esakal | सातारा : नगराध्यक्षांसह सात जणांविरुद्ध सावकारीचा गुन्हा

बोलून बातमी शोधा

null

दमबाजी करुन आत्तापर्यंत दिलेली रक्कम परत दे, नाहीतर तुला जीवंत सोडणार नाही. तसेच मला तुमच्याकडून मागील बाकी येणे आहे असे म्हणून मला वेळोवेळी दमदाटी, धमकी देऊन मी न घेतलेली रक्कम माझ्या माथी मारून मला आजतागायत आर्थिक व मानसिक त्रास दिला जात असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सातारा : नगराध्यक्षांसह सात जणांविरुद्ध सावकारीचा गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वडूज (जि. सातारा) : येथील नगरपंचायतीचे अध्यक्ष सुनील हिंदुराव गोडसे यांच्यासह सात जणांकडून खासगी सावकारी व जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याची फिर्याद माजी उपनगराध्यक्ष संदीप निवृत्ती गोडसे यांनी दिली आहे. तर संदीप गोडसे यांनी जातीवाचक अपशब्द वापरून 50 हजार किंमतीची सोन्याची चेन हिसकावून घेतल्याची फिर्याद राजेंद्र बाळकृष्ण चव्हाण (रा.वडूज) यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. 

याबाबत संदीप गोडसे यांनी दिलेल्या फिर्यादेनुसार, श्री. गोडसे यांनी 2014 मध्ये औषधोपचार व लोकांची देणी भागविण्यासाठी आपणास पैशांची गरज असल्याचे गावातील सुनील गोडसे, सचिन माळी, जयवंत पाटील यांच्याजवळ सांगितले होते. त्यावेळी त्यांनी रक्कम उसनवार देतो, तुझ्या सवडीने परत कर, नाममात्र वार्षिक 15 टक्के व्याज दे, असे ते म्हणाले. त्यावर सुनील गोडसे यांच्याकडून 22 मार्च 2019 रोजी आई व वडिलांच्या दवाखान्यासाठी नऊ लाख रूपये पत्नी नम्रता गोडसे यांच्या नावे व्याजाने घेतली होती. या रकमेच्या व्याजापोटी पत्नी नम्रता यांचे दागिने गहाण ठेवून त्या रकमेतून सुनील गोडसे यांना दोन- तीन वेळा व्याज दिले होते. तसेच आपणास व्यवसाय व जेसीबी घेण्यासाठी सुनील गोडसे यांना जादा 11 लाख रूपये मागितले होते. सुनील गोडसे यांनी कराड अर्बन बॅंकेच्या वडूज शाखेतून आपणास ट्रान्सफर केले होते. त्यावेळी गोडसे यांनी आपली पहिली रक्कम बाकी आहे, तरीही आणखी जादा रक्कम देत आहे, मला फक्त वेळच्या वेळी व्याज दे, असे बजावले होते. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये आपल्या नातेवाईकांकडून 23 लाख रुपये गोळा करून सुनील गोडसे यांना मेहुणे जगदीश गोडसे यांच्या समक्ष परत केले. ही रक्कम देताना सुनील गोडसे यांना सर्व रक्कम परत दिली असून मला कोणत्याही पैशांची मागणी करू नका अशी विनंती केली होती.
 
14 जून 2019 रोजी वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीवेळी आपणास सुनील गोडसे यांनी जर तू मला मदत केली नाहीस तर मला उसनवार घेतलेल्या पैशांची सावकारी पद्धतीने जादा व्याजाची रक्कम द्यावी लागेल, अशी धमकी दिली. तसेच विपूल गोडसे, जयवंत पाटील, राजेंद्र चव्हाण, सचिन माळी (रा. वडूज) यांनी आपणास उचलून नेऊन परगावी फिरविले. त्या दरम्यान संदीप किसन गोडसे, प्रदीप किसन गोडसे (रा. वडूज) यांनी आमच्या घरावर लक्ष ठेवून घरातील लोकांना भितीचे छायेखाली ठेवले होते. त्यानंतर नगराध्यक्षपद निवडीत सुनील गोडसे निवडून आले. त्यानंतर मी उसनवार घेतलेल्या रकमेची जादा आकारणी करून मला धमकीचे फोन करीत आहेत. जयवंत पाटील यांनी मला गावात आल्यावर सुनील गोडसे यांच्याकडून घेतलेले पैसे परत द्या व आमच्या विरोधात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. आपण सुनील गोडसे यांच्याकडून घेतलेले पैसे माझी वडूज येथील जमीन विकून परत दिले असताना आता विनाकारण पैश्‍यांसाठी त्रास दिला जात आहे. तसेच आपण प्रभाग क्रमांक 17 चे नगरसेवक असून त्याठिकाणी नगराध्यक्षांच्या देखरेखीखाली रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने आपण जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारी अर्ज दिला होता. त्यावेळी नगराध्यक्ष गोडसे यांनी दमबाजी करुन आत्तापर्यंत दिलेली रक्कम परत दे, नाहीतर तुला जीवंत सोडणार नाही. तसेच मला तुमच्याकडून मागील बाकी येणे आहे असे म्हणून मला वेळोवेळी दमदाटी, धमकी देऊन मी न घेतलेली रक्कम माझ्या माथी मारून मला आजतागायत आर्थिक व मानसिक त्रास दिला जात आहे. याबाबतचा तपास पोलिस उपअधीक्षक बी.बी. महामुनी करीत आहेत. 

वाचा : मला शुभेच्छाही नकाेत : उदयनराजे भाेसले

राजेंद्र चव्हाण यांन मारहाण 

दरम्यान, माजी उपाध्यक्षांकडून जातीवाचक अपशब्द वापरल्याची तक्रार राजेंद्र चव्हाण यांनी दिली आहे. त्यातील माहितीनुसार, पत्नी सुवर्णा चव्हाण या नगरसेविका आहेत. प्रभाक 17 मध्ये संदीप गोडसे व नगराध्यक्ष गोडसे यांच्यात आर्थिक देवाण घेवाणीच्या कारणावरून मतभेद झाले आहेत. माझ्या पत्नी सुवर्णा या सत्ताधारी गटाला पाठिंबा देत असल्याने नगराध्यक्ष व आपले चांगले संबंध आहेत. आज (शनिवार) दुपारी साडेबारा वाजता वाकेश्वर रस्त्यावर बहिण वैजयंता मखरे ही आजारी असल्याने मी व जितेंद्र जयसिंग गोडसे तसेच पृथ्वीराज गोडसे हे स्वत:च्या दुचाकीवर जात असताना संदीप गोडसे यांनी ए राजा अशी हाक मारून मला थांबविले. त्यावेळी संदीप आपणाजवळ येऊन तुझी बायको नगरसेविका असताना तू मध्ये मध्ये चोंबडापणा करून राजकारणात भाग का घेतोस? तसेच आपणास जातीवाचक बोलत तुला मस्ती आली आहे का? गावच्या राजकारणात तू कशाला भाग घेतोस, असे म्हणून आपणास जातीवाचक शिवीगाळ केली. त्यावेळी संदीप गोडसे याने श्रीमुखात लगावून आपल्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावली, अशी फिर्याद राजेंद्र चव्हाण यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक पाटील करीत आहेत. 

हेही वाचा : दमल्या भागलेल्यांना चैतन्य देऊन गेला नागेश्‍वर