विधायक..! हार तुऱ्यांना फाटा, वृक्षसंवर्धनासाठी एक पाऊल

विनोद शिंदे
सोमवार, 29 जून 2020

या उपक्रमासाठी सन्मतीकुमार कबुरे, अनिल संगलगे, जितेंद्र खोत, शिवतेज घोरपडे, सुशांत कोळी, नेमिनाथ चौंडाज, सुनील बेळवे, प्रवीण साळुंखे, मनोज घाबरे आदींचे सहकार्य मिळत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. 

म्हैसाळ (सिंधुदुर्ग) - म्हैसाळ (ता. मिरज) येथे वृक्ष चळवळ रुजविण्यासाठी गावातील युवकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत कोणाचा वाढदिवस असल्यास अथवा निवड, विशेष कामगिरी, निवृत्ती आदीचे औचित्य साधत त्यांचा सागवानाचे रोप देऊन सत्कार करण्याचा स्तुत्य उपक्रम म्हैसाळचे माजी सरपंच आबासाहेब शिंदे-म्हैसाळकर यांनी सुरू केला आहे. त्यांच्या या विधायक उपक्रमास मेघराज शिंदे-म्हैसाळकर, पंचायत समितीचे सदस्य दिलीपकुमार पाटील, शेखर मराठे, धनंजय कुलकर्णी, गणेश निकम, विजय सुतार आदींचे पाठबळ मिळत आहे. 

शिंदे म्हणाले, की गावांमध्ये बऱ्याच जणांचे वाढदिवस साजरे होतात. यावेळी हार, केक आदींची रेलचेल असतेच. सध्या जगासमोर ग्लोबल वॉर्मिंगसह प्रदूषणाचा गंभीर प्रश्‍न उभा आहे. निसर्गाच्या समतोलासाठी वृक्षसंवर्धन आवश्‍यक आहे. यातूनच गावातील संबंधितांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा रोप देऊन सत्कार करण्याची कल्पना सुचली. सहकाऱ्यांच्या चर्चेतून मॉन्सूनच्या आगमनाचा मुहूर्त साधत या उपक्रमाची सुरुवात केल्याचे सांगून शिंदे म्हणाले, एखाद्याला त्याच्या घरी जाऊन रोप भेट दिल्यास त्यांच्याकडून रोपाचा सांभाळ होतोच. सागवानाचे रोप देण्यामागचा हेतू त्यांना भविष्यात या रोपाचा उपयोग व्हावा हाच आहे. या उपक्रमासाठी सन्मतीकुमार कबुरे, अनिल संगलगे, जितेंद्र खोत, शिवतेज घोरपडे, सुशांत कोळी, नेमिनाथ चौंडाज, सुनील बेळवे, प्रवीण साळुंखे, मनोज घाबरे आदींचे सहकार्य मिळत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. 

अशा समाजोपयोगी उपक्रमाचे प्रेरणास्थान वडील कृषितज्ज्ञ कै. डॉ. आप्पासाहेब शिंदे-म्हैसाळकर आहेत. गावातील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अशा विविध उपक्रमांतून सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याला दीपक शिंदे-म्हैसाळकर यांचे पाठबळ मिळत आहे. 
- आबासाहेब शिंदे-म्हैसाळकर, माजी सरपंच, म्हैसाळ 

तीसहून अधिक रोपांची भेट 
"सकाळ'चे सहयोगी संपादक शेखर जोशी यांना त्यांच्या वाढदिनी आणि एरंडोली (ता. मिरज) येथील तहसीलदारपदी निवड झालेले राकेश गिड्डे यांचाही सागवानाचे रोप देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. 15 जूनपासून सुरू केलेल्या या उपक्रमात तीसहून अधिक रोपांची भेट दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The message of saving trees mhaisal sangli district