नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पोलिस यंत्रणा सज्ज : विश्वास नांगरे-पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 डिसेंबर 2017

नविन वर्षात अनेक विधायक उपक्रम हाती घेता येतात. त्यापैकी एखादा चांगला उपक्रम हाती घेऊन नव्या वर्षाचे शानदार स्वागत करता येते. त्यासाठी लोकांनी प्राधान्य द्यावे. पार्ट्या व मद्यधुंद अवस्था टाळून नव्या आदर्शातून वाटचाल करूनही नव्या वर्षाचे स्वागत करता येऊ शकते. त्यासाठी प्रयत्न करावेत.

(विश्वास नांगरे-पाटील, विशेष पोलिस महानिरिक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र)

कऱ्हाड : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गड किल्ल्यावर विना परवाना होणाऱ्या पार्ट्यांवर कारवाई होणार आहे. पार्टीतही डॉल्बी लावण्यास बंदी आहे, तसा दणदणाट झाल्यास तो लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. कोल्हापूर परिक्षेत्रात मोठा महामार्ग येतो. त्यावर दारू पिऊन वाहन चालवण्याचे प्रकार 31 डिसेंबरला होतात. त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी 'सकाळ'ला दिली. 

नांगरे-पाटील यांनी परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यातील गड व किल्ल्यांवर होणाऱ्या पार्ट्यांवर बंदी घातली आहे. त्याबाबत माहिती देताना ते म्हणाले, "कोल्हापूर परिक्षेत्रात येणाऱ्या पाच जिल्ह्यांमध्ये पर्यटन केंद्र मोठ्या प्रमाणात आहेत. त्या पर्यटन केंद्रावर नववर्षाचे स्वागत व त्या निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यासाठी 31 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि नागरिकांना चांगल्या प्रकारे सुरक्षित वातावरणात नवीन वर्षाचे स्वागत करता यावे, यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे. 31 डिसेंबर शांततेत साजरा करण्याचे आवाहनही आम्ही केले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व पुणे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळ आहेत. अनेक ठिकाणी गडकोटांची स्थिती मजबूत आहे. ती स्थिती लक्षात घेऊन प्रत्येक ठिकाणी सुचना दिल्या आहेत. लोणावळा, महाबळेश्वर, पाचगणी, पन्हाळा यांसारख्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. रस्तावर दारु पिऊन गाडी चालवणे अथवा दारु पिऊन गोंधळ घालणारांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. 

ते म्हणाले, परिक्षेत्रात अनेक गड कोट व किल्ले आहेत. त्या ठिकाणी पार्टी होऊ देणार नाही. अशा ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा असल्यास त्या संबधितांना परवानगी घ्यावी लागेल, विना परवाना होणाऱ्या पार्ट्यांसह कार्यक्रमांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.

वासोटा, सिंहगड, अजिंक्यताऱ्यासह परिक्षेत्रात गड किल्ले मोठ्या प्रमाणात आहेत. गड किल्ल्यांवर परवानगीशिवाय पार्ट्या होऊ दिल्या जाणार नाहीत. त्यांचे पावित्र्य राखावे. त्यामुळे अशा किल्ल्यांवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. पर्यटन स्थळामध्ये लोणावळा, महाबळेश्वर, पाचगणी, पन्हाळा येथे चोख पोलिस बंदोबस्त असणार आहे. नागरिकांनी नववर्षाचे स्वागत शांततेत करावे. 

सार्वजनिक ठिकाणी अथवा गाडी चालवताना दारु पिऊ नये. तसे कोणी आढळल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. डॉल्बीचा दणदणाटही चालणार नाही. डॉल्बी लावल्यासही गुन्हे दाखल करण्यात येतील. सुट्टीचा दिवस आहे, तेथे वाहतूक नियंत्रित करणे महत्वाचे आहे. त्याकडे प्रत्येक पोलिस ठाण्याने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात आली आहे. सगळ्या मोहिमेत ग्राम सुरक्षा दल व पोलिस पाटलांची मदत घेणार आहोत. त्याचीही तयारी पोलिसांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news local satara news police officer vishwas nangare patil