मंत्री मुश्रीफ म्हणाले, नो गटबाजी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी कोणत्याही गटबाजीला थारा दिला जाणार नाही. सर्वांना सोबत घेऊन काम करू,

नगर ः ""राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळेच आपल्याला कॅबिनेट व नगरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. मंत्रिपदाची धुरा आपण समर्थपणे पेलणार आहोत. जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी कोणत्याही गटबाजीला थारा दिला जाणार नाही. सर्वांना सोबत घेऊन काम करू,'' अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. 

जिल्हा नियोजन समितीची सोमवारी (ता. 20) बैठक होणार आहे. पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर प्रथमच या बैठकीसाठी मंत्री मुश्रीफ येथे येणार आहेत. या संदर्भात "सकाळ'शी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, ""शेतकरी, कामगार, शेतमजूर, बेरोजगार आणि निराधारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते दर्जेदार बनविण्यात येतील. त्याचबरोबर आरोग्य, शिक्षण, नळ पाणीयोजनेचे प्रश्‍न मार्गी लावण्यात येतील.'' 

ठळक बातमी - नगरमध्ये काय घडलं छत्रपती-रामदासांबद्दल 

विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातून मुश्रीफ हे पाचव्यांदा विधानसभेत पोचले. आघाडीच्या सरकारमध्ये मुश्रीफ यांना कामगार मंत्रिपद मिळाले होते. आता महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेच असतानाही त्यांची कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लागली. मुश्रीफ यांची कामाची पद्धत, सोपवलेली जबाबदारी पार पाडण्याचा आवाका, सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ, निराधारांबाबत संवेदनशीलपणा, या जमेच्या बाजू आहेत. कामगारमंत्री म्हणून काम करताना त्यांनी सीएसआर फंडातून आरोग्यसेवेसाठी केलेले काम दिशादर्शक ठरले. कोल्हापुरात त्यांना रुग्णांचा डॉक्‍टर अन्‌ गरिबांचा श्रावणबाळ म्हणूनही ओळखले जाते. 

क्‍लिक करा - तीच्या मुलावर आली संक्रांत 

नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना आणि भाजप हे प्रमुख पक्ष आहेत. प्रत्येक पक्षात गटबाजी आहे. विकासकामे करून घेण्यासाठी प्रत्येक पक्षातील गटाची अहमहमिका लागलेली असते. आता या प्रमुख पक्षापैकी तीन पक्ष सत्तेत असल्याने निधी आपल्या मतदारसंघात वळविण्यासाठी मोठी चढाओढ लागणार आहे. त्यातच नगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना हवे होते. मात्र, राष्ट्रवादीकडे हे पद गेले. त्यामुळे मुश्रिफ यांना तारेवरची कसरत करावी लागेल. ते खमक्‍या स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ती अडचण येणार नाही, असे पक्षातील जाणकारांचे म्हणणे आहे. बैठकीला येण्यापूर्वी त्यांनी दिलेला इशारा महत्त्वपूर्ण मानला जातो. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Musharraf said no grouping in development