सांगली जिल्ह्यात भाजपचा वारु आघाडीने रोखला | Election Results 2019

शेखर जोशी 
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

एक अमित शहा यांची जतची सभा सोडता मोठी सभा जिल्ह्यात झाली नाही. यामुळे भाजप गाफिल आत्मविश्‍वासात राहिले. खाडेंसारखे मंत्री लाखाने येणार असे सांगून विरोधकांना खूपच कमी लेखत राहिले हे देखील लोकांना रुचले नाही.

आजची सकाळ उजाडली तीच धाकधुकीने...आरबी समुद्रातालं चक्रीवादळ सांगलीच्या राजकीय पटावर घुुसल्यासारखे निकाल येवू लागले आणि भाजप नेत्यांचे होश उडाले. भाजप नेत्यांच्या गाफिलपणाचा फटका जत, शिराळा येथे तर बसलाच पण मिरज सोडले तर भाजप सर्वंच जागांवर चाचपटताना दिसली आणि भाजपच्या गोटात अस्वस्था तर पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा विशेषत: राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पुन्हा फॉर्ममध्ये आली आहे. भाजपच्या शतप्रतिशतच्या महत्वाकांक्षा नडली. 

सुमनताई पाटील यांनी बलाढ्य उमेदवार अजितराव घोरपडें यांचा विक्रमी मतांनी केलेला पराभव लक्षवेधी ठरला. भाजप नेत्यांचा गाफिलपणा नडला हे या निवडणुकीचे अनुमान आहे. कारण पालकमंत्री म्हणून सुरुवातील चंद्रकांतदादांनी केलेले दुर्लक्ष नंतर सुभाष देशमुख फिरकले नाहीत. लोकसभेलाच ही नाराजी जाणवत होती, मात्र त्यावेळी गोपीचंद पावले आणि तिरंगी निवडणुकीमुळे काका तरले मात्र त्यांनी घोरपडे, गाडगीळ, खाडे यांना किती मदत केली हा संशोधनाचा विषय आहे. एकूणच भाजपचे शिर्ष नेतृत्व देखील गाफिल राहिले. कडगेगाव सारखी जागेचा आग्रह न धराता गप्प बसले यामुळे भाजप विरोधकांशी सेटलमेंट करतंय असाही मेसेज या निवडणुकीतून गेला.

एक अमित शहा यांची जतची सभा सोडता मोठी सभा जिल्ह्यात झाली नाही. यामुळे भाजप गाफिल आत्मविश्‍वासात राहिले. खाडेंसारखे मंत्री लाखाने येणार असे सांगून विरोधकांना खूपच कमी लेखत राहिले हे देखील लोकांना रुचले नाही. जरी खाडे जिंकले तरी कचरा म्हणून हिणवलेल्या विरोधकांनी त्यांना चांगलेच रेटले आहे. 

काँग्रेसचे नेते विश्‍वजित कदम जिंकणार हे स्पष्ट होते त्यांचे मताधिक्‍य किती एवढाच प्रश्‍न होता. जयंतराव सप्तपदी पूर्ण करणार हे निश्‍चित होते पण दोन्ही काँग्रेसने जत, शिराळा निसटलेले गड परत मिळवले ही सर्वांत मोठी क्रांती म्हणून नोंद घ्यावी लागेल. 

मुळातच इस्लामपूर, पलूस-कडेगाव येथील चुरस निवडणुकीपूर्वीच संपली होती. जागा वाटपात भाजपने या दोन्ही जागा शिवसेनेला सशक्‍त उमेदवार नसताना का दिल्या, असा प्रश्‍न प्रत्येकाला पडला. कडेगावमध्ये तर दहा हजारावर मते नोटाला पडली आहेत त्यामुळे येथे तुल्यबळ उमेदवारच भाजप-सेनेने दिला नाही याचा हा मतपेटीतून आलेला संदेशच आहे. भाजपने काही ठिकाणी आत्मघाती निर्णय घेतले.

जतमध्ये जगतापांविषय पक्षांतर्गंत असलेल्या नाराजीची दखल नेमकेपणे घेतली नाही. येथे बंडखोरीही थांबविण्यात अपयश आले. त्यामुळे येथे जगतापांसारख्या दिग्गज नेत्याचा पराभव तरुण उमेदवार विक्रम सावंत यांनी केला आहे. जगतापांविषयी नाराजीचा सूर जतमधील भाजपने शिमगा करून सांगितला होता. या जागेसाठी दस्तुरखुद्द अमित शहा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पांनी हजेरी लावली होती मात्र भाजपच्या होम पिजवरही हार होते हे या निकालाने सिध्द केले.

येथे आरळी यांनीही जी मते खाल्ली आहेत यांनी भाजपचे मोठे नुकसान झाल्याचेही दिसते. भाजपमध्ये दुफळी आहे याचा देखील कॉंग्रेसला फायदा झाला आहे. विक्रम सावंत येथे गेली पाच वर्षे सातत्यापूर्ण काम करत आहेत. त्यांना विश्‍वजित कदम यांचीही मोठी साथ मिळाली आणि आपल्या हातून गेलेली ही जागा कॉंग्रेसने पुन्हा मिळवली आहे. 

शिराळ्यात शिवाजीराव नाईक यांच्या संस्था अडचणीत आल्या. शिवाजी केनची बिले शेतकऱ्यांना मिळाली नाहीत या सर्वांच्या नाराजीचा लाभ उठवत राष्ट्रवादीच्या मानसिंगराव नाईकांनी शिवाजीरावांना घेरले होते. त्यात सम्राट महाडिकांची बंडखोरी भाजप थांबवू शकला नाही येथेही मानसिंगराव प्लस झाले. त्यामुळे भाजपला आरळींची बंडखोरी थांबविता आली नाही की जगताप यांच्याबद्दलच्या नाराजीवर मार्ग काढता न आल्याने जत गेले...शिराळ्यातही तेच झाले.

इस्लामपूरात जयंतरावांना रोखणारा जावू दे पण किमान एकास एक टक्‍कर देणारा उमेदवार कोण हे ओळखण्यात भाजप-सेनेने केलेला गाफिलपणा लोकांनाही रुचला नाही. येथे अडीच वर्षापूर्वी झालेल्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीत निशिकांत पाटील यांनी जयंतरावांचा उमेदवार पाडला होता. मग जयंतरावांना टक्‍कर कोण चांगली देईल हे शेंबडे पोरसुध्दा सांगू शकले असते पण ही जागा वाटपात सक्षम उमेदवार नसताना शिवसेनेला बहाल केली. येथे थेट जयंतराव-निशिकांत अशी लढत होऊ नये म्हणून मंत्री सदाभाऊ खोत यांनी जे कारस्थान केले ते कोणाच्या लाभासाठी होते याचा मेसेज काय जायचा तो आता गेला आहे. एकूणच येथे कडकनाथ कोंबडीं चांगली शिजली आणि त्याचा लाभ विरोधकांत फूट पाडण्यात जयंतनीतीने पध्दतशीर केला. अन्यथा याच मतदासंघात जयंतराव अडकून पडले असते.

कडेगाव-पलूस हा मतदारसंघ तर विश्‍वजित कदम यांना भाजप-सेनेने बहालच करून टाकला. गेले चार वर्षे येथे संग्रामसिंह विरुध्द विश्‍वजित ही कुस्ती होणार असा डंका पिटला आणि ऐनवेळी भाजपने आत्मघात करून घेत हा मतदारसंघ सक्षम उमेदवार नसताना सेनेच्या गळ्यात मारून टाकला. येथे विश्‍वजित कदम यांचे पारडे पहिल्यापासूनच बलाढ्य होते पण कदम - देशमुख हा पारंपरिक सामना चुरशीचा होतो तो यावेळी नव्हता. तुल्यबळ उमेदवार नसल्याने येथे नोटाला बारा हजाराहून अधिक मते मिळाली आहेत हे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, शिवसेनेचे येथील नेते नितीन बानुगडे पाटील आणि आणि शिवसेनेचे सर्वोसर्वा उध्दव ठाकरे यांनी नोंद करावे असे आहे. तुम्ही जागा सेट करताय हे लोकांना कळत नाही असे समजू नका येथे विश्‍वजित यांनी विक्रमी मतदान घेतले तरी सेनेचा उमेदवार फाईटसाठी तुल्यबळ दिला नाही याची नाराजी दिसली आहे. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Sangli trends middle phase