बेळगाव : मराठी भाषिकांची ताकद वाढली तरच मुजोरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जरब बसणार असुन ग्राम पंचायत निवडणुकीत तालुक्यातील जास्तीतजास्त ग्राम पंचायतीवर भगवा फडविण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन तालुका महाराष्ट्र एकिकरण, समितीच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठींबा देण्याचा निर्णय तालुका समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
तालुका म. ए. समितीची बैठक मराठा मंदिर येथे शनिवारी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर होते. यावेळी किणेकर कोरोनामुळे समितीची बैठक घेण्यास अडचण येत होती. मात्र पदाधिकारी सातत्याने चर्चा करत होते. मराठीतुन कागदपत्रे द्या या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली असुन भूसंपादनासह विज बिल माफ, रस्ते आणि प्रश्नांवर समितीने आवाज उठविला आहे. समितीमुळेच अनेक गावांची जागा वाचली आहे. त्यामुळे समितीविरोधात गरळ ओकणाऱ्यांना जागीच उत्तर देणे आवश्यक असुन राष्ट्रीय पक्षांना पैसे वाटल्याविाय आणि अफवा पसरविल्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही.
एका दिवसाच्या मजेसाठी पाच वर्षांची सजा भोगू नका. त्यामुळे याविरोधात सर्वांनी मतभेद विसरुन कार्य करावे. ग्रामपंचायत म. ए. समितीसाठी महत्वपुर्ण असुन समितीचा भगवा झेंडा फडकवणे गरजेचे आहे. समिती ही एका ध्येयासाठी कार्य करीत आहे. त्यामुळे सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी मराठी माणसाने एकजूट दाखवावी असे मत व्यक्त केले. तसेच शेतकरी विरोधी कायद्यांबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात येईल असे सांगितले.
ऍड. सुधीर चव्हाण म्हणाले, ग्रामपंचायत ही महत्त्वाची असुन समितीचा पाया घट्ट करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात योग्य नियोजन करणे आणि उमेदवार देणे आवश्यक आहे. जास्तीतजास्त ठिकाणी समितीचाच उमेदवार निवडून येईल यासाठी काळजी घेणे असुन समितीचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी सर्वांनी एकत्र लढा देऊया असे मत व्यक्त केले.
जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी मराठी भाषा ही आपली मातृभाषा असुन प्रत्येकाने ग्रामपंचायत निवडणूक ही सीमा लढ्याचा एक भाग असुन युवा वर्ग समितीच्या कार्यात झोकुन देऊन कार्य करीत आहे. त्यामुळे युवा वर्गाला सोबत घेऊन हा लढा यशस्वी करणे गरजेचे आहे. मराठी भाषा टिकवण्यासाठी पंचायतीत समितीचा झेंडा फडकवणे आवश्यक असुन प्रत्येकाने यासाठी प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले.
सरचिटटणीस एल. आय. पाटील यांनी प्रास्तविक करुन येळ्ळुर येथील बैठकीची माहिती दिली. जिल्हा पंचायत सदस्या माधुरी हेगडे ऍड. शाम पाटील, सुरेश राजूकर, बी. एस. पाटील, अप्पासाहेब कीर्तने, नारायण कदम, शिवाजी राक्षे, राजू किणयेकर, मनोहर किणेकर, धनंजय पाटील, के. वाय. घाटेगस्ती, दीपक पावशे, भाऊ तुडयेकर, कमल मनोळकर, शिवाजी पाटील, बाबाजी देसुरकर, वासू संताजी, मनोहर होनगेकर, अनिल हेगडे, सुभाष मरुचे, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, महादेव कंग्राळकर, चंदु पाटील आदी उपस्थित होते.
समितीच्या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी तालुका समितीच्या कार्यालयात वकील मंडळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. याचा उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
संपादन- अर्चना बनगे