Maratha Reservation : अधिवेशनात मराठा आरक्षणाचा आवाज घुमणार; अनिल बेनके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maratha reservation case came up again Maratha protest anil benke belgaum

Maratha Reservation : अधिवेशनात मराठा आरक्षणाचा आवाज घुमणार; अनिल बेनके

बेळगाव - गेल्या वीस वर्षापासून मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी सरकार दरबारी सातत्याने केली जात आहे. आरक्षणा विना मराठा समाजाची प्रगती खुंटली आहे. त्यामुळेच आरक्षणाच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी, मंगळवार दिनांक 20 डिसेंबर रोजी समस्त मराठा समाजाच्या वतीने सुवर्णसौध समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनात राज्यातील सर्व मराठा आमदार मराठा आरक्षणाची मागणी लावून धरणार असल्याची माहिती बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

यावेळी पुढे बोलताना आमदार बेनके म्हणाले, कर्नाटक सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या शंकराप्पा आयोगाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी शिफारस सरकारकडे केली आहे. आरक्षण मागणी संदर्भात आत्तापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. येडीयुरप्पा यांनीही ४ वर्षांपूर्वी आपल्या मुख्यमंत्री काळात मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र तरीही सदर मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळेच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रमुख मागणी साठी हिवाळी अधिवेशनादरम्यान येत्या मंगळवारी सुवर्णसौध समोर समस्त मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण राज्यातील मराठा समाजाचे आमदार एकत्र येऊन विधानसभेत आरक्षणाची प्रमुख मागणी मांडणार आहेत असेही बेनके यांनी स्पष्ट केले.

सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव म्हणाले, मराठा समाजाचे स्वामी, मंजुनाथस्वामी यांच्या नेतृत्वाद्वारे राज्यातील मराठा समाजाचे आमदार एकत्र येऊन, सदनात मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरण्याबाबत चर्चा करणार आहेत. मागील वर्षीच्या आंदोलनानंतर सरकारने यावर्षी मराठा समाज विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे.त्यातून समाजातील विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे, असेही किरण जाधव यांनी स्पष्ट केले. मराठा समाजयुवा नेते विनय कदम यांनी आरक्षण मागणी मान्य न झाल्यास सकल मराठा समाजाचे आंदोलन निरंतर सुरू राहील असा इशारा दिला. यावेळी कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचे जिल्हाध्यक्ष वैभव कदम, युवा नेते धनंजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष महेश रेडेकर, राज्य कार्यदर्शी विठ्ठल वाघमोडे,झंगरुचे, गणपत पाटील, संजय पाटील,बंडू कुद्रेमणीकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.