Belgaum : रिंगरोडसाठीही हालचाली सुरू होणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ring Road

रिंगरोडसाठीही हालचाली सुरू होणार?

बेळगाव : शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढत बायपासचे काम हाती घेतले आहे. तसेच येणाऱ्या काळात रिंगरोडसाठीही हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

काही वर्षांपासून प्रशासनाकडून शहरासभोवताली रिंगरोड करण्याच्या हालचाली सुरू आहेत. रिंगरोडसाठी आराखडा बनवला असून होनगा, काकती, कणबर्गी, सांबरा, मुतगा, उचगाव, बेळगुंदी आधी गावांजवळून रिंगरोड होणार असल्याची चर्चा आहे. अनेकदा रिंगरोडसाठी अनुदान मंजूर झाल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे.

त्यामुळे भविष्यात रिंगरोडसाठी हालचाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रिंगरोड कोणत्या भागातून जाणार, किती शेतकऱ्यांचे नुकसान होणार, याची माहिती जाणून घेऊन लढा उभारण्याची गरज आहे. हलगा-मच्छे बायपासचा निर्णय झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कामाला एकत्र येत विरोध केला होता. सुरुवातीला लढ्याची धार कायम होती. मात्र काही वर्षांतच भूसंपादनासाठी अनेक शेतकऱ्यांनी रक्कम घेतली. त्यामुळे अनेक शेतकरी बाहेर पडले. त्याचा फटका आंदोलनाला बसला आहे. रिंगरोडचा निर्णय झाला तर मोठ्या प्रमाणात भूसंपादन केले जाईल. त्यावेळी शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांना संघटित राहून लढा यशस्वी करावा लागेल.

यापूर्वी अनेक लढे शेतकऱ्यांनी संघर्ष करून जिंकले आहेत. भविष्यात रिंगरोडचा विचार नक्कीच होणार आहे. त्यामुळे आतापासूनच शेतकऱ्यांनी संघटित राहून प्रशासनाचा डाव हाणून पाडण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्यादृष्टीने येणाऱ्या काळात रूपरेषा ठरवावी लागेल.

- मनोहर किणेकर, माजी आमदार

loading image
go to top