भाजपमुळेच विजय हे प्रा. मंडलिकांनी विसरू नये; चंद्रकांतदादांचा टोला

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 September 2019

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष - शिवसेना युती होती. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात भाजपची अडीच लाख मते आहेत. आम्ही प्रामाणिकपणे युती धर्माचे पालन केले म्हणून शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक खासदार झाले, हे त्यांच्यासह इतरांनी विसरू नये, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज लगावला. प्रा. मंडलिक यांच्या विजयाचे श्रेय ‘आमचं ठरलंय’ म्हणणाऱ्यांनीही घेऊ नये, असाही टोला त्यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता लगावला.

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष - शिवसेना युती होती. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात भाजपची अडीच लाख मते आहेत. आम्ही प्रामाणिकपणे युती धर्माचे पालन केले म्हणून शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक खासदार झाले, हे त्यांच्यासह इतरांनी विसरू नये, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज लगावला. प्रा. मंडलिक यांच्या विजयाचे श्रेय ‘आमचं ठरलंय’ म्हणणाऱ्यांनीही घेऊ नये, असाही टोला त्यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता लगावला.

महापुराच्या काळात रात्रंदिवस काम करणाऱ्या मुकुंद गावडे, पी. डी. पाटील, हेमंत कोळेकर, नामदेव पाटील, कर्णसिंह घाटगे, दीपक शिरगावे, बाळासाहेब यादव आदींचा सत्कार श्री. पाटील यांच्या हस्ते आज झाला. हॉटेल अयोध्यात झालेल्या कार्यक्रमातच प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार झाला. या वेळी श्री. पाटील बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘धनंजय महाडिक यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली आहे. यापुढील सर्व निवडणुका महाडिक गटाला हाताशी धरूनच लढविल्या जातील. महायुतीच्या धर्माचे पालन केले म्हणूनच तुम्ही खासदार बनला, हे प्रा. संजय मंडलिक यांनी विसरू नये. त्यामुळे ‘आमचं ठरलंय’ म्हणणाऱ्यांनी याचे श्रेय घेऊन प्रा. मंडलिक यांची मदत मागू नये.’’

‘‘आई अंबाबाईच्या कृपेने श्री. महाडिक यांना दिल्लीशी निगडित एखादे पद मिळेल. त्यांना खासदार व्हावे असे वाटले तर तेही करू आणि दुसऱ्यांदा त्यांचा सत्कार करण्याची संधीही लवकरच मिळेल. महाडिक यांच्या जिल्ह्यातील ताकदीचा वापर करून महायुती दहाही जागा जिंकेल, या निवडणुकीसाठी भाजप-सेना युतीची निश्‍चित युती होईल,’’ असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

सध्या विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापू लागलं आहे. १५ ते २० सप्टेंबरच्या दरम्यान आचारसंहिता लागू होईल आणि १३ ते १७ ऑक्‍टोबरदरम्यान निवडणूक होईल. ही निवडणूक महायुती एकत्रच लढणार आहे आणि २२० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केला असल्याचे श्री. पाटील म्हणाले.

श्री. महाडिक म्हणाले, ‘‘अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही पीक कर्जमाफी मिळावी. भाजपनं आपल्यावर जी जबाबदारी विश्‍वासानं सोपवली, ती प्रामाणिकपणे पार पाडून दिलेल्या संधीचं सोनं करू. महापुराच्या आधी अतिवृष्टीमुळं ज्यांचं नुकसान झालंय. अशा शेतकऱ्यांनाही पीक कर्जमाफी मिळावी. तसंच भोई आणि कुंभार समाजाला शासनानं आर्थिक आधार द्यावा.’’ 

कार्यक्रमात मुकुंद गावडे, अशोक देसाई, बाबा देसाई यांनी जिल्ह्यात पक्षातर्फे महापुरात केलेल्या मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतला. संकटांना धैर्यानं कसं तोंड द्यायचं, याचा धडा श्री. पाटील यांनी घालून दिल्याचे अनेकांनी सांगितले. 

माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, गोपाळराव पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक पी. जी. शिंदे, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

मुश्रीफ, सतेज यांना आडवे करणार
काँग्रेसच्या व्यासपीठावर जाऊन परस्पर भूमिका जाहीर करणाऱ्या खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यावर पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सडकून टीका केली. पालकमंत्री पाटील यांनी कार्यकर्त्यांची भक्कम मोट बांधल्यानंच मंडलिक लोकसभेत विजयी झाले, हे त्यांनी विसरू नये, असा टोला लगावला. विधानसभा निवडणुकीत आमदार सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांना आडवं केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

महाडिकच खासदार असते
काल (ता. ५) काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आयोजित संवाद मेळाव्याला खासदार प्रा. मंडलिक यांनी हजेरी लावली. त्या मेळाव्यात प्रा. मंडलिक यांनी दक्षिणमध्ये भाजपचे उमेदवार आमदार अमल महाडिक यांच्याविरोधात श्री. पाटील यांचे पुतणे ऋतुराज यांना पाठिंबा जाहीर केल्याचे पडसाद उमटले. पालकमंत्री पाटील यांनीच या विषयाला तोंड फोडताना, या मतदारसंघात भाजपची अडीच लाख मते आहेत, आम्ही युती धर्म पाळला; पण हीच मते प्रा. मंडलिक यांच्याविरोधात वळवली असती तर श्री. महाडिक हेच खासदार झाले असते, त्यामुळे ‘आमचं ठरलंय’ म्हणणारेही पळून गेले असते, असाही टोला लगावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Chandrakant Patil comment