"ती'च्या मुलावर आली "संक्रांत' 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

तळ्याच्या काठावर आदित्यची चप्पल दिसली. त्यांनी तळ्यात डोकावून पाहिले असता त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. आईने आरडा ओरड केल्यानंतर आजूबाजूची लोकं जमा झाली​

टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) ः नगर जिल्ह्यासह राज्यात काल मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नगर जिल्ह्यात तरूण मुलांनी पतंगबाजी केली. महिलांनी संक्रांतीचे वाण लुटले. हा आनंदाचा माहोल असताना पारनेर तालुक्‍यातील टाकळी ढोकेश्‍वर गावातील एका कुंटुंबावर "संक्रांत' आली. 
त्यामुळे त्यांच्याच नव्हे तर संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. क्षणात आनंदाचे रूपांतर दुःखात झाले. 

नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून शेततळ्यात, नदीत, बंधाऱ्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेततळी केली आहेत. त्यांनी उपाययोजना केल्या पाहिजेत, यासाठी कृषी विभागाने काही नियम घालून दिले आहेत. मात्र, त्याची पूर्तता होत नसल्यानेच मुलांना जीव गमवावा लागतो. 

हेही वाचा - श्रीगोंद्यात सापडला मुन्नाभाई 
 

तालुक्‍यातील टाकळी ढोकेश्वर येथील निवडुंगे वाडीमधील पाचपुते कुटुंबियांने आपला दहा वर्षांचा मुलगा गमावला. दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे त्याचे आई-वडील हबकून गेले होते. शेताजवळच्या झावरदरा तळ्याध्ये बुधवारी (ता.15) हा प्रकार घडला. 

आईने पाहिला लेकाचा मृतदेह 
या बाबत माहिती अशी ः तळयाजवळ त्याचे वडील यशवंत सखाराम पाचपुते यांची जमीन आहे. शेताकडे आदित्य गेला होता. लवकर घरी न आल्याने त्याची आई शांताबाई ही दुपारी दोनच्या दरम्यान त्याला पहायला गेली. त्यावेळी शेताजवळील झावरदरा तळ्याच्या काठावर आदित्यची चप्पल दिसली. त्यांनी तळ्यात डोकावून पाहिले असता त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. आईने आरडा ओरड केल्यानंतर आजूबाजूची लोकं जमा झाली. त्यांनी आदित्यला तळ्यातील पाण्यातून वर काढले. 

अवश्‍य वाचा- साईबाबा जन्मस्थानावरून वाद पेटला 

पाय घसरून पडला 

काठावरून पाय घसरून तो पाण्यात पडल्याचे समजते. आदित्यचे चुलते संतोष पाचपुते यांनी टाकळी पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. पी.एस.आय. नीलेश वाघ व पोलीस हेड कॉंन्स्टेबल शेळके यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रूग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मृतदेह सायंकाळी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी करीत आहेत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother loses son