सोलापूर महापौरपदासाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

विजयकुमार सोनवणे
Tuesday, 5 November 2019

महापौरपदाच्या इच्छुकांमध्ये पालकमंत्री विजय देशमुख यांचे चिरंजीव डॉ. किरण देशमुख यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्या खालोखाल सुभाष देशमुख समर्थक राजेश काळे, नागेश वल्याळ यांचीही नावे चर्चेत आहेत. सध्याच्या महापौर शोभा बनशेट्टी यांना विधानसभा निवडणुकीमुळे तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली. ही मुदत 7 डिसेंबर रोजी संपणार आहे.

सोलापूर : विधानसभेच्या रणधुमाळीनंतर महापालिका क्षेत्रात आता महापौर निवडीचे वेध लागले आहे. आरक्षण काय निघणार त्यावर महापौरपदाची संधी कुणाला मिळणार हे निश्‍चित होणार असले तरी, सोलापूर महापालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित होईल अशी शक्‍यता गृहीत धरून अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. 10 ते 15 नोव्हेंबदरम्यान आरक्षण सोडत निघण्याची शक्‍यता आहे.

महापौरपदाच्या इच्छुकांमध्ये पालकमंत्री विजय देशमुख यांचे चिरंजीव डॉ. किरण देशमुख यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्या खालोखाल सुभाष देशमुख समर्थक राजेश काळे, नागेश वल्याळ यांचीही नावे चर्चेत आहेत. सध्याच्या महापौर शोभा बनशेट्टी यांना विधानसभा निवडणुकीमुळे तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली. ही मुदत 7 डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यानंतर आठ डिसेंबर रोजी नवीन महापौरांची निवड होणार आहे. महापालिकेत भाजपचे 49, शिवसेनेचे 21, कॉंग्रेस 14, एमआयएम नऊ, राष्ट्रवादी कॉंग्रेस चार, वंचित बहुजन आघाडी तीन, बसप एक, माकप एक असे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे महापौर भाजपचाच होणार याबाबत दुमत असणार नाही.

शिवसेनेमध्ये सुरु असलेल्या गदारोळाच्या पार्श्‍वभूमीवर काही विभागणी झाल्यास विरोधी पक्षनेतेपद 14 जागा असलेल्या कॉंग्रेसकडे जाईल, शिवसेनेचे नगरसेवक कायम राहिल्यास विरोधी पक्षनेतेपदही त्यांच्याकडेच राहील. गेल्या साडेसात वर्षांपासून महापौरपदावर महिला विराजमान आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील पुरुषांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. गेल्या दहा वर्षांतील चार टर्ममध्ये सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, ओबीसी महिला आणि अनुसूचित जाती महिला व खुल्या प्रवर्गातील महिलासाठीचे आरक्षण झाली आहेत. विद्यमान महापौर शोभा बनशेट्टी यांची मुदत आता 7 डिसेंबर रोजी संपेल. त्यामुळे आता आरक्षण काय निघणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

गेल्या दहा वर्षांतील आरक्षणे व महापौर

कालावधी आरक्षण महापौर
-------------------------------------------------
2009-12 सर्वसाधारण आरिफ शेख
2012-14 ओबीसी महिला अलका राठोड
2014-17 अनुसूचित जाती महिला प्रा. सुशीला आबुटे
2017-19 सर्वसाधारण महिला शोभा बनशेट्टी (विद्यमान)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mayor post in Solapur Municipal corporation