कन्नड शाळेत समाजकंटकांचा धुडगूस ; वर्गखोल्यांच्या कुलुपांत घातले एम-सील

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

गमेशनगरातील वसतिगृहात रविवारी (ता. 23) रात्री राडा घडल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी (ता. 24) सकाळी भाग्यनगर आणि चिदंबरनगर येथील कन्नड प्राथमिक शाळमध्ये समाजकंटकांनी विचित्र प्रकार केला.

बेळगाव : संगमेशनगरातील वसतिगृहात रविवारी (ता. 23) रात्री राडा घडल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी (ता. 24) सकाळी भाग्यनगर आणि चिदंबरनगर येथील कन्नड प्राथमिक शाळमध्ये समाजकंटकांनी विचित्र प्रकार केला. शाळा खोल्यांच्या कुलुपामध्ये एम-सील घालण्यात आल्याने शिक्षक व पालकांतून नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे. या प्रकरणी दोन्ही शाळांकडून टिळकवाडी पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. 

हे पण वाचा - या गावातील 596 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र 

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास समाजकंटकांनी भाग्यनगर आणि चिदंबरनगर येथील कन्नड प्राथमिक शाळेच्या खोल्यांच्या कुलुपांमध्ये एम-सील घातले. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी शाळा उघडण्यासाठी शिक्षक आणि कर्मचारी आले असता, कुलुपामध्ये एम-सील घालण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ही माहिती पोलिसांना दिली. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक विनय बडीगेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळेना भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर शाळेचे कुलूप उघडून मुलांना आत बसण्यास सांगण्यात आले. एकाच आवारात असलेल्या दोन्ही शाळांची कार्यालये आणि तीन खोल्यांच्या कुलुपामध्ये एम-सील घालून संशयितांनी पलायन केले आहे. 

हे पण वाचा - चोरी करून प्रेयसिला पाठवायचा सेल्फी

शाळांच्या आवारात कोणत्याही प्रकारची खबरदारी किंवा सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने समाजकंटकांचा शोध घेणे कठीण बनले आहे. त्यामुळे रात्री शाळा परिसरात बेकायदा प्रकार वाढले आहे. नशाबहाद्दरांचा वावरही वाढला असून नशेमध्ये शाळेच्या साहित्याचे नुकसान करण्यात येत आहे. याबाबत शिक्षण खाते आणि पोलिसांकडे अनेकवेळा तक्रारी करुनही कोणत्याच प्रकारची खबरदारी घेतली नाही. त्यामुळे शिक्षक आणि पालकवर्गातून नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे. रात्री शाळेला पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदनही टिळकवाडी पोलिसांना दिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: M Seal Inserted In School Room Lock