महासोमयागास शिवपुरीत प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

यज्ञस्थळी गणपती पूजन, पुण्याह वाचन, नंदी श्राद्ध करून यज्ञाला सुरवात करण्यात आली. त्यानंतर मंथनातून अग्नी प्रकट करण्यात आला. तो अग्नी घेऊन पहिल्या दिवसाच्या यज्ञाला सुरवात करण्यात आली.

अक्कलकोट. : विश्‍व फाउंडेशन, शिवपुरी यांच्या वतीने वैश्‍विक अग्निहोत्र कार्याच्या 75निमित्त आजपासून महासोमयाग यज्ञास विविध मंत्रोपचारात आणि धार्मिक विधीने सुरवात करण्यात आले. या वेळी भारतासह स्पेन, ऑस्ट्रिया व दुबई येथील भाविकांची उपस्थिती लाभली. आज विविध मंत्रोपचाराने परिसर दुमदुमून गेला आहे. 

आरंभी सकाळी अग्निहोत्र झाले. त्यानंतर यजमानांच्या हस्ते गुरू पूजन झाले. उपस्थित सर्वांनी डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांच्यासोबत अग्निमंथन करून सामूहिक अग्निहोत्र केले गेले. यज्ञस्थळी गणपती पूजन, पुण्याह वाचन, नंदी श्राद्ध करून यज्ञाला सुरवात करण्यात आली. त्यानंतर मंथनातून अग्नी प्रकट करण्यात आला. तो अग्नी घेऊन पहिल्या दिवसाच्या यज्ञाला सुरवात करण्यात आली. त्या अग्नीवरच यजमानांचे अन्न शिजवले जाते. तेच अन्न त्यांना महासोमयाग काळात ग्रहण करावे लागते.

आजच्या यज्ञाला तुपाची आहुती देण्यात आली. दुपारी याग शाळा प्रवेश, दिक्षणी येष्टी, दीक्षा, सनिहार प्रस्थापनम, वाङ्‌मयनियमन इत्यादी विधी पार पडले. संध्याकाळी पुन्हा सामूहिक अग्निहोत्र करण्यात आले. त्यानंतर ब्रह्मवृंदाच्या करवी आशीर्वचन आणि सुहासिनींकडून औक्षण करण्यात आले. आजच्या यज्ञ यागात 18 ब्रह्मवृंद सहभागी झाले आहेत. डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांचे अग्निहोत्र आणि सत्य सनातनधर्म या विषयावर आशीर्वचन झाले. 

आज दिवसभरात खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, साताऱ्याचे छत्रपती शिवाजीराजे भोसले, अन्नछत्र मंडळाचे जन्मेजयराजे भोसले, ऑस्ट्रियाचे विलियम क्‍लाऊज, स्पेनहून सारा, दुबईचे अनिश राऊळकर तसेच अमर चौधरी, जैन इरिगेशनचे अतुल जैन व डॉ. भावना जैन, धनंजय वाळूंजकर, अण्णा वाले, भूपतभाई व्होरा, पवन कुलकर्णी, डॉ. गणेश थिटे, 
आनंद ब्रह्मे, वक्रतुंड औरंगाबादकर, श्रीकांत सरदेशमुख, सूर्यकांत पवार, बालाप्रसाद बियाणी, परमेश्‍वर माळी यांच्यासह भाविकांनी या यज्ञ सोहळ्यास हजेरी लावली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Mahasomyaga Start at Shivpuri