esakal | ...तर राज्यातील एकही नाट्यगृह रिकामे राहणार नाही : मकरंद अनासपुरे

बोलून बातमी शोधा

null

चित्रपट सृष्टीपुढे पायरसीचे मोठे आव्हान उभे आहे. या संदर्भातील कायदे कडक आहेतच; पण गुन्हेगारांना पळवाट सापडू नये. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. व्यवसाय वाढला तर चित्रपटांना अनुदान देण्याचीही शासनाला गरज भासणार नाही अशी भावना अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली.

...तर राज्यातील एकही नाट्यगृह रिकामे राहणार नाही : मकरंद अनासपुरे

sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : नवनवीन विषय घेऊन मोठ्या संख्येने चित्रपट येत आहेत, ही समाधानाची बाब असली, तरी त्यांना पुरेशी चित्रपटगृहे सुद्धा मिळायला पाहिजेत. मराठी चित्रसृष्टीला पुन्हा नव्याने भरभराट आणण्यासाठी चित्रपटगृहांची संख्याही वाढवायला पाहिजे. नाटकाचे प्रयोग नसलेल्या कालावधीत नाट्यगृहांचाही त्यासाठी वापर केल्यास हा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटू शकतो, असे मत अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी  "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. मकरंद अनासपुरे दिग्दर्शित "काळोखाच्या पारंब्या' या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त येथे झाला. इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमास सरपंच विजय विगावे आदी उपस्थित होते.

यावेळी अनासपुरे म्हणाले, ""राज्यात प्रदर्शित होणारे हिंदी- मराठी चित्रपट आणि उपलब्ध चित्रपटगृहे यांचे प्रमाण खूप विसंगत आहे. वर्षाचे 48 आठवडे धरले, तर दिडशे-दोनशे चित्रपट कसे आणि किती दिवस लावायचे? चित्रपटगृहांची संख्या वाढवा-वाढवा म्हणून अनेक दिवसांपासून मागणी सुरू असली तरी त्याकडे गांभीर्यानेही बघायला पाहिजे. यावर नाट्यगृहांचे रूपांतर चित्रपटगृहात करणे हा एक चांगला आणि सोयीस्कर पर्याय होऊ शकतो. नाट्यचळवळ तर टिकलीच पाहिजे. मात्र, नाट्य प्रयोगाव्यतिरिक्त अन्य वेळेत नाट्यगृहांचा चित्रपटगृह म्हणून वापर करणे सहज शक्‍य आहे, तो झाला पाहिजे. तसे झाले तर राज्यातील एकही नाट्यगृह कधीच रिकामे राहणार नाही. ग्रामीण भागातून अनेक नवोदित कलाकार समोर येत आहेत. या नव्या कलाकारांमध्ये एक नवी ऊर्जा बघायला मिळत आहे. खूप चांगले टॅलेंट त्यांच्यात आहेत. रंगभूमीवरील अनेक स्पर्धांमधूनही ते चमकत आहेत. त्यांना प्लॅटफॉर्म मिळवून देणे जुन्या मंडळींचे कामच आहे. माझ्यासारखे अनेक कलाकार ग्रामीण भागातूनच पुढे आलेले आहेत.'' 

हेही वाचा :  सातारा : नगराध्यक्षांसह सात जणांविरुद्ध सावकारीचा गुन्हा

वाचा : ...अन्‌ तेजसचे लष्कर भरतीचे स्वप्न हवेत विरले
 

चित्रपट सृष्टीपुढे पायरसीचे मोठे आव्हान उभे आहे. या संदर्भातील कायदे कडक आहेतच; पण गुन्हेगारांना पळवाट सापडू नये. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. व्यवसाय वाढला तर चित्रपटांना अनुदान देण्याचीही शासनाला गरज भासणार नाही. 
मकरंद अनासपुरे, अभिनेते