Marathi Bhasha Din : 'डिजिटलायझेशन'मुळे वाचेल माय मराठी! संशोधन, लेखनाला मोठा वाव; गुणवत्ता राखल्यास संवर्धन होईल

सहज बोलण्यातही इंग्रजी, हिंदी शब्द वापरुन मराठी शब्दाला (Marathi language) प्रतिशब्द वापरले जातात, हे चित्र अस्वस्थ करणारे आहे.
Marathi Bhasha Din 2024
Marathi Bhasha Din 2024esakal
Summary

मराठी भाषासमृद्ध असणाऱ्या व्यक्तीला अनेक संधी आहेत. व्याकरण, अचूकता, दर्जा असेल तर नोकरीच्या संधी निश्चित उपलब्ध आहेत.

सांगली : ‘माझ्या मराठीची बौलु कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके’, असे म्हणत मराठी भाषेविषयीचा अभिमान व महती संत ज्ञानेश्वरांनी (Sant Dnyaneshwar) व्यक्त केली. इंग्रजीच्या आक्रमणात मराठी भाषेला दुय्यम महत्त्‍वाचे समजल्या जाणाऱ्या काळात आज परदेशी भाषा शिकण्याचा ‘ट्रेंड’ येतोय. मराठी भाषा (Marathi Bhasha Gaurav Din) वाचावी, टिकावी, विस्तारावी, अभिवृद्धी व्हावी, यासाठी शासनपातळीवर प्रयत्न सुरू आहेतच. त्यासोबत मराठी भाषेच्या अभ्यासक, समीक्षक, लेखकांचीही तेवढीच जबाबदारी आहे. त्याबाबत तज्ज्ञांची मतमतांतरे...

मराठी भाषेवर हिंदी व इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढता वाढता वाढत आहे. सहज बोलण्यातही इंग्रजी, हिंदी शब्द वापरुन मराठी शब्दाला (Marathi language) प्रतिशब्द वापरले जातात, हे चित्र अस्वस्थ करणारे आहे. अन्य भाषा शिकण्याबद्दल काहीच दुमत असण्याचे कारण नाही. मात्र मातृभाषा पक्की हवीच हवी. ती नीट बोलता, लिहिता, वाचता येते का? याची खात्री असावी. तरच अन्य भाषांचेही सौंदर्य समजेल. अन्यथा लंगड्याने धावण्याच्या शर्यतीत भाग घेतल्यासारखी अवस्था होईल. वर्तमानपत्र किंवा साहित्य लिहिताना, वाचताना शब्द, व्याकरणाचे भान ठेवून, त्याची उकल करून ते वापरण्याची जबाबदारी लेखकाने घ्यावी. डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी अन्य भाषांच्या तुलनेत मागे आहे. त्यासाठी निष्ठेने काम करण्याची गरज आहे. मराठी भाषासमृद्ध असणाऱ्या व्यक्तीला अनेक संधी आहेत. व्याकरण, अचूकता, दर्जा असेल तर नोकरीच्या संधी निश्चित उपलब्ध आहेत.

-प्रा. डॉ. विष्णू वासमकर, ज्येष्ठ समीक्षक, सांगली

Marathi Bhasha Din 2024
Marathi Bhasha Gaurav Din : मराठी भाषा धोरणाची ११ वर्षांनंतरही होऊ शकली नाही अंमलबजावणी

सध्या विकिपिडियावर जुने संदर्भ साहित्य उपलब्ध आहेत. ते खूप त्रोटक स्वरुपात आहेत. त्याचा निश्चिच अर्थबोध होत नाही. त्यात कालानुरुप बदल होणे अपेक्षित आहे. त्यासाठी नव्या पिढीने त्यात बदल करणेही क्रमप्राप्त आहे. नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापकांना संशोधन, लेखन यांसह अन्य गोष्टींना खूप वाव आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विकिपिडीया हा मोठा संदर्भ मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग ठरू शकतो. विकिपिडियावर गेल्या ४ वर्षांत १७०० ग्रंथ आले आहेत. अजूनही सुमारे ४०० लेखकांचे ५ हजार ग्रंथ या प्रवाहात येणे बाकी आहे. मराठी समृद्ध होऊन ती सर्वव्यापी होण्यासाठी हे काम नव्या पिढीने हातात घेणे गरजेचे आहे.

-सुबोध कुलकर्णी, मुक्त ज्ञान निर्मिती क्षेत्रातील तज्ज्ञ, सांगली

Marathi Bhasha Din 2024
Marathi Bhasha Din: कशी निर्माण झाली मराठी भाषा? जाणून घ्या हजार वर्षांचा इतिहास

विविध व्यवसाय व उद्योगधंद्यातील भाषांचे मराठी भाषेत लिखित कोश होणे आवश्यक आहे. व्यावसायिक, उद्योजक किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी बोलताना, पत्रव्यवहार करताना मराठीचाच आग्रह धरला पाहिजे. मातृभाषा मराठी असणाऱ्या प्रत्येकाने प्रथम मराठीचा सांगोपांग अभ्यास करून ती आत्मसात केल्यास मराठी भाषेचा गोडवा अखंड राहील. सर्वच क्षेत्रातील संबंधित सेवा, माहिती किंवा उपयोगितेचे मराठीत विकिपिडियाप्रमाणे डिजिटलायझेशन होणे काळाची गरज आहे. ‘क्युआर कोड’ची सुविधा देऊन मराठी वाचनाची गरज जाणीवपूर्वक निर्माण होऊ शकते. परकीय भाषा किंवा परदेशी शिक्षणाचा ओढा हा नोकरी व उपजिविकेच्या अधिक संधी असल्याने वाढणे साहजिक आहे. पदवी व पदव्युत्तर मराठी शिकून पोटा-पाण्याचा प्रश्न सुटतो काय, या युवकांच्या मनातील प्रश्नाचे उत्तर भाषासंशोधक व शासनाने देण्याची जबाबदारी घ्यावी.

-दयासागर बन्ने, कवी, लेखक, सांगली

Marathi Bhasha Din 2024
Marathi Bhasha Gaurav Din : मराठी भाषा गौरवदिन अन् मराठी राजभाषा दिन फरक माहितीये? जाणून घ्या

भाषा समृद्ध होण्यासाठी ती वापरणाऱ्या लोकांची संख्या वाढणे महत्त्वाचे आहे. व्यावसायिक मराठी समृद्ध होण्यासाठी सफाईदार वापर, संवाद कौशल्याचा विकास आणि भाषाशैलीवर प्रभुत्व असावे. त्या दृष्टीने शाळा आणि महाविद्यालयीन स्तरावरच प्रयत्न गरजेचे आहे. प्रमाणभाषेबरोबरच इतर बोलीभाषा जपणे, त्यांचा योग्य वापर अपेक्षित आहे. किमान भाषेला तरी जाती-धर्माच्या बंधनात अडकवू नये, अन्यथा तिचे संरक्षण व संवर्धन होत नाही. डिजिटल युगामध्ये मराठीचे स्थान बळकट करायचे असेल तर कुशल, तंत्रज्ञांनी काम केले पाहिजे. बरेच इंग्रजी शब्द असे आहेत की जे मराठीतले आहेत, असे आपल्याला वाटते. शाळा, महाविद्यालयीन स्तरावर मराठीला फारशी किंमत उरलेली नाही, हे कटूसत्य आहे. सर्व माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालयामधून मराठी अनिवार्य करावी. त्याचप्रमाणे अध्यापकाचा दर्जा तपासूनच त्याची नियुक्ती व्हावी. तज्ञ शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाल्यास भाषेची गोडी निर्माण होईल.

-डॉ. आर. जी. कुलकर्णी, प्राचार्य मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com