Maratha Kranti Morcha : सांगली जिल्ह्यात कडकडीत बंद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

सांगली - मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांतीतर्फे संपूर्ण जिल्ह्यात आज कडकडीत मात्र शांततेत बंद ठेवण्यात आला आहे.

सांगली - मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांतीतर्फे संपूर्ण जिल्ह्यात आज कडकडीत मात्र शांततेत बंद ठेवण्यात आला आहे. व्यापार, व्यवसाय, औद्योगिक वसाहती, बहुतांश साखर कारखाने, बॅंका, सहकारी संस्था, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकसह सर्व महाविद्यालय बंद ठेवण्यात आली होती.

सांगली, मिरज, कुपवाड शहरासह सर्व तालुके, गावोगावात सकाळी मराठा क्रांतीच्या आंदोलकानी फेऱ्या काढल्या. सर्व तसहिल, सांगलीत स्टेशन चौक, जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत, प्रमुख चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर टायर पेटवून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी "एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतोय देत नाय, घेतल्याशिवाय रहात नाय.' अशा घोषणा दिल्या जात होत्या. यामुळे रस्त्यावर मोजकीच वाहने फिरतानाचे चित्र होते. 

सकाळपासूनच जिल्ह्यातील एस. टी. वाहतुक बंद राहिली. जिल्ह्यातील मिरज-पंढरपूर रोड, सांगली-इस्लामपूर रोडवरील लक्ष्मी फाटा, पद्माळे फाट्यासह माधवनगर, बुधगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. बुधगाव, माधवनगर ते सांगली वाहतुक पूर्णपणे ठप्प राहिली. जिल्ह्यात बंद शांततेत पार पाडावा, असे आवाहन मराठा क्रांतीने आवाहन केले होते. 

दूध बंद, इंधन चालू 

मराठा क्रांती मोर्चाने जाहीर केलेल्या बंदच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील दूध संकलन बंद ठेवण्यात आले. सकाळी दूध संकलन बंद असल्याने सुमारे 7 लाख लिटर दूधाचे संकलन ठप्प राहिले. अत्यावश्‍यक सेवांमध्ये रुग्णालये, औषधालये आणि इंधन पंप सुरु ठेवण्यात आले होते. इंधन पंप सुरु ठेवायचे की बंद करायचे, याविषयी स्पष्टता नसल्याने अनेक ठिकाणी पंप बंद करायला भाग पाडण्यात आले. शहरातील इंधन पंप सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण भागात पुन्हा पंप सुरु करण्यात आले. 

पोलिसांचे आवाहन 
सांगली, मिरज शहरातून पोलिस गल्लोगल्ली फिरून शांततेत बंद पाळण्याचे आवाहन करत आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा जागोजागी तैनात करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा स्वतः मैदानात उतरले असून बंदच्या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्तावर ते नजर ठेवून आहेत. 

सरकारी काम बंद अन्‌ चालू 

शहरांत शासकीय कार्यालये सुरु आहेत. जिल्हा परिषदेचे कामकाज सुरु आहे, मात्र जिल्हा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी अन्य मागण्यांसाठी आंदोलन पुकारले असून ते धरणे धरून आहेत. त्यामुळे बंद आणि चालू अशी सरकारी कार्यालयांची स्थिती आहे. 

जिल्ह्यात सकाळी आठ वाजल्यापासून इंटरनेट सेवा बंद राहिली. काही कंपन्यांची सेवा मात्र सुरु होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morach Sangli Bandh