
मदनभाऊ आणि जयंतराव हे कट्टर राजकीय विरोधक. राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळी जयंतराव, आर. आर. पाटील यांच्यानंतर विष्णूअण्णा पाटील हे वसंतदादा पाटील पुतणे राष्ट्रवादीत गेले. त्यामुळे वडिलांसोबत मदनभाऊंनाही राष्ट्रवादीत जावे लागले होते.
सांगली - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या सोपवण्यात आल्या आहेत. ते अर्थमंत्री झाले आहेत. याआधी त्यांनी तब्बल नऊ वर्षे अर्थमंत्रीपद भूषवले आहे. आघाडी सरकारच्या काळात ते दीर्घकाळ राज्याचा आर्थिक गाडा सांभाळत होते. त्याआधी ते ग्रामविकासमंत्री होते आणि त्यानंतर गृह आणि पुन्हा ग्रामविकास अशी खाती त्यांनी सांभाळली. आता दहाव्यांदा ते अर्थसंकल्प मांडून नवा विक्रम स्थापन करतील.
परंतू, जयंतरावांनी अर्थमंत्री होऊ नये, त्यांनी दुसरं ताकदीचं खातं घ्यावं, अशी सूचना त्यांच्या एकेकाळच्या कट्टर राजकीय विरोधकाने केली होती. त्या विरोधकाचं नाव आहे, दिवंगत मदन विश्वनाथ पाटील अर्थात सांगलीचे माजी मंत्री मदनभाऊ पाटील. मदनभाऊ आणि जयंतराव हे कट्टर राजकीय विरोधक. राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळी जयंतराव, आर. आर. पाटील यांच्यानंतर विष्णूअण्णा पाटील हे वसंतदादा पाटील पुतणे राष्ट्रवादीत गेले. त्यामुळे वडिलांसोबत मदनभाऊंनाही राष्ट्रवादीत जावे लागले होते.
हेही वाचा - खासदार संजयकाका पाटलांसह सात जणांचा दर्जा काढला
मदन पाटील हे एकेकाळी जयंत आणि आर. आर. यांचे नेते म्हणून काम करत होते. त्यांचा जिल्ह्याच्या राजकारणात मोठा वट होता. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंड केले आणि अपक्ष आमदार होत पुढे कॉंग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्विकारले. त्यानंतर मदन - जयंत असा राजकीय संघर्ष धुमसत राहिला. इतका की मदन पाटील यांचे राजकीय करिअर संपवण्याचा विडाच जयंतरावांनी उचलला होता. त्यात त्यांना अनेकदा यशही आले.
हेही वाचा - VIDEO : भारत मदने विरुद्ध विजय गुटाळ कुस्तीत जिंकले कोण ? पाहा
मदन पाटील यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. त्याआधी एक वर्षभरच मदन पाटील आणि जयंत पाटील यांच्यात समझोता झाला होता. दोघेही एक झाले होते. सांगली जिल्ह्यासाठी हे धक्कादायक होते. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत दोन्ही पाटील एकत्र आले. त्यानंतर मदनभाऊ आणि जयंतरावांमध्ये सख्य निर्माण झाले होते, मात्र दुर्दैवाने मदनभाऊ यांचे आकस्मित निधन झाले. नव्या राजकीय मैत्रीपर्वाची सुरवात होण्याआधीच अखेर झाली. मदनभाऊंच्या अंत्यसंस्कारावेळी जयंतरावांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. जयंतराव म्हणाले होते, की ""मदनभाऊ मला नेहमी म्हणायचे, "कसलं खातं घेऊन बसलाय. आता पुन्हा अर्थमंत्री होऊ नका. काहीतरी ताकदीचं आणि कामाचं खातं घ्या.'' योगायोगाने मदनभाऊंच्या या सूचनेनंतर काही काळातच जयंतरावांकडे गृहखाते आले होते. आता ते पुन्हा एकदा अर्थमंत्री झाले आहेत. त्यामुळे सांगलीकरांना मदनभाऊंची ती सूचना पुन्हा आठवते आहे.