esakal | शिंदेशाही लढतीत हॅटट्रिक की बदल ? I Election Result 2019
sakal

बोलून बातमी शोधा

candidates

महेश शिंदे सर्मथकांनी शिंदेवर उधळला गुलाल.

शिंदेशाही लढतीत हॅटट्रिक की बदल ? I Election Result 2019

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव : प्रचारादरम्यान आघाडी आणि युतीमध्ये सुरू असलेले वाक्‌युद्ध, दिवसागणिक बदलू लागलेल्या राजकीय समीकरणामुळे कोरेगाव मतदारसंघामध्ये निवडणुकीचा धुरळा उडाला हाेता. हॅटट्रिक साधण्यासाठी सज्ज असलेले कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे कोरेगावचा गड राखणार, की मतदारसंघात बदल घडवण्याच्या भाजप, शिवसेना युतीचे उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रयत्नांना यश मिळणार? हे ठरवणारी ही निवडणूक रंगतदार बनली आहे.

मतमाेजणीच्या 27 फेरी अखेरपर्यंत महेश शिंदे यांनी 1624 मतांनी आघाडी घेतली हाेती. अजूनही खटाव भागातील 55 हजार मतांची माेजणी करावयाची आहे. 


कोरेगावची राजकीय, वैचारिक जडणघडण कॉंग्रेसची विचारधारा मानणारी असल्याचे आजवरच्या अनेक निवडणुकांमध्ये दिसून आले आहे. प्रामुख्याने कॉंग्रेसचे नेते (कै.) शंकरराव जगताप यांनी सलग 25 वर्षे कोरेगावचे प्रतिनिधित्व केले आहे. "राष्ट्रवादी'च्या निर्मितीनंतर डॉ. शालिनीताई पाटील यांनी दोन वेळा आणि मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर शशिकांत शिंदे यांनी दोन वेळा कोरेगावचे प्रतिनिधित्व केले आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसची विचारधारा जोपासणाऱ्या या मतदारसंघातील आता होत असलेल्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे "हॅटट्रिक' साधण्यासाठी तिसऱ्यांदा सज्ज आहेत.
 

या वेळी राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत होत असून, राष्ट्रवादीचे आमदार शिंदे यांच्या विरोधात भाजप शिवसेनेचे उमेदवार महेश शिंदे निवडणुकीत उतरले आहेत.

आता मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला हाेता. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी उदयनराजे आणि महेश शिंदे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. याच सभेत उदयनराजे यांनी जरंडेश्वर कारखान्याच्या खासगीकरणाचा मुद्दा पुढे आणून राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसह आमदार शिंदे यांना लक्ष्य केले.

या निवडणुकीचा निकाल लागताच हा कारखाना डॉ. शालिनीताई पाटील यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचेही त्यांनी सभेत सांगितले. महत्त्वाचे म्हणजे याच सभेत शालिनीताई पाटील यांच्या युतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याबाबतच्या पत्राचे वाचन झाले. उदयनराजे यांनी पॄथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील यांच्यावरही टीका केली. दुसरीकडे आघाडीच्या प्रचार सभेत श्रीनिवास पाटील यांनीही उदयनराजे यांना उद्देशून "पवार साहेबांविषयी भावनिक होऊन आधी अश्रू ढाळणारे नंतर पवारसाहेबांवर ईडीने चौकशीचा ससेमिरा लावला, त्या वेळी का बोलले नाहीत,' असा पलटवार केला हाेता.