
महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगाव दौरा घोषित करताच कर्नाटकाला मिरच्या झोंबण्यास सुरु झाले.
Border Dispute : महाराष्ट्र मंत्र्याच्या दौऱ्याने कर्नाटकाला झोंबल्या मिरच्या
बेळगाव - महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगाव दौरा घोषित करताच कर्नाटकाला मिरच्या झोंबण्यास सुरु झाले असून, सध्या महाराष्ट्र-कर्नाटक राज्यात तणावस्थिती आहे. या दरम्यान मंत्र्यांनी बेळगावला येणे योग्य नाही. त्यामुळे मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, या आशयाचे पत्र कर्नाटकाच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्र मुख्य सचिवांना फॅक्सद्वारे पाठविल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
मुख्यमंत्री बोम्मई आज (ता.२) बेळगाव दौऱ्यावर असून, रामदूर्गमधील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आले होते. या दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी अलिकडे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील तणावस्थितीचा दाखला दिला आहे. याशिवाय यापूर्वी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कर्नाटकात येण्यापासून ज्या पध्ततीने निर्बंध घातले. त्यापध्दतीने कारवाई हाती घेतली जाईल. कृतीशिल पावले उचलण्यात येईल, अशी डरकाळी बोम्मई यांनी फोडली.
महाराष्ट्रातील महाराष्ट्र्-कर्नाटक सीमाप्रश्न समन्वय मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई आणि सीमाप्रश्न उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशिल माने येत्या ६ डिसेंबरला बेळगाव दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची माहिती व प्रवास दौऱ्याचा तपशिल कर्नाटक राज्याच्या मुख्य सचिवांना पाठविला असून, त्यात त्यांनी वाय सुरक्षेची मागणी करण्यात आली आहे. त्याला कर्नाटक राज्य शासनाच्या मुख्य सचिवांनी उत्तर पाठविले आहे.
फॅक्सद्वारे दिलेल्या उत्तरात महाराष्ट्र-कर्नाटक दोन्ही राज्याच्या दरम्यान सध्या तणावस्थिती आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावला भेट देणे योग्य नाही. त्यामुळे कर्नाटकाच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना बेळगावला येऊ नये, या आशयाचे पत्र पाठविले आहे. त्यामुळे या संदर्भात कर्नाटक परत एकदा रडिचा डाव सुरु केला आहे. महाराष्ट्राच्या नेत्यांनी दौरा घोषित केल्यामुळे कर्नाटक नेत्यांना मिरच्या झोंबण्यास सुरु झाले असून, त्यांच्यावर निर्बंध घालण्याची भाषा सुरु केली आहे.