तुमच्या दारातच मरू द्या 

दत्ता इंगळे 
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

कृषी विभागाने त्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून बाधित शेतमालाच्या नुकसानभरपाईचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयांकडे पाठविले होते. त्याला तब्बल दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला, तरी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही.

नगर तालुका : "मायबाप सरकार, आमचं काही चुकतंय का? नाही तर आम्हाला मरू द्या... वाट पाहून आमची सहनशीलता संपून गेलीय. तुम्ही दाद देत नाही; मग आम्हाला तुमच्या दारात तरी मरू द्या,' अशी आर्त साद कामरगाव येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाला घातली आहे. 

कामरगाव (ता. नगर) येथे एप्रिल ते ऑक्‍टोबर 2017 या काळात अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे 101 शेतकऱ्यांच्या फुलशेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. कृषी विभागाने त्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून बाधित शेतमालाच्या नुकसानभरपाईचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयांकडे पाठविले होते. त्याला तब्बल दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला, तरी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. या प्रश्‍नाबाबत सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांनी कृषी, तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वेळोवेळी निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. 

हेही वाचा हरणांचा बाजार शेतकरी बेजार! 

तिनशे शेतकरी अनुदानापासून वंचित 
याच प्रश्‍नावर दोन महिन्यांपूर्वी गावातील आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश ठोकळ व तुकाराम कातोरे यांच्या नेतृत्वाखाली नगर-पुणे महामार्गावर "रास्ता रोको' आंदोलन केले होते. त्या वेळी प्रशासनातर्फे तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे यांनी निवेदन स्वीकारून, भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. याबाबत खासदार व तत्कालीन आमदारांनाही निवेदने दिली होती. आता मात्र शेतकऱ्यांची सहनशीलता संपली असून, नुकसानभरपाई मिळण्याची आशा मावळत चालली आहे. कामरगावसह नगर तालुक्‍यातील सुमारे 300 शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. 

हेही वाचा तो नाही म्हणाला अन्‌ मृत्यूजवळ गेला 

सामूहिक आत्मदनाचा इशारा 
येत्या पंधरा दिवसांत नुकसानभरपाई न मिळाल्यास तहसील कार्यालयापुढे सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे, शिवा सोनवणे, प्रकाश कातोरे, आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश ठोकळ, बबनराव भुजबळ, हबीब शेख, भाऊसाहेब राजगुरू, पिंपळगाव कौड्याचे सरपंच सतीश ढवळे यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती तहसीलदार, जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी कार्यालयाला दिल्या आहेत. नवीन सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. त्यांनी या प्रश्नात लक्ष घालावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही शेतकऱ्यांनी निवेदन पाठविले आहे. 

नवीन सरकारकडून अपेक्षा 
गेल्या दोन वर्षांपासून नुकसानभरपाईसाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहोत; परंतु लाल फितीच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित आहेत. नवीन सरकारकडून हा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास वाटतो. 
- तुकाराम कातोरे, कामरगाव 

हेही वाचा आरारा... कांदा तिखटच! 

प्रशासनाकडून पाठपुरावा सुरूच 
एप्रिल ते ऑक्‍टोबर 2017 या काळात अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईचा प्रस्ताव सरकारकडे पाठविलेला आहे. सरकारकडून अद्याप निर्णय झाला नाही. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा सुरूच आहे. या संदर्भात आपण वरिष्ठ पातळीवरही पत्राद्वारे विचारणा करणार आहोत. 
- उमेश पाटील, तहसीलदार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three hundred farmers are deprived of grants