साताऱ्यात झेंडू फुलांची रेलचेल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

सातारा - नागरिकांचा दसरा पिवळाधमक करण्यासाठी येथील बाजारपेठेत आज झेंडूच्या फुलांची रेलचेल झाली. यावर्षी फुलझाडांच्या वाढीवेळी झालेला चांगला पाऊस, त्यानंतर मिळालेली उघडीप आणि स्वच्छ वातावरणामुळे जिल्ह्यात फुलांचे मोठे उत्पादन झाल्याने येथे आज झेंडूच्या फुलांचे विक्रीसाठी ठिकठिकाणी ढीग लागले होते. आज सकाळी फुलांची प्रति किलो 40 ते 60 रुपयांनी विक्री सुरू होती. दरम्यान, फुलांची वाढलेली आवक अन्‌ दरवर्षी सायंकाळी त्याच्या गडगडणाऱ्या दरामुळे दुपारपर्यंत फुलांना फारसे ग्राहक नव्हते. 

दसरा-दिवाळीत झेंडूच्या फुलांना मोठा मान असतो. घर, वाहनांना झेंडूच्याच फुलांच्या माळा घातल्या जातात आणि पूजेसाठीही झेंडूची फुले आणली जातात. यामुळे दसरा आणि दिवाळीत फुले विक्रीस यावीत, अशा पद्धतीने शेतकरी झेंडूच्या फुलांची लागवड करतात. यावर्षीही जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर फुलशेती केली आहे. वाई, सातारा, कऱ्हाड, कोरेगाव तालुक्‍यांप्रमाणे दुष्काळी खटाव, माण तालुक्‍यांतही झेंडूच्या बागा फुलल्या आहेत. त्यातच लागवडीनतंरच्या पोषक वातावरणामुळे फुलांचे उत्पादन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यामुळे येथे सर्वत्र आज फुलांची रेलचेल जाणवत होती. शेतकरी टेंपो भरून येथे फुलांची पोती आणत होते. परिसरातील शेतकरी सायकलवरून पोती घेऊन येत होते. सकाळपासूनच राजवाडा परिसर, पोवई नाका, बस स्थानक तसेच सातारा-कोरेगाव रस्त्याच्या कडेला शेतकऱ्यांनी विक्रीसाठी फुलांचे ढीग टाकले होते. ग्रामीण भागातही आज सकाळी 40 रुपये किलोने चांगली फुले विकली जात होती. येथे हा दर फुलांच्या प्रतीप्रमाणे 40 ते 60 रुपये होता. मात्र, दुपारपर्यंत तरी ग्राहकांची वर्दळ अतिशय कमी होती. सायंकाळी फुले नेहमीच स्वस्त मिळतात, या अनुभवामुळे कदाचित गर्दी कमी असावी, अशी चर्चा होती. 

आज भवानी तलवारीचे पूजन अन्‌ सीमोल्लंघन 
दरवर्षी पारंपरिक पद्धतीने उद्या (ता.18) दसऱ्यादिवशी साताऱ्यात भवानी तलवारीचे पूजन करून मिरवणूक काढली जाते. सायंकाळी पाच वाजता जलमंदिर पॅलेस येथे श्री भवानी तलावारीचे पूजन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते होईल. त्यानंतर भवानी तलवार पालखीत ठेवून पोवई नाका येथील श्री शिवाजी सर्कल येथे नेण्यात येणार आहे. ही पालखी मिरवणूक जलमंदिर पॅलेस, राजवाडा, मोती चौक, कमानी हौद, शेटे चौक, पोलिस मुख्यालयमार्गे पोवई नाक्‍यापर्यंत काढण्यात येणार आहे. तेथे खासदार उदयनराजे हे भवानी तलवारीचे पूजन करून सीमोल्लंघन साजरे करणार आहेत. पुन्हा जलमंदिर पॅलेस येथे धार्मिक विधी झाल्यानंतर राजमाता कल्पनाराजे भोसले, खासदार उदयनराजे, दमयंतीराजे कुटुंबासह नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marigold flower in Satara