास भाग पाडले अन्यथा मी हे करीन....

पिण्याच्या पाण्यात चक्क अळ्या 

खाण्याबरोबरच मुलांच्या पिण्याच्या पाण्याचीही समस्या आहे. आम्हाला शुद्ध पाणी मिळावे म्हणून कूपर कंपनीकडून आरओ फिल्टर मिळाला. परंतु, पाण्याची टाकी खराब असल्याने त्या फिल्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साठत गेला. गेली अनेक दिवस बंद असलेला हा फिल्टर दुरुस्त केलेला नाही. त्यामुळे अनेक दिवसांपासून मुलांना प्यायला चांगले पाणी मिळत नाही. काल तर, पाण्यामध्ये अक्षरश: अळ्या सापडल्या. त्यामुळे रात्रभर आम्ही पाणी पिले नाही, असे मुलांनी सांगितले. 

बाबासाहेबांनी खडे खाल्ले, तुम्ही कोण? 

जेवणाच्या चांगल्या सुविधेबाबत आम्ही ठेकेदाराच्या व्यवस्थापकाकडे तक्रारी केल्या. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खडे खाल्ले, कष्टाने ते शिकले. तुम्हाला काय होतय, असे उलटे बोल ऐकावे लागले. तुम्ही जादा तक्रारी केल्या तर, मला "ऍटॅक' येईल. त्यात तुमच्या घरातल्यांनाही अडकविन अशा धमक्‍या दिल्या जात आहेत. अधीक्षकांसमोर अशा घटना घडल्या. त्याबाबत त्यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या तरीही काहीच सुधारणा झालेली नाही, असे मुलांनी सांगितले. 

स्टेशनरीचे पैसे मिळाले नाहीत 

वसतिगृहातील महाविद्यालयीन मुलांना शालेय साहित्य खरेदीसाठी चार हजार रुपये देण्याचा शासनाचा नियम आहे. परंतु, शालेय वर्ष संपत आले तरी, आम्हाला स्टेशनरीचे पैसे किंवा शालेय साहित्य मिळालेले नाही अशी तक्रार मुलांनी केली. दुरुस्तीला म्हणून वसतिगृहातून डिसेंबरमध्ये बाहेर गेलेले संगणक अद्याप परत आलेले नाहीत. त्यामुळे मुलांना संगणकाचा लाभ होत नाही. सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ याबाबतच्या शासकीय तरतुदींचेही पालन होत नसल्याची तक्रार मुलांनी केली. 

तक्रारींची दखलच नाही 

विविध समस्या व सवलतींबाबत अनेकदा वसतिगृह अधीक्षकांकडे तोंडी व लेखी तक्रार केल्या. विशेषत: जेवण व स्टेशनरीबाबतच्या त्या होत्या. परंतु, त्यांच्याकडून काहीच दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आठ महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज केला होता. त्यानंतर मार्च महिन्यातही जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार अर्ज केला. परंतु, त्याचीही दखल घेतली गेली नसल्याने आमची परवड सुरू असल्याचे विद्यार्थी काकुळतीने सांगत होते. 

वाचा  : ...अन् खासदार श्रीनिवास पाटलांच्या डाेळ्यात अश्रु

जिल्हाधिकारी येणार होते तेव्हा.. 

शेखर सिंह यांनी पदभार स्वीकारला तेव्हा वसतिगृहात पहाटेपासूनच हालचाल सुरू झाली. स्वच्छता चांगली झाली, जेवणाचा दर्जाही त्या दिवशी चांगला होता. परंतु, मुलींचे वसतिगृह पाहून ते मुलांच्या वसतिगृहाकडे आले नाहीत. त्यानंतर येरे माझ्या मागल्या... प्रमाणे आहे तीच परिस्थिती वसतिगृहात झाली. त्यामुळे या प्रश्‍नामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून आमचे जीवन सुखकर करावे, अशी आर्त मागणी मुले करत होती. जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याच्या विविध भागांतून मेरिटनुसार शिक्षणासाठी आलेल्या या विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com