पावणेअठरा लाखांचा गांजा जप्त; उमराणी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

बादल सर्जे
Wednesday, 7 October 2020

उमराणी (ता. जत, जि. सांगली ) येथे मल्लाप्पा ईरगोंडा बिराजदार (वय 65) याच्या उसाच्या शेतीत लागवड केलेली 147 किलो वजनाची गांजाची झाडे सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आज जप्त केली आहे.

जत : उमराणी (ता. जत, जि. सांगली ) येथे मल्लाप्पा ईरगोंडा बिराजदार (वय 65) याच्या उसाच्या शेतीत लागवड केलेली 147 किलो वजनाची गांजाची झाडे सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आज जप्त केली आहे. त्या झाडांची सुमारे 17 लाख 76 हजार इतकी किंमत होते. अधिक तपासासाठी बिराजदार याला अटक करून जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की नूतन पोलिस अधीक्षक दीक्षित गेंडाम व अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा डुबूल यांनी अवैधरीत्या गांजातस्करीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यासाठी स्वतंत्र पथकही तयार करण्यात आले आहे. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक आज तालुक्‍यात गांजाची माहिती घेत असताना पोलिस नाईक मुदतसर पाथरवट यांना मल्लाप्पा बिराजदार याच्या उसाच्या शेतीत गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बिराजदार याच्या शेतात जाऊन पाहणी केली. त्या वेळी उसाच्या शेतीत गांजाची झाडे आढळून आली. पंचांसमक्ष झाडांचा पंचनामा करीत ती जप्त करण्यात आली. बिराजदार याला अटक करून अधिक तपासासाठी जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

"खुलेआम गांजाची लागवड' या मथळ्याखाली जत तालुक्‍यातील गांजासंदर्भातील बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाली होती. यानंतर पोलिस अधीक्षक गेडाम, अप्पर पोलिस अधीक्षक डुबूल यांनी सांगली जिल्ह्यात गांजाची लागवड करणारे व विक्री करणारे यांच्यावर कारवाई करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार उमराणी येथे पोलिसांनी ही कारवाई केली.

या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, उपनिरीक्षक अभिजित सावंत, सहायक पोलिस फौजदार अच्चुत सूर्यवंशी, राजेंद्र मुळे, जितेंद्र मुळे, आमसिद्धा खोत, राजू शिरोळकर, महादेव दुधाळ, सचिन कुंभार, श्री. पाथरवट, राहुल जाधव, प्रशांत माळी, अरुण सोकटे यांनी कारवाईत सहभाग घेतला. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marijuana worth 18 lakh seized at Umarani by police