करवीर : नरकेंच्या हॅटट्रीकचे स्वप्न पी. एन. नी उधळले | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

सुरुवातीच्या सहा फेऱ्यांमध्ये नरके यांनी आघाडी घेतली. मात्र ही आघाडी पाटील यांनी सातव्या फेरीनंतर मोडत पुढील फेऱ्यात चढती कमान ठेवली. शेवटच्या म्हणजे 18 व्या फेरीपर्यंत पाटील यांची बढत कायम होती.

कोल्हापूर - सुरुवातीला चुरस व नंतर एकतर्फी झालेल्या करवीर मतदारसंघात काँग्रेसच्या पी. एन. पाटील यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार चंद्रदीप नरके यांचा 22 हजार 592 मतांनी दणदणीत पराभव केला. या पराभवामुळे नरके यांच्या हॅटट्रीकचे स्वप्न भंगले आहे.

सुरुवातीच्या सहा फेऱ्यांमध्ये नरके यांनी आघाडी घेतली. मात्र ही आघाडी पाटील यांनी सातव्या फेरीनंतर मोडत पुढील फेऱ्यात चढती कमान ठेवली. शेवटच्या म्हणजे 18 व्या फेरीपर्यंत पाटील यांची बढत कायम होती. गतवर्षी सातव्या फेरीपर्यंत नरके यांना सुमारे 18 हजार इतके मताधिक्‍य होते. यावेळी या फेरीपर्यंत हे लीड 166 इतके खाली आल्यानंतरच नरके गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पराभव मान्य केला. 

सलग दोन निवडणुकीत झालेला पराभव यामुळे खचून न जाता पी. एन. पाटील यांनी ताकतीने प्रचार यंत्रणा राबवली. काँग्रेसचे पहिल्यांदाच जिल्हाध्यक्षपद मिळालेल्या आमदार सतेज पाटील यांनी करवीरमध्ये नेटके नियोजन केले. एकेक कार्यकर्ता या प्रचारत सक्रीय केला. गगनबावडा येथे मेळावा घेत कॉंग्रेस ताकतीने ही निवडणूक लढत असल्याचे दाखवून दिले. मागील दोन निवडणुकीतील पराभवाचा कलंक पुसण्यासाठी पी.एन.यांच्या कार्यकर्त्यांनी चंग बांधला. त्यातच नरके यांना त्यांच्या कारखान्यातील अनेक मुद्यांचा फटका बसला.

कर्मचारी पगार असेल किंवा कारखान्यावरील कर्ज हे कळीचा मुददा बनले. तसेच विकासकामांबाबतही टीका झाली. तसेच नरके गटाचे अनेक कार्यकर्ते पाटील यांना येवून मिळाले. त्यामुळे पाटील यांची बाजू भक्‍कम झाली. यातूनच राज्यात करवीर येथे चुरशीने व रेकॉर्ड ब्रेक मतदान झाले. या मतदानानंतरच पाटील यांच्या विजयाची नांदी मिळाली होती. 

शुक्रवारी (ता.24) सकाळी रमणमळा येथील शासकीय गोदामात करवीर मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत नरके यांनी 2446 मताचे मताधिक्‍य मिळवले. दुसऱ्या फेरीत त्यांनी तब्बल 2998 मतांनी आघाडी घेतली.तिसऱ्या फेरीत 4926,पाचव्या फेरीत 5201 इतके नरके यांनी मताधिक्‍य मिळवले. तर सहाव्या फेरीत पाटील यांनी हे मताधिक्‍य कमी केले, तरी नरके यांचे मताधिक्‍य 3074 इतके राहिले. सहाव्या फेरीत नरके यांचे हे लीड 166 मतांनी खाली आले. तर सातव्या फेरीत पाटील यांनी 783 मतांची आघाडी घेतली. ही आघाडी पुढील 18 फेऱ्यापर्यंत कायम राहिली. गतवेळी ज्या भागाने नरके यांना बढत दिली त्याच भागाने यावेळी पी.एन.पाटील यांनी साथ दिली असल्याचे निकालांनतर स्पष्ट झाले. 

सुरुवातीच्या एक ते सहा फेऱ्यांमध्ये पन्हाळा म्हणजेच नरके यांचा बालेकिल्ला होता. तर पुढे सातव्या फेरीनंतर गगनबावडा, जुना करवीर मतदारसंघ लागले. नरके यांना पन्हाळा येथे मिळालेले लीड गगनबावडा येथील मतदान केंद्रातील मतमोजणी सुरु झाल्यानंतर कमी झाले. गगनबावड्यातून पाटील यांच्या मागे आमदार सतेज पाटील, भाजपचे पी. जी. शिंदे आदी गट ताकतीने उभे राहिले. त्यामुळे नरके यांना चांगलाच धक्‍का बसला. नरके या भागातून पूर्वी लीड घेत होते. मात्र या भागाने नरके यांच्या मताधिक्‍क्‍याला ब्रेक लावला. गगनबावडा येथील मतमोजणीत पाटील व नरके यांची झालेली बरोबरी व पुढील मतदार संघांनी पी.एन.पाटील यांना साथ दिल्याचे ध्यानात आल्यानंतर नरके यांच्या कार्यकर्त्यांनी पराभव मान्य केला. मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत नरके यांचे बंधू अजित नरके हे मतमोजणी केंद्रात थांबून होते. 

अठराव्या म्हणजेच अखेरच्या फेरीत पी.एन.पाटील यांनी 22 हजार 592 मतांनी विजयी प्राप्त झाल्यानंतर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पी.एन. यांच्या विजयाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. दरम्यान पी.एन.पाटील हे विजयाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी रमणमळा येथील मतमोजणी केंद्रात आले असता कार्यकर्त्यांनी पुन्हा घोषणाबाजी केली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेतल्यानंतर आमदार पी.एन.पाटील हे रॅलीतूनच मतदार संघाकडे रवाना झाले. 

विजयाची पाटील समर्थकांना खात्री 
पहिल्या सहा फेऱ्यात चंद्रदीप नरके यांना आघाडी होती. मात्र या आघाडीचे कोणतीही धास्ती पाटील गटाच्या कार्यकर्त्यांना नव्हती. उलट ते खुशीत होते. कारण या फेऱ्यात गतवेळी नरके यांना 18 हजार मताधिक्‍य होते. यावेळी हे मताधिक्‍य हे फक्‍त पाच हजार इतकेच असल्याने ते कमी होणार, याची खात्री पाटील गटाला होती. आणि पुढे तशीच परिस्थिती कायम राहिली. 

यावेळीही टपाली मतांत पी.एन. आघाडीवर 
करवीरमध्ये 1700 टपाली मतदान झाले. यातील 885 मते पी.एन.पाटील यांना मिळाली. तर नरके यांना 815 मते मिळाली. गतवेळी प्रमाणेच यावेळीही पी.एन.यांनी टपाली मतात आघाडी घेतली. 

उमेदवारनिहाय झालेले मतदान 
चंद्रदीप नरके (शिवसेना ) 113014 
पी.एन.पाटील सडोलीकर (कॉंग्रेस) 135675 
बजरंग पाटील (बहुजन समाज पार्टी)752 
डॉ.आनंद गुरव(वंचित बहुजन आघाडी) 4412 
गोरख कांबळे(बहुजन मुक्‍ती पार्टी) 334 
डॉ.प्रगती चव्हाण (संभाजी ब्रीगेड पार्टी) 205 
ऍड. माणिक शिंदे (बळीराजा पार्टी)370 
अरविंद माने (अपक्ष)367 

मतदान आकडेवारी 

एकूण मतदार 303396 
झालेले मतदान 255129 
नोटाला झालेले मतदान 1284 
बाद मते 227 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election Kolhapur Karveer final result Congress P N Patil won