रंगीबेरंगी फुलांनी बहरली पळसाची झाडे

सुनील अकोलकर 
गुरुवार, 1 मार्च 2018

तिसगाव (नगर) : गर्भगिरीच्या डोंगरात सध्या चोहीकडे मोठय़ा प्रमाणात पळस बहरला आहे. लाल व केशरी रंगाच्या फुलांनी बहरलेली पळसाची झाडे सध्या सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. डोंगर-दऱ्या आणि शेताचे बांध फुलांनी लगडलेल्या पळसाच्या झाडाने शोभून दिसत आहेत.

तिसगाव (नगर) : गर्भगिरीच्या डोंगरात सध्या चोहीकडे मोठय़ा प्रमाणात पळस बहरला आहे. लाल व केशरी रंगाच्या फुलांनी बहरलेली पळसाची झाडे सध्या सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. डोंगर-दऱ्या आणि शेताचे बांध फुलांनी लगडलेल्या पळसाच्या झाडाने शोभून दिसत आहेत.

शिशिराची थंडी ओसरायला लागली, पानगळीने उघडी पडलेली वृक्षराजी नव्या पालवीचे लेणे अंगावर मिरवायला लागली की वसंताची चाहुल लागते. या वसंतात फक्त रंगांची उधळण, रंगोत्सव सुरू होतो निसर्गाचा. शिशिरात बोडक्या झालेल्या शेताला केशरी, लाल रंगात न्हाऊ घालणारा पळस बहरला आहे. वसंताचे स्वागत करण्यासाठी पळस नटलेला चोहीकडे पाहण्यास मिळत आहे. झाडाच्या प्रत्येक फांदीवर लगडलेली फुले विस्तवाच्या गोळ्यांसारखे दिसत आहेत. २०-२५ फूट उंच असणाऱ्या पळसाला संस्कृतमध्ये पलाश म्हणतात. याचा अर्थ फुलांनी डवरलेले झाड असा होतो. कुठेही गेले तरी पळसाला पाने तीनच, अशी म्हण प्रचलित आहे. पळसाची पानेही फार उपयोगी आहेत. पूर्वी या पानांपासूनच मोठय़ा पंगतीला जेवण देण्यासाठी द्रोण आणि पत्रावळ्या बनविल्या जात. 

पळस हा डोंगराळ भागात किंवा शेताच्या धुऱ्या-बांधावर दिसणारा वृक्ष.  शेतात जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेताना तो दिसत आहे. बहरात आलेला पळस तर अक्षरश: ज्वालेसारखा दिसू लागला आहे. पूर्वी धुलिवंदनाला एकमेकांच्या अंगावर टाकण्यासाठी उपयोगात येणारा रंग बनविण्यासाठी पळस फुलांचा वापर केला जात असे. तर आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणूनही याचा वापर होत असे. पळसाची फुले पाण्यात टाकून स्नान केले तर त्वचारोग नाहिसा होतो असे सांगितले जाते. सध्या त्याच्याकडे लक्ष जाताच पाहणाऱ्याच्या डोळ्यांना भुरळ घालणारा पळस सध्या लाल गडद झाला असून शेतांमध्ये कडक ऊन असतानाही डोळ्यांना थोडा का होत नाही, पण दिलासा देणारा म्हणूनच ओळखला जात आहे.

Web Title: Marathi news nagar news colorful flowers on trees