esakal | सभा, मेळावे, यात्रा, उरुसांवर बंदी 

बोलून बातमी शोधा

abhijit choudhari.jpg

सांगली-कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्देश दिल्यानुसार सभा, मेळावे, यात्रा, उरुस यांच्यावर 15 ते 31 मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. तसेच महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालयेही बंद राहणार आहेत. जलतरण तलाव, नाट्य आणि चित्रपटगृहे बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. 

सभा, मेळावे, यात्रा, उरुसांवर बंदी 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली-कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्देश दिल्यानुसार सभा, मेळावे, यात्रा, उरुस यांच्यावर 15 ते 31 मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. तसेच महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालयेही बंद राहणार आहेत. जलतरण तलाव, नाट्य आणि चित्रपटगृहे बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. 


कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी उपस्थित होते. 
डॉ. चौधरी म्हणाले, "अनेक आस्थापना कालपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांचा समूह एकत्र येऊ नये यासाठी उरुस, मेळावे, सभा, यात्रा यावर 15 ते 31 मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक विधी, खासगी कार्यक्रम कौटुंबिक स्वरुपात करावेत. गर्दी केल्यास आयोजकांवर कारवाई करण्यात येईल.' 


शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद-
ते म्हणाले, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालयेही 15 ते 31 मार्चअखेर बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच चित्रपट आणि नाट्यगृहे यांच्यासह व्यायामशाळा, जलतरण तलावही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाड्याही बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांना टीएचआर वाटप करण्याची सूचना केली आहे. 


10वी, 12वीच्या परिक्षा सुरु-
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार असली तरी 10 वी आणि 12 वीच्या परिक्षा वेळापत्रकानुसार सुरु राहणार आहेत. तसेच मॉलमधील किराना दुकाने, मेडिकल, दूध, भाजीपाला दुकाने वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र याचा फायदा घेऊन साठेबाजी करु नये अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील. 
हलगर्जीपणा केल्यास गय नाही 
सर्व शासकीय कार्यालयांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. अन्न औषध प्रशासन विभागालाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. कुणी हलगर्जीपणा केल्यास गय केली जाणार नाही असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिला. 


कलम 144 नाही-
साथीचे आजार प्रतिबंधक कायदा आणि पोलिस कायद्यानुसार जिल्ह्यात बंदीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र कलम 144 लागू केलेले नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

सात ठिकाणी आयसोलेशन वॉर्ड-
जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संजय साळुंखे म्हणाले, महापालिका क्षेत्रासह सात ठिकाणी आयसोलेशन वॉर्ड केले आहेत. सांगली सिव्हीलमध्ये पाच बेड, मिरज मेडिकलमध्ये सहा बेड, सेवासदन हॉस्पिटलमध्ये पाच बेड, सिध्दीविनायक कॅन्सर हॉस्पिटलचा अतिदक्षता विभाग तेथे पाच बेड, विवेकानंद हॉस्पिटलचा आयसीयु विभागातील पाच बेड, मिशन हॉस्पिटलमधील वॉन्लेस हॉस्पिटलचे आठ बेड, बर्नस आयसीयु, इस्लामपूरजवळच्या प्रकाश हॉस्पिटलमधील 15 बेड असे 54 बेडे आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत.


डॉ. साळुंखे म्हणाले, सध्या परदेशातून आलेले 97 प्रवाशी निरीक्षणाखाली आहेत. यातील दोन रुग्ण आयसोलेशन वॉर्डमध्ये आहेत. तर सहाजणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. निरीक्षणाखाली असलेल्यांना घरीच थांबण्याचा सल्ला दिला आहे.परदेशातून आलेल्यांमध्ये चीनमधून आठ, इराण, मस्कत येथून सात, थायलंडमधून पाच, ऑस्ट्रेलियातून चार, दुबईतून 45, इटली, केनिया, अमेरिका, तैवान आणि कतार या देशांमधून प्रत्येकी दोन आणि जर्मनीतून एकजण आला आहे. यामध्ये नेपाळचाही एकजण आला असून तो रेल्वेने आला आहे.