डॉ. बाबासाहेबांचे कपाळ लालभडक रंगले होते. पॅन्ट पाण्याने गुडघ्यापर्यंत भिजली होती. कळकटलेल्या लुगड्यातील भगिनींना पाहून त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागले.
अंकलखोप : हजारो वर्षे गुलामीत जगणाऱ्या दलितांची अस्मिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी जागी केली. त्यांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी न्याय, समता आणि बंधूता हा बुद्धांचा विचार दिला. या विचाराच्या आधारावर चळवळ उभी केली. त्यांच्या चळवळीत लाखो अनुयायी सहभागी झाले. देशाच्या कानाकोपऱ्यात दलित, वंचित, उपेक्षितांच्या जाणिवा जागृत होण्यासाठी त्यांनी सभा घेतल्या, मोठी आंदोलने केली. त्यापैकीच २४ डिसेंबर १९३९ रोजी अंकलखोप येथे सभा झाली. त्यांच्या पदस्पर्शाने अंकलखोपची (Ankalkhop) भूमी पुण्यवंत झाली आहे.