आजपासून सुरु होणार कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा ; प्रवासीसंख्येवरुन बसेसची संख्या वाढवली जाणार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

परिवहन महामंडळाकडून चार दिवसांचे ट्रायल

बेळगाव : कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य परिवहन सेवा सुरू होत असतानाच कर्नाटकच्या वायव्य परिवहन महामंडळाकडून आधी चार दिवसांचे ट्रायल घेतले जाणार आहे. ज्या मार्गावर प्रवासीसंख्या अधिक असेल. त्या मार्गावर पुढील चार दिवसांनंतर बसेसची संख्याही वाढविली जाईल. तर जेथे अत्यल्प प्रतिसाद मिळेल, तेथे आणखी काही दिवस सेवा खंडित ठेवली जाईल.

बेळगाव विभागातून लॉकडाउनपूर्वी महाराष्ट्रात रोज २६५ हून अधिक बसेस धावत होत्या. त्यामुळे बेळगाव विभागाला रोज त्यातून १० लाखांहून अधिक महसूल प्राप्त होत होता. यात कोल्हापूर, मुंबई, शिर्डी व नाशिक मार्ग मंडळासाठी फायदेशीर आहेत. तर बेळगाव-चंदगड, बेळगाव-सावंतवाडी, कणकवली, कुडाळ रुटही अधिक महसूल मिळवून देणारा आहे. लॉकडाउननंतर पूर्णच चित्र पालटले असून पुणे आणि मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. त्यामुळे सध्या तरी या मार्गावर प्रवाशांचा कितपत प्रतिसाद मिळेल. याबाबत सांशकता आहे.

हेही वाचा - त्रिसदस्य समितीचा वॉच ;  खासगी कोविड सेंटरसाठी दरपत्रक निश्‍चित

कोल्हापुरातही संसर्ग वाढल्याने याठिकाणी जनता कर्फ्यू लागू केला होता. बेळगाव आणि चंदगड तालुक्‍यांचे नाते घट्ट आहे. चंदगडवासीयांना बेळगाव ही बाजारपेठ आहे. त्यामुळे येथून प्रतिसाद चांगला मिळू शकतो, असा अंदाज आहे. मंगळवार (२२) पासून आंतरराज्य सेवा सुरू होत असताना बसफेऱ्यांची संख्या मात्र निश्‍चित केलेली नाही. पुढील चार दिवस या मार्गावर बसेस सोडण्यात आल्यानंतर ज्या मार्गावर प्रवासी कमी असतील, तेथे बसेसची संख्याही कमी असेल.

मंगळवारी परिवहन सेवेच्या पहिले दिवशी मुंबईला रात्री आठ वाजता सामान्य बस, शिर्डीसाठी सव्वानऊ वाजता नॉन एसी स्लीपर, पुणे-पिंपरी मार्गावर ११ वाजून २० मिनिटांनी व बारा वाजता अशा दोन नॉन एसी स्लीपर बसेस धावतील. परिवहनच्या संकेतस्थळावरही अद्याप बसेसची संख्या कमी ठेवली आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहूनच पूर्वीप्रमाणे बसेस सोडल्या जातील.

हेही वाचा - नात्याला नख  लागते तेव्हा..! 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra karnataka bus service start from today parivahan mandal trained for four day in beigum