राष्ट्रवादीशी हात मिळवणी करण्याची वेळ आल्यास राजकारणातून संन्यास - खोत

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 30 June 2019

ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसशी हात मिळवणी करण्याची वेळ येईल. त्या दिवशी हा सदाभाऊ खोत राजकारणातून संन्यास घेऊन घरी बसेल

- सदाभाऊ खोत

इस्लामपूर - आम्ही तीन पिढ्या काँग्रेस, राष्ट्रवादीला कडाडून विरोध करत मतदान दिलेले नाही. त्यामुळे मी सभागृहात जाता-जाता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटलो. त्याचा फोटो व्हायलर करुन समाधान मिळवणार्‍यांनी आमच्यावर शंका उपस्थित करु नये. ज्यांनी तीन पिढ्या विरोध केला आहे. त्यांनाच माझ्यावर आरोप करण्याचा अधिकार आहे, असा टोला लगावत ज्या दिवशीराष्ट्रवादी काँग्रेसशी हात मिळवणी करण्याची वेळ येईल. त्या दिवशी हा सदाभाऊ खोत राजकारणातून संन्यास घेऊन घरी बसेल. असे मंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप सरकारचे योगदान याबाबत आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. रयतक्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भास्कर कदम, सागर खोत उपस्थित होते.

श्री. खोत म्हणाले, “ गेल्या आठवड्यात सभागृहात जाता-जाता माझी व जयंत पाटलांची भेट झाली. या भेटी दरम्यान औपचारिकता म्हणून आम्ही दोघे एका विषयावर बोलत होतो. त्यावेळी त्याचे छायाचित्र घेऊन ते व्हायलर करण्यात आले. यात सोशल मिडीयावर माझ्या विषयी अफवा पसरवणे सुरु केले. पण ज्यांना माझ्या विषयी शंका वाटते. त्यांनी हे लक्षात ठेवावे. आमच्या वडिलांनी, मी  व मुलांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला विरोध केला आहे व करत राहणार. मात्र ज्यांनी राष्ट्रवादीला यापूर्वी मतदान केले आहे. अथवा ज्यांनी गळ्यात गळा घातला आहे. त्यांनी माझे फोटो व्हायलर करुन स्वतःला गुदगुल्या करुन घेऊ नये. ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर हात मिळवणी करण्याची वेळ येईल. त्या दिवशी हा सदाभाऊ राजकारणातून संन्यास घेईल.

ते म्हणाले, इस्लामपूर विधानसभा मतदार संघात आम्ही पारंपारिक विरोधक एकत्रीत बसून एका विचाराने निर्णय घेऊ. सर्वांची मोट बांधणार्‍या नानासाहेब महाडिकांची उणीव असली तरी आता सामुहिक नेतृत्व पुढे करुन मुख्यमंत्री व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करुन इस्लामपूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या विरोधात उमेदवार देणार आहे. ही जागा रयत क्रांती संघटनेला आली तरीही हाच फॉर्म्युला वापरला जाईल. 

ते म्हणाले, मराठा आरक्षणाचे प्रणेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव घ्यावे लागेल. भाजप सरकारमुळे मराठा आरक्षण शक्य झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी गेल्या १५ वर्षात सत्तेवर असून ही त्यांना आरक्षण देता आले नाही. किंवा त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचे नव्हते, असे म्हणावे लागेल. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत युतीचे सरकार सत्तेवर येईल. निवडणुकीनंतर निवडून आलेल्या युतीच्या आमदारांची संख्या दोनशेच्या पुढे मोजावी लागेल.”


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Sadabhu Khot comment