महायुतीचेच सरकार बनवावे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 November 2019

महायुतीमधील घटक पक्षांत मतभेद झाले आणि त्यामुळेच सरकारस्थापनेचा दावा केला नाही, याचा पुनरुच्चार करीत, राज्यात महायुतीचे सरकार बनवावे, असा आशावाद भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांनी आज नगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. 

नगर : महायुतीमधील घटक पक्षांत मतभेद झाले आणि त्यामुळेच सरकारस्थापनेचा दावा केला नाही, याचा पुनरुच्चार करीत, राज्यात महायुतीचे सरकार बनवावे, असा आशावाद भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांनी आज नगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. 

भारतीय जनता पक्षाअंतर्गत निवडणुकीच्या बैठकीसाठी खासदार गिरीश बापट आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. शहर जिल्हाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत दोन स्वतंत्र बैठका त्यांनी घेतल्या. या वेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार चंद्रशेखर कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

बापट म्हणाले, ""महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे 105 आमदार निवडून आले आहेत. महायुतीला जनतेने निर्विवाद बहुमत दिले. त्या मताचा भारतीय जनता पक्ष आदर करते. आमचे प्रदेश पातळीवरचे नेतृत्व योग्य तो विचार करून योग्य तो निर्णय घेतील. लवकरच राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन होऊन आम्ही जनतेच्या सेवेकरिता कटिबद्ध आहोत. आम्हाला अधिक जोमाने आणि उत्साहाने काम करायचे आहे. अशाच पद्धतीचा योग्य निर्णय नेतृत्व घेईल, असा आमचा विश्‍वास आहे.'' 

दरम्यान, सर्वाधिक जागा जिंकूनही भारतीय जनता पक्षाने सत्तास्थापनेचा दावा केला नाही, असे विचारले असता बापट म्हणाले, ""महायुतीमध्ये घटक पक्षांत मतभेद झाले म्हणून सत्तास्थापनेचा दावा केला नाही. याबद्दल मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांच्या भेटीवेळी भूमिका स्पष्ट सांगितली.'' 
भाजपने शब्द पाळला नाही, असा आरोप शिवसेनेने केला आहे. याबद्दल विचारले असता बापट म्हणाले,

""शब्द कोणी कोणाला दिला होता, तो कोणी पाळला नाही, याबद्दल आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना काही माहीत नाही. त्याबद्दल पक्षनेतृत्व योग्य निर्णय घेईल. राज्यात महायुतीचेच सरकार बनावे, हा जनादेश आहे आणि आम्ही जनादेशासोबत आहोत. राज्यातील सरकारस्थापनेच्या गुंत्यामध्ये राष्ट्रीय नेतृत्व वेळ आल्यानंतर लक्ष घालेल. आम्ही त्यांचे मार्गदर्शन घेऊनच काम करतो.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: May be the government of Mahayuti