कागल : हसन मुश्रीफ यांनी मारली पाचव्यांदा बाजी | Election Results 2019

वि. म. बोते
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

"ही माझी शेवटची निवडणूक आहे" असे भावनिक आवाहन केलेले शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार संजय घाटगे यांना 55 हजार 657 मते मिळाली आणि ते तिसऱ्या स्थानावर राहिले. त्यांचा सलग पाचव्यांदा पराभव झाला.

कागल - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कागल विधानसभेच्या निवडणुकीत विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांनी पाचव्यांदा बाजी मारत आपण जनतेच्या मनातला "हिंदकेसरी" असल्याचे दाखवून दिले.

कागलमधील तिरंगी लढतीत अपक्ष उमेदवार समरजितसिंह घाटगे व शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार संजय घाटगे यांच्यावर मात करीत "कागल"वर राष्ट्रवादीचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिध्द केले.

या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी नजीकचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार समरजितसिंह घाटगे यांचा 28 हजार 133 मतांनी पराभव केला. समरजितसिंह घाटगे यांनी मुश्रीफ यांना दिलेली काट्याची टक्कर जनतेत चर्चेची ठरली. शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार संजय घाटगे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांना 1 लाख 16 हजार 434 मिळाली. तर पंचवीस हजार मतांचा पाठींबा गट म्हणून हिनवल्या गेलेले अपक्ष उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी 88 हजार 301 मते घेत पहिल्याच निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे.

"ही माझी शेवटची निवडणूक आहे" असे भावनिक आवाहन केलेले शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार संजय घाटगे यांना 55 हजार 657 मते मिळाली आणि ते तिसऱ्या स्थानावर राहिले. त्यांचा सलग पाचव्यांदा पराभव झाला.

विकासाच्या मुद्यावर प्रथमच लढलेल्या या निवडणुकीत जनतेने मुश्रीफ यांच्यापाठोपाठ समरजितसिंह घाटगे यांना स्विकारल्याचे दिसून येते. सलग पाच विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर दिलेल्या संजय घाटगे यांना या निवडणुकीत खासदार संजय मंडलिक यांच्या गटाचा पाठींबा असतानाही त्यांना मतदारांनी साफ नाकारल्याचे दिसून येते. अवघ्या तीन वर्षात केलेल्या कार्याच्या जोरावर समरजितसिंह घाटगे यांना मिळालेली मते ही लक्षवेधी ठरली आहेत. 

येथील जवाहर नवोदय विद्यालयात सकाळी साडेआठ वाजता पावसाळी वातावरणात मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीत समरजितसिंह घाटगे व सातव्या फेरीत संजय घाटगे यांना आघाडी मिळाली. त्यानंतर शेवटपर्यंत आमदार हसन मुश्रीफ यांनी आघाडी मिळत गेली. प्रत्येक फेरीनिहाय मुश्रीफ यांचे मताधिक्‍य वाढत गेले. संजय घाटगे यांना सातव्या फेरीत 1463 चे मताधिक्‍य मिळाले.

हे वगळता त्यांना इतर कोणत्याही फेरीत आघाडी मिळाली नाही. समरजितसिंह घाटगे यांनाही पहिल्या फेरीत 1185 व चौथ्या फेरीत 299 चे मताधिक्‍य मिळाले. शिक्षकांच्या टपाली मतामध्ये हसन मुश्रीफ यांना 956, समरजितसिंह घाटगे यांना 501, संजय घाटगे यांना 489 मते मिळाली. सैनिकांच्या टपाली मतामध्ये हसन मुश्रीफ यांना 40, समरजितसिंह घाटगे यांना 35, संजय घाटगे यांना 98 मते मिळाली. 

दरम्यान सोळाव्या फेरीत समरजितसिंह घाटगे दीड हजार मतांनी विजयी झाल्याची अफवा पसरली. ही अपवा पसरताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गुलालाची उधळण व फटाक्‍यांची आतषबाजी केली. यावेळी मुश्रीफ गटात चिंतेचे वातावरण पसरले होते. पण ही अफवा आहे लक्षात येताच शांतता पसरली व मुश्रीफ गटात जल्लोष सुरु झाला. 

या निवडणुकीत 1154 मतदारांनी नोटाचा हा पर्याय स्विकारला. अन्य उमेदवारांना बसपाचे रविंद्र कांबळे यांना 626, बहुजन मुक्ती पार्टीचे सिध्दार्थ नागरत्न यांना 612 व श्रीपती कांबळे 825 इतकी मते मिळाली. निकालानंतर गावोगावी जल्लोष करण्यात आला. फटाक्‍यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

निकालानंतर आमदार मुश्रीफ यांनी कागल येथील श्री हजरत गहिनीनाथ गैबीपीर, आप्पाचीवाडी येथील श्री हालसिध्दनाथ व गडहिंग्लज येथील काळभैरीचे दर्शन घेऊन त्यांनी विजयाचे प्रमाणपत्र निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडून स्विकारले. त्यानंतर कागल बसस्थानकाजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोषी मिरवणूक गैबी चौकापर्यंत काढली. 

उमेदवारांना फेरीनिहाय मिळालेली मते - 
हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी) - 1) 4176, 2) 5596, 3) 5748, 4) 4975, 5) 4483, 6) 4903, 7) 3898, 8) 5074, 9) 4588, 10) 4882, 11) 5483, 12) 3964, 13) 4455, 14) 4248, 15) 4493, 16) 3855, 17) 4598, 18) 4045, 19) 4107, 20) 4415, 21) 4076, 22) 4525, 23) 4208, 24) 3948, 25) 5457, 26) 1238. 

समरजितसिंह घाटगे (अपक्ष) - 1) 5361, 2) 5147, 3) 4250, 4) 5274, 5) 4256, 6) 4394, 7) 2826, 8) 3999, 9) 3122, 10) 2474, 11) 3306, 12) 3029, 13) 4295, 14) 2860, 15) 3948, 16) 2316, 17) 3461, 18) 2766, 19) 2774, 20) 2788, 21) 1871, 22) 2974, 23) 2845, 24) 3468, 25) 3529, 26) 442. 

संजय घाटगे (शिवसेना) - 1) 1106, 2) 342, 3) 416, 4) 1736, 5) 1991, 6) 2155, 7) 5361, 8) 2241, 9) 3003, 10) 3830, 11) 3422, 12) 3006, 13) 2713, 14) 3452, 15) 3407, 16) 3031, 17) 2460, 18) 1671, 19) 914, 20) 1113, 21) 1790, 22) 1404, 23) 934, 24) 1366, 25) 1881, 26) 325.

कागल विधानसभा निवडणुकीत माझा सलग पाचव्यांदा विजय झाला तो जनतेचा व मतदारांचा विजय आहे. त्यांनी जी मेहनत घेतली, हाडाची काडं ,रक्ताचे पाणी केले त्यांचा हा विजय आहे. मी जी आश्वासने दिली आहेत ती आश्वासने व लोकांची समस्या येत्या पाच वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. अल्पसंख्यांक असतानाही जनतेने माझ्यावर उदंड प्रेम केले. त्यांचे कसे आभार मानावेत हे समजत नाही. माझ्या चामड्याचे जोडे जरी करुन घातले तरी या जन्मात हे उपकार फिटणार नाहीत. 

- हसन मुश्रीफ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election Kolhapur Kagal final result ncp Hasan Mushrif won