खानापूर : पुन्हा भगवा; अनिल बाबर विजयी | Election Results 2019

Anil Babar Sadashivrao Patil
Anil Babar Sadashivrao Patil

विटा - खानापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार अनिल बाबर यांनी 1 लाख 16 हजार 974 मते मिळवत भगवा भडकवला. 26 हजार 291 मताधिक्‍य घेतले. तर विरोधी अपक्ष उमेदवार सदाशिवराव पाटील यांना 90 हजार 683 मते मिळाली. एकूण 2 हजार 928 नोटाचे मतदान झाले.

निवडणुकीच्या रिंगणात एकूण अकरा उमेदवार उतरले होते. त्यापैकी शिवसेनेचे अनिल बाबर व अपक्ष सदाशिवराव पाटील यांच्यात चुरशीने दुरंगी लढत झाली. त्यात बाबर यांनी बाजी मारली. मतदारसंघात एकूण 2 लाख 16 हजार 768 मतदान झाले होते.

गुरुवारी सकाळी येथील खानापूर रस्त्यावरील शासकीय गोदामात मतमोजणीला सुरवात झाली. एकूण 20 टेबलवर इलेक्‍ट्रॉनिक मशीनचे तर एका टेबलवर टपाली मतांची मोजणी करण्यात आली. एकूण 19 फेऱ्यात मतमोजणी झाली. सकाळी 8 वाजता सुरू झालेली मतमोजणी दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू होती. सकाळी 8 वाजता प्रथम टपाली मतांच्या मोजणीला सुरवात झाली. 

पहिल्या फेरीपासून बाबर यांची आघाडी 
पहिल्या फेरीत बाबर यांनी 4 हजार 126 मतांची आघाडी घेतली. या फेरीत त्यांना 8 हजार 298 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार सदाशिवराव पाटील यांना 4 हजार 172 मते मिळाली. बाबर यांनी घेतलेली आघाडी अपवाद वगळता जवळपास प्रत्येक फेरीत आघाडी वाढत गेली. बाबर यांचा बालेकिल्ला असणाऱ्या नागेवाडीपासून मतांची मोजणी सुरू झाली. त्यानंतर भाळवणी गट आणि तिसऱ्या फेरीपासून विट्याची मतमोजणी सुरू झाली. बाबर यांनी जिल्हा परिषदेच्या तीनही गटात प्रत्येक फेरीत आघाडी घेतली. मात्र विटा शहरात ही आघाडी कमी झाली.

तिसऱ्या फेरीत आमदार बाबर यांची आघाडी कमी होऊन 2 हजार 363 पर्यंत आली होती. चौथ्या फेरीत माजी आमदार सदाशिव पाटील 105 मतांनी आघाडीवर गेले होते. त्यानंतर पुन्हा पाचव्या फेरीअखेर शिवसेनेचे आमदार बाबर यांना 2 हजार 340 मतांची आघाडी मिळाली. या फेरीअखेर बाबर यांना 42 हजार 664 तर पाटील यांना 40 हजार 324 मते मिळाली. 19 व्या फेरीअखेर बाबर यांनी 26 हजार 291 मताची आघाडी घेतली. बाबर यांना 1 हजार 113, पाटील यांना 596 टपाली मते मिळाली.

बाबर यांच्या मताधिक्‍याच्या आघाडीत वाढ होण्यास सुरवात झाल्यानंतर बाबर यांचे पुत्र सुहास व अमोल बाबर यांच्यासह कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलालाची उधळण व फटाक्‍यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यास सुरवात केली. 

आमदार अनिल बाबर यांनी मतमोजणी गोदामाकडे धाव घेतली. कार्यकर्त्यांनी बाबर यांच्या विजयाच्या घोषणा देण्यास सुरवात केली. निकाल ऐकण्यासाठी खानापूर, आटपाडी आणि विसापूर सर्कलमधील कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर गर्दी केली होती. प्रत्येक फेरीचा निकाल आल्यानंतर कार्यकर्ते घोषणाबाजी आणि गुलालाची उधळण करीत भगवा फडकवत होते.

मिरवणुकीत आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, तानाजी पाटील, नगरसेवक अमोल बाबर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, आटपाडीचे सभापती हर्षवर्धन देशमुख, सुहास शिंदे, रवींद्र देशमुख, आटपाडीचे अनिल पाटील, नंदकुमार पाटील यांच्याह नेतेमंडळी सहभागी झाली होती. शहरातील मुख्य मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी महिलांनी आमदार बाबर यांचे औक्षण करीत विजयाचा आनंद साजरा केला. 

मतमोजणी केंद्रात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रंताधिकारी शंकर बर्गे यांनी मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार हृषीकेश शेळके, तहसीलदार सचिन लंगुटे यांच्यासह अधिकारी आणि दीडशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com