महावितरणकडून कर्जतकर वेठीस 

नामदेव राऊत
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

वीजबिल थकल्याने महावितरणने शनिवारी (ता. 30) खेड येथील पाणीयोजनेचा वीजजोड तोडला. नगरपंचायतीने सोमवारी बिल भरल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. याबाबत राऊत यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

कर्जत : ""कुठलीही पूर्वसूचना न देता, वीज वितरण कंपनीने खेड येथील कर्जतच्या पाणीयोजनेचा वीजजोड तोडला. त्याद्वारे शहरवासीयांना तीन दिवस वेठीस धरण्यात आले. योजना कार्यान्वित झाल्यापासून आजपर्यंत (2017 ते 19) सलग दोन वर्षे एकदाही योजनेचा वीजजोड खंडित केला नव्हता. वीज वितरणचे अधिकारी या प्रकरणात राजकारण तर करीत नाहीत ना, या शंकेला वाव आहे. असा प्रकार पुन्हा झाल्यास नागरिक योग्य उत्तर देतील,'' असा इशारा उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी दिला. 

वीजबिल थकल्याने महावितरणने शनिवारी (ता. 30) खेड येथील पाणीयोजनेचा वीजजोड तोडला. नगरपंचायतीने सोमवारी बिल भरल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. याबाबत राऊत यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा केली. राऊत म्हणाले, ""नगरपंचायत नियमित वीजबिल भरते; मात्र गेल्या महिन्याचे बिल विलंबाने आले. ते भरण्याची तजवीज सुरू असतानाच, अचानक शनिवारी (ता. 30) कुठलीही पूर्वसूचना न देता वीज वितरणने वीजजोड तोडला. रविवारी सुटी असतानाही कर्मचाऱ्यांनी धनादेश तयार केला. सोमवारी तो भरल्यावर वीजपुरवठा सुरळीत झाला. मात्र, त्यामुळे तीन दिवस कर्जतकर पाण्यावाचून वंचित राहिले. त्यास जबाबदार कोण? नगरपंचायतीने पथदिव्यांच्या वीजबिलापोटी 15 लाख रुपये भरले आहेत. दर वेळी बिलाबाबत आगाऊ सूचना मिळते. नगरपंचायतीकडे थकबाकी नसतानाही पाणीयोजनेचा वीजजोड तोडण्याचा हेतू काय?'' 

हेही वाचा - तुमच्या दारातच मरू द्या 

नगरपंचायतीला महावितरणकडून घरपट्टीचे एकूण 60 लाख रुपये येणे आहे. तसेच, पाणीपट्टी कराचे 12 लाख 40 हजार रुपये थकले आहेत. त्यामुळे एखाद्‌-दुसरा दिवस मागे-पुढे होऊ शकतो. त्यासाठी नियमावर बोट ठेवणे योग्य नसल्याचे राऊत यांनी निदर्शनास आणून दिले. कार्यालयीन अधीक्षक रवींद्र साठे, पाणीपुरवठा अभियंता रूपाली भालेराव, आबासाहेब नेवसे आदी उपस्थित होते. 

वीज वितरणच्या कर्जत येथील उपविभागीय कार्यालयाने खेड येथील नगरपंचायतीच्या पाणीयोजनेचे नोव्हेंबरचे वीजबिल बाकी असल्याने वीजजोड तोडण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार ते तोडले. मात्र, बिलाची रक्कम भरल्यानंतर ते पूर्ववत जोडण्यात आले. 
- संदीप जाधव, शाखा अभियंता, महावितरण, राशीन
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MahaVitarana made it difficult for people in karjat