आम्हाला आमदार करा, गोकुळ सोडतो; संचालकाचा टोला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांना आमदारकीचे तिकीट नको पण गोकुळचे संचालकपद हवे असते. यासाठी आमदारकीपेक्षाही गोकुळचे संचालकपद मिळवण्यासाठी मोठी चुरस असते.

कोल्हापूर - येथे आज गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत आमदारपदी निवड झाल्याबद्दल संघाचे संचालक राजेश नरसिंगराव पाटील यांचा सत्कार अध्यक्ष आपटे यांनी केला. 

या प्रसंगी बोलताना श्री. आपटे यांनी ज्येष्ठ संचालक अरूण डोंगळे यांनीही विधानसभा लढवल्याचा उल्लेख केला. लगेचच डोंगळे यांनी त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी माईकचा ताबा घेतला व ते म्हणाले, "आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा अशी मागणी होते, पण संघाचाही संचालक आमदार व्हावा असे मला वाटते, आम्हाला आमदार करा, आम्ही संघातील जागा मोकळी करतो' असा टोला लगावला.

श्री. डोंगळे यांनी राधानगरीतून विधानसभा लढवली होती, पण त्यात त्यांना अपयश आले.  या निवडणूकीत त्यांच्या विरोधात शिवसेनेचे प्रकाश आबिटकर हे होते. आबिटकर यांना एक लाख पाच हजार 881 मते मिळाली तर राष्ट्रवादीचे के. पी. पाटील यांना 87 हजार मते मिळाली. यात श्री. डोंगळे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. १५ हजार ३३६ इतकी मते त्यांना मिळाली. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. 

जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांना आमदारकीचे तिकीट नको पण गोकुळचे संचालकपद हवे असते. यासाठी आमदारकीपेक्षाही गोकुळचे संचालकपद मिळवण्यासाठी मोठी चुरस असते. या चुरशीमध्ये आता आमदार सतेज पाटील यांनी महाडिक यांच्या विरोधात हवा करत. आता आमचं ठरलयं, आता गोकुळ उरलयं असा नारा दिला आहे. यामुळे आता आगामी काळात गोकुळमध्ये काय घडते याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पाडव्याला सजलेल्या म्हशी म्हणाल्या  आमचं ठरलय, आता गोकुळ उरलय 

महाडिक यांची धावती भेट 

दरम्यान या सभेला सुरूवात होण्यापुर्वी संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी संघात उपस्थिती लावली. त्यांनी सभा सुरू होण्यापुर्वी संघाचे अध्यक्ष आपटे यांच्यासह संचालकांची भेट घेऊन चर्चा केली. सभा सुरू होण्यापुर्वी काही काळ ते संघातून निघून गेले. त्याचीही चर्चा सभे ठिकाणी होती. 

दरम्यान ही सभा घोषणाबाजीने गाजली. सत्ताधारी तसेच विरोधकांनी परस्पर जोरदार घोषणाबाजी केल्याने अवघ्या ३० मिनिटात ही सभा गुंडाळण्यात आली. 

गोकुळ च्या सभेत घोषणायुद्ध; 30 मिनिटात गुंडाळले विषय 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make Me MLA I will Leave Gokul Director Arun Dongale Statement