
कोरोनाचे निमित्त सांगत पोलिसांनी समिती कार्यकर्त्यांना फेरी काढण्यास मज्जाव केला
बेळगाव: रहेंगे तो महाराष्ट्र में नही तो जेल में अशी गर्जना करीत 17 जानेवारी 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी होतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना रविवारी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने अभिवादन करण्यात आले. मात्र कोरोनाचे निमित्त सांगत पोलिसांनी समिती कार्यकर्त्यांना फेरी काढण्यास मज्जाव केला त्यामुळे कार्यकर्त्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त झाली.
प्रारंभी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर, महिला आघाडीच्या रेणू किल्लेकर, युवा समितीचे शुभम शेळके आदीनी पुष्पचक्र घालून हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर अनसुरकर गल्ली व किर्लोस्कर रोड भागात फिरून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, नही चलेगी, नही चलेगी दादागिरी नही चलेगी आदी घोषणा देण्यात आल्या.
माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी राज्य पूर्णरचनेचा अहवाल आल्यानंतर बेळगावात आगडोंब उसळला आणि या दिवशी 5 हुतात्मे झाले तेंव्हापासून मराठी जनता महाराष्ट्र राज्यात जाण्यासाठी प्रयत्नशील असून हुतात्म्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यापुढेही कार्यरत राहूया असे मत व्यक्त केले. यावेळी प्रकाश मरगाळे, महापौर सरिता पाटील, मदन बामणे, गणेश दड्डीकर, नेताजी जाधव, विजय पाटील, शुभम शेळके, दिंगबर पवार, ऍड राजाभाऊ पाटील, दिलीप बैलूरकर, सुहास किल्लेकर, अजित कोकणे, महेश जुवेकर, राम भिंगुर्डे, मारुती मरगानाचे, विनायक गुंजटकर, शिवाजी हंडे, तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर, विजय हलगेकर, ऍड महेश बिर्जे, परेश शिंदे, रवी साळुंखे, मनोहर हलगेकर, नेताजी मनगुतकर, धनंजय पाटील आदी उपस्थित होते.
संपादन- अर्चना बनगे