शिवजयंतीनिमित्त धावणार महाराणी ताराराणी एक्‍स्प्रेस

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 February 2019

महाराष्ट्रातून सुमारे दोन हजारांहून अधिक शिवभक्त दिल्लीला जाणार आहेत. त्यासाठी कोल्हापूरहून दिल्लीला ताराराणी एक्‍स्प्रेस या विशेष रेल्वेची व्यवस्था केली आहे. इच्छुकांनी न्यू पॅलेस येथे नोंदणी करावी, असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी केले आहे.

कोल्हापूर - खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रयत्नातून दिल्लीमध्ये शिवजयंतीचा भव्य महोत्सव गेल्या वर्षापासून सुरू झाला. या वर्षी शिवजयंती व्यापकपणे साजरी करण्यात येणार असून महाराष्ट्रातून सुमारे दोन हजारांहून अधिक शिवभक्त दिल्लीला जाणार आहेत. त्यासाठी कोल्हापूरहून दिल्लीला ताराराणी एक्‍स्प्रेस या विशेष रेल्वेची व्यवस्था केली आहे. इच्छुकांनी न्यू पॅलेस येथे नोंदणी करावी, असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी केले आहे.

आसाम, मणिपूर, नागालॅंड, अरुणाचल प्रदेश या राज्यांचे कलाकार सहभागी होतील. पंजाब, हरियाणा आणि उत्तर भारतामधील लोककलादेखील पाहायला मिळतील. संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास १५०० कलाकार येणार आहेत. त्यांना दिल्लीमध्ये येण्यासाठी एका विशेष रेल्वेची व्यवस्था केली आहे.

या विशेष रेल्वे गाडीला ‘महाराणी ताराराणी एक्‍स्प्रेस’ असे नाव दिले आहे. रेल्वे शनिवार (ता. १६) छत्रपती शाहू टर्मिनस (कोल्हापूर रेल्वे स्थानक) येथून दुपारी २.०० वाजता निघणार आहे व मंगळवारी (ता. १९) रोजी सांगता समारंभानंतर रात्री ९ वाजता दिल्लीहून कोल्हापूरकडे रवाना होणार आहे. यातून येणाऱ्या सर्व शिवभक्तांची राहण्याची व जेवणाची मोफत सोय केली आहे.

शिवजयंतीनिमित्त दिल्लीत होणारे कार्यक्रम 
या दिवशी सकाळी वारकरी भजन होणार आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पोवाडे गायिले जातील. पाळणा गायन करून शिवजन्म सोहळा होईल. या वेळी निघणाऱ्या शोभायात्रेत फेटे बांधून शिवभक्त सहभागी होतील. या वेळी महाराष्ट्रातील दोन हजार कलाकार पारंपरिक वेशभूषेत लोककला सादर करतील. यांमध्ये वारकरी पथक, ढोल-ताशा पथक (पुणे, कोल्हापूर व नाशिक). हलगी वादन पथक, धनगरी ढोल (गज नृत्य),  ध्वज पथक, लेझीम पथक यांचा समावेश आहे. दुपारी ३ वाजता ऐतिहासिक पोवाड्यांचे सादरीकरण होईल. त्यानंतर महाराणी ताराराणी यांच्या जीवनावरील लघुनाटिका सादर होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharani Tararani Express run for Shivjayanti event Delhi