कोरोना संकटात दूध उत्पादकांचा संघर्ष

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

भविष्यात पुन्हा एकदा "धवल क्रांती'ची फळे चाखण्यासाठी या संकट काळात तग धरून राहण्याचे मोठे आव्हान आहे.

सांगली -  द्राक्ष, डाळींब, भाजीपाल्यासह सर्वच शेतीमालाचा कोरोना लॉकडाऊनने कोंडी केली. शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र कोलमडून गेले, मात्र या काळात दुधाची उलाढाल अडखळत का असेना सुरु राहील. दुधाने शेतकऱ्यांना तारले. दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संस्थांनी कोरोना संकट काळात अतिशय संयम राखला आहे. 

राज्यातील दुधाचे अडीच कोटी लिटरचे संकलन आणि त्या तुलनेत दूध, दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीवर आलेल्या मर्यादा याची सांगड घालताना कसरत सुरू आहे. ती किती काळ राहिल, याची खात्री नाही. त्यातून दूध दराचा कायदा आणि प्राप्त परिस्थितीत व्यवहार हा मेळ घालण्यावर सर्व घटकांत या घडीला एकमत आहे. फायद्या-तोट्याच्या व्यवहारापेक्षा आज टिकून राहण्याला हे क्षेत्र महत्त्व देत आहे. भविष्यात पुन्हा एकदा "धवल क्रांती'ची फळे चाखण्यासाठी या संकट काळात तग धरून राहण्याचे मोठे आव्हान आहे. 

सारे जग लॉकडाउन असताना शेतकरी राबत होता. तो शिवारात होता. मेहनत करत होता, मात्र केळी, कलिंगड, भाजीपाल्यापासून साऱ्याच शेतमालावर संकट कोसळले होते. तो हतबल होता. मातीमोल दराने विक्री करत होता. या साऱ्यात धडपड करून जनावरे जगवत होता. दूध काढत होता, डेअरी चालवत होता. डेअरी मालक संकटातही दूध संकलन करत होते आणि ते दूध मोठ्या संकलन केंद्रात आणत होते. मोठे दूध केंद्र ते दूध पुणे, मुंबईपर्यंत पोहचवत होते. हे चक्र कुठेही थांबले नाही. दुधाची मागणी कमी झाली, उपपदार्थ विक्री जवळपास ठप्प झाली. दूध पावडर निर्मितीला पर्याय उरला नाही.

संकट मोठ्या दूध डेअरीवर होते. ते छोट्या दूध डेअरीकडे सरकणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली आणि पर्यायाने शेतकऱ्यांची कोंडी होणार नाही, याची खबरदारी घेतली गेली. दुधाचे दर पडले, पर्याय नव्हता. दूध उत्पादकांनी त्यावर चकार शब्द काढला नाही. कारण, या काळात संयम सोडला तर दूध संकलनावर थेट परिणाम झाला असता. डेअरी बंद झाल्या असत्या. ते कुणालाच परवडणारे नव्हते. विशेषतः हे संकट गायीच्या दुधाबाबत अधिक आहे. या काळात कमीअधिक का असेना मात्र दुधाचा पैसा खेळता राहिला हेच महत्वाचे. 

दुसरीकडे पशुखाद्याच्या दरातील वाढ सातत्यपूर्ण राहिली आहे. कच्च्या मालाचा तुटवडा असल्याने ते साहजिक होते. या दुहेरी कोंडीतून दूध उत्पादकांनी संयम बाळगला आहे. तो अजून किती काळ बाळगावा लागेल, याची या घडीला कल्पना नाही. चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे यांच्या मतानुसार, लॉकडाउनच्या पुढच्या टप्प्यात व्यवहार अधिक सुटसुटीत होतील आणि मग हे संकट हळूहळू कमी होईल. तोवर टिकून राहण्याला महत्त्व दिले पाहिजे. 

आकड्यांत स्थिती 
* राज्याचे दूध उत्पादन ः अडीच कोटी लिटर 
* उपपदार्थ निर्मिती ः सुमारे 60 टक्‍क्‍यांवर 
* जिल्ह्याचे रोजचे दूध उत्पादन ः 12 लाख लिटर 
* खासगी संस्थांचे संकलन ः सुमारे 7 लाख लिटर 
* सहकारी संस्थांचे संकलन ः सुमारे 5 लाख लिटर 

दूध पावडर निर्मिती 
राज्यातील सुमारे दीड कोटी लिटर दुधाची रोज भुकटी केली जात आहे. ते प्रमाण आता हळूहळू कमी होत जाईल आणि उपपदार्थ निर्मितीची आकडेवारी वाढत जाईल. दूध भुकटीचे देशातील दर प्रतिकिलो 300 रुपयांवर होते. ते दूध भुकटी निर्मिती वाढल्यानंतर सुमारे 204 रुपये प्रतिकिलोवर आले होते. या दरात वाढीची सध्या तरी फारशी शक्‍यता दिसत नाही. कारण, मागणीपेक्षा सध्या साठा मोठा आहे. तरीही हा व्यवसाय टिकून राहण्यासाठी धडपडतो आहे. 

दूध उत्पादक शेतकरी आणि संस्थांनी संयमाने, सामंजस्याने आणि कायदा-व्यवहाराची सांगड घालत संकट हाताळले आहे. संकट खूप मोठे आहे. ते कधी संपेल माहिती नाही, मात्र या काळात टिकून राहण्याला महत्त्व दिले आहे. फायद्यातोट्यापेक्षा व्यवसाय जगला पाहिजे. 
- गिरीश चितळे, संचालक, चितळे डेअरी 

दूध विक्री सुरु राहिल्याने हातात पैसा खेळता राहिला. दुधाच्या दरावर या घडीला फार चर्चा करून चालणार नाही. आठआणे-रुपया कमी मिळाला तरी खदखद नाही, कारण संकटच मोठे आहे. फक्त शेण पदरात पडतेय, बाकी सारा खर्च जनावरांवरच होतोय. आठवड्यात बील येतेय आणि त्यावर चूल पेटते, हेच महत्वाचे. 

- चंदर पाटील, शेतकरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: milk business issues sangli district