
सांगली : पुणे पदवीधर मतदारसंघात अरुण लाड यांच्या विजयाची पताका फडकवल्यानंतर आज पुन्हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दुसरा धक्का दिला. 2014 पासून भाजपने पश्चिम महाराष्ट्रात आपला पसारा वाढवत कॉंग्रेस-राष्ट्रवादी खिळखिळी करण्याचा अटोकाट प्रयत्न केला होता. मात्र राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच पुन्हा एकदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आपल्या ढासळलेल्या बालेकिल्ल्याची जागोजागी डागडुजी सुुरु केली आहे. सांगली महापालिकेतील सत्तांतर त्याची एक वीट आहे.
राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सध्या पश्चिम महाराष्ट्रात मोठे घमासान सुरु आहे. या दोन्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्रातीलच आहेत. सांगली-कोल्हापूर या जुळ्या जिल्ह्यांमधील या दोघा नेत्यांमध्ये सतत राजकीय कलगीतुरा सुरुच असतो. पुणे पदवीधर मतदारसंघातून दोनवेळी विजयी झालेल्या चंद्रकांत पाटील यांनी यावेळी या निवडणुकीसाठी भाजपकडून सांगली जिल्ह्याचा उमेदवार दिला होता.
भाजपचे संग्रामसिंह देशमुख आणि राष्ट्रवादीचे अरुण लाड यांच्यातील हा सामना एकाअर्थाने दोन प्रदेशाध्यक्षामधीलच होता. ही लढत तब्बल पन्नास हजारांच्या फरकाने जिंकत भाजपचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर या दोन नेत्यांमध्ये सतत टिकायुध्द सुरुच होते. देवेंद्र फडणीवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये नंबर दोनचे स्थान असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादीला खिळखिळे करण्यासाठी या पक्षातून मोठे पक्षांतर घडवले होते. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपचा अश्वमेध सुरुच होता.
जयंतरावांच्या इस्लामपूरमध्येच सत्तांतर घडवत भाजपने पाच वर्षापुर्वी कडी केली होती. जयंत पाटील यांच्यासाठी हा धक्का जिव्हारी लागणारा होता. मात्र राज्यातील सत्तेमुळे त्यांच्या होमग्राऊंडमध्ये जयंतरावांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत होता. राज्यातील सत्ताबदल होताच जयंतरावांनी उट्टे काढायला सुरवात केली. सांगली,सातारा,कोल्हापूर जिल्ह्यात पक्षवाढीसाठी हालचाली सुरु केल्या होत्या. महापालिकेतील सत्तेची अडीच वर्षे पुर्ण केल्यानंतर भाजपला धोबीपछाड करायचाच याचा डाव त्यांनी आखला होता. ही चर्चा सुरु होताच अशा सत्तेत आम्हाला स्वारस्य नाही असे सांगत त्यांनी आम्ही त्या गावाला जाणारच नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता. त्यांचे हे विधान म्हणजे कात्रजचा घाट होता. याची भाजप नेत्यांनाही कल्पना होती. कारण सत्ताबदलानंतर एकदाही त्यांनी पालकमंत्री म्हणून महापालिकेत पाऊल टाकले नव्हते.
महापौर गीता सुतार यांनी निमंत्रण दिले असता त्यांनी मी लवकरच येऊ असे सांगताना कधी येऊ हे मात्र सांगितले नव्हते. याऊलट चंद्रकांत पाटील यांना महापालिकेत भाजपचा ब्रॅन्डेड महापौर होणार असा जाहीर उच्चार करीत जयंतरावांना खुले आव्हानच दिले होते. कारण सांगली जिल्ह्यात भाजप आणि जयंतरावांचा दोस्ताना तसा खूप जुना आहे. भाजपला सोबत घेत त्यांनी जिल्ह्यात कॉंग्रेसला नामोहरम केले होते. आता म्हशीपेक्षा रेडकू मोठे झालेल्या भाजपला नामोहरम करण्यासाठी कॉंग्रेसला सोबत घेतले आहे.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.