जेल फोडो... स्वातंत्र्यलढ्यातील सांगलीचे ‘शौर्यपर्व’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 ‘शौर्यपर्व’

जेल फोडो... स्वातंत्र्यलढ्यातील सांगलीचे ‘शौर्यपर्व’

महात्मा गांधींच्या वैयक्तिक सत्याग्रहाच्या हाकेनंतर ब्रिटिश पोलिसांकडून क्रांतिकारकांचे अटकसत्र सुरू झाले. त्यातून सांगलीच्या तुरुंगात वेगवेगळ्या ठिकाणी पकडलेले सोळा स्वातंत्र्यसैनिक होते. वसंतरावदादा पाटील, हिंदुराव पाटील, गणपतराव कोळी, जयराम कुष्टे, दत्ता पाटील-सोनीकर, महादेव बुटाले, जिनपाल खोत, बाबूराव पाचोरे, सातलिंग शेटे, वसंत सावंत, विठ्ठल शिंदे, मारुती आगलावे, अण्णासाहेब पत्रावळे, बाबूराव जाधव, नामदेवराव कराडकर, कृष्णा पेंडसे असे ते सोळा जण होते. त्यापैकी वसंतरावदादा व हिंदुराव पाटील हे स्वतंत्र बराकीत होते. अन्य वेगळ्या बराकीत होते. बराकींना कुलपासह प्रचंड बंदोबस्त होता. अण्णासाहेब पत्रावळे व बाबूराव जाधव हे दोघे अल्पवयीन होते. त्यामुळे त्यांना तुरुंगातल्या तुरुंगात मोकळे फिरायला परवानगी होती.

दरम्यान, दादांना साताऱ्याच्या तुरुंगात हलविण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्याची कोर्टात तारीख होती. सातारचा गिलबर्ट नावाचा डीएसपी अतिशय क्रूर होता. त्याच्या तडाख्यात सापडण्यापेक्षा तुरुंग फोडून पसार होणे चांगले, असे दादांना वाटत होते. त्यातून हा पराक्रम घडला. त्याचा सारा इतिहास आजच्या पिढीने स्वतंत्रपणे दादांच्या चरित्रात वाचायला हवा...

दादा आणि हिंदुराव पाटील यांनी कारागृहात बंदूकधारी पहारेकऱ्याची बंदूक हिसकावून दोघांना दरडावले. नेमकी ही वेळ साधत दादांनी त्याची बंदूक हिसकावून घेतली आणि पहारेकऱ्यालाच हौदात टाकले; तर दुसऱ्या पहारेकऱ्यास बंदुकीचा धाक दाखवत त्याच्याकडील किल्ल्या हिसकावून त्यालाच बराकीत कोंडून कुलूप लावले. बाकीच्यांनी जेलरच्या ऑफिसजवळील शस्त्रागारात जात तिथल्या बंदुका ताब्यात घेतल्या. त्या वेळी गणपतराव कोळी यांनी एकाच्या डोक्यात बंदुकीच्या दस्त्याने जोरात हल्ला केला. जिनपाल खोत यांनी जेलरवरच बंदूक रोखली. पहारेकऱ्यांनी हत्यारे खाली टाकून व हात वर करून शरणागती पत्करली. त्यानंतर साऱ्या क्रांतिवीरांनी बंदुकांसह तटावर चढत सुमारे तीस फूट खोल खंदकात उड्या टाकल्या.

एव्हाना कैदी पळाल्याची खबर पोलिस यंत्रणेने दिली होती. बंदूकधारी पोलिस घोड्यावर स्वार होत रिसाला रोडवर आले होते. हिंदुराव पाटलांनी तटावरूनच पोलिसांवर बंदूक रोखत ‘पुढं याल तर गोळ्या घालीन,’ अशी तंबी दिली. त्यानंतर पहिल्यांदा जिनपाल खोत आणि नंतर चौदा जणांनी उड्या टाकल्या. नामदेवराव कराडकर व कृष्णा पेंडसे यांना पोहता येत नव्हते. त्यामुळे ते तटावरून मागे परतले. शेवटी हिंदुराव पाटलांनी उडी मारली, पण ती खंदकाच्या अलीकडे, दगडावर पडली. त्यांचे दोन्ही पाय मोडले. त्यांना तिथंच पोलिसांनी पकडले. बाकीचे तेरा जण ‘महात्मा गांधी की जय’, ‘शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत कुंभारखिंडमार्गे कृष्णा नदीकडे पळत सुटले.

बंदूकधारी क्रांतिकारक आणि पोलिसांची धुमश्‍चक्री ‘त्या’ दिवशी भरलेल्या शनिवारच्या बाजारात झाली. भर बाजारात दादांनी हवेत गोळीबार करीत गर्दी पांगवत कृष्णा नदीच्या दिशेने धाव घेतली. त्या वेळी बारा जणांनी नदीत उड्या मारल्या. पत्रावळेंना पोहता येत नसल्याने त्यांना नदीकाठच्या पेरूच्या बागेतून पळताना पोलिसांनी टिपले. पाण्यात पोहताना बाबूराव जाधवांच्या डोक्यात गोळी लागली आणि ते वाहून गेले. वसंतदादा ‘कृष्णे’च्या पलीकडील किनाऱ्यावर एका झाडाखाली लपले होते. तिथं त्यांच्या खांद्याला गोळ्या लागून जखमी झाले.

सांगलीकरहो... आज कारागृह आणि सारा परिसर ‘त्या’ क्रांतीवीरांच्या शौर्याची साक्ष देत आहे. देशातील कितीतरी शहरांकडे असा जाज्ज्वल्य इतिहास आहे! त्यामुळे जिथे हा इतिहास घडला तो परिसर आपल्यासाठी ‘तीर्थस्थळा’इतकाच महत्त्वाचा आहे..!

वसंतदादा पाटील आणि त्यांच्या सोळा सहकाऱ्यांनी २४ जुलै, १९४३ या दिवशी सांगलीच्या कारागृहातील शस्त्रागाराचा ताबा घेत बंदुकांसह तटबंदीवरून उड्या मारल्या आणि कृष्णा नदी पार केली. हा प्रसंग भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ‘जेल फोडो’ आंदोलन म्हणून ओळखला जातो. अफाट शौर्य आणि प्रखर देशभक्तीचा प्रत्यय देणारा हा थरारक प्रसंग स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील पराक्रमाचे धगधगते पर्व आहे. आजही या शौर्याची साक्ष सांगलीतील कारागृहाच्या आवारातील स्मृतिस्तंभ, कारागृहातील बराक आणि कारागृहाची भक्कम तटबंदी देत आहे. हा सारा परिसरच सांगलीच्या स्वातंत्र्यलढ्याचे ‘तीर्थस्थळ’ आहे.

- ॲड. के. डी. शिंदे

Web Title: Mahatma Gandhi Personal Satyagrahabritish Police Began Arresting

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top